वय एक फक्त आकडा असतो, हे इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळणारे दिग्गज वेळोवेळी सिद्ध करतात. मंगळवारी झालेल्या सामन्यात खेळाच्या दोन दिग्गजांनी पुन्हा एकदा चाहत्यांना हे दाखवून दिलं आहे.
मंगळवारी (26 मार्च) चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सचे संघ आमनेसामने होते. या सामन्यात 42 वर्षीय धोनी आणि त्यानंतर 35 वर्षीय अजिंक्य रहाणेनं असे काही झेल घेतले, ज्यानं चाहत्यांना विचार करायला भाग पाडलं की हे खेळाडू वाढत्या वयाबरोबर थकण्याऐवजी अधिक फिट होत आहेत.
चेपॉकमध्ये 207 धावांचा बचाव करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईसाठी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं विजय शंकरचा उत्कृष्ट डायव्हिंग झेल घेतला. 42 वर्षांचा धोनी सध्या कमालीचा फिट दिसत आहे. याशिवाय 35 वर्षीय रहाणेनं डीप मिड-विकेटवर एक उत्कृष्ट झेल घेतला. या झेलला ‘कॅच ऑफ द सीझन’साठी देखील नामांकन मिळू शकतं.
गुजरातच्या डावात 12व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मिलरनं डीप मिड-विकेटमध्ये उंच शॉट मारला. रहाणे खूप मागे होता, परंतु त्यानं पुढे धावत जाऊन हवेत डाइव्ह करत उत्कृष्ट झेल घेतला. हा झेल पाहून मिलरचाही विश्वास बसला नाही. हा झेल इतका नेत्रदीपक होता की दूर उभ्या असलेल्या धोनीनंही टाळ्या वाजवून रहाणेच्या प्रयत्नाचं कौतुक केलं. मिलरनं 16 चेंडूत 21 धावांची खेळी खेळली. तुषार देशपांडेनं त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सचा 63 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईनं 20 षटकांत 6 गडी गमावून 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 143 धावा करता आल्या. या विजयासह ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
63 धावांनी झालेला पराभव हा गुजरातचा आयपीएलमधील धावांच्या फरकानं सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी 10 महिन्यांपूर्वी त्यांचा वानखेडेवर मुंबई इंडियन्सकडून 27 धावांनी पराभव झाला होता. चेन्नईनं मुंबईचा विक्रम मोडला आहे. सीएसकेचा पुढील सामना 31 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. त्याचवेळी गुजरातचा पुढील सामना 31 मार्च रोजी अहमदाबादमध्ये सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी इफेक्ट! चेन्नईमध्ये येताच पालटलं शिवम दुबेचं नशीब, आकडेवारी पाहून व्हाल थक्क
धोनीसमोर ऋतुराज फक्त रिमोट कंट्रोल कर्णधार? दीपक चहरनंही घेतली मजा
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला स्लो-ओव्हर रेटसाठी दंड, इतक्या रुपयांचा फाइन भरावा लागणार