भारत हा १३५ कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात क्रिकेट इतकी लोकप्रियता दुसऱ्या कोणत्याच खेळाला नाही. अनेक भारतीयांसाठी क्रिकेट हा धर्म आहे. भारतातील बहुसंख्य लोक हे स्वत: कधीतरी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न बाळगत होते अथवा आपल्या मुलांना क्रिकेटर बनवण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिसतात. आजकाल प्रत्येक ठिकाणी लहान- सहान क्रिकेट ऍकॅडमी असलेल्या आपण पाहतो.
अनेक माजी खेळाडू हे आपली क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर क्रिकेट ऍकॅडमी सुरू करतात. आपल्या भविष्याचा विचार करता करता आपल्या ऍकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवण्याचे काम ते करत असतात. रॉजर बिन्नी, मदनलाल, दिलीप वेंगसरकर, विरेंद्र सेहवाग या खेळाडूंच्या अनेक ऍकॅडमी कार्यरत आहेत.
काही सक्रिय भारतीय खेळाडू देखील ऍकॅडमी उघडून युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. त्यापैकी बहुतेकांना वाजवी यश मिळाले आहे, तर काहींनी परदेशात देखील आपल्या ऍकॅडमी युवा खेळाडूंसाठी खुल्या केल्या आहेत.
या लेखात आपण ४ सक्रिय भारतीय क्रिकेटपटूंवर नजर टाकूया ज्यांनी क्रिकेट ऍकॅडमी उघडल्या आहेत.
एमएस धोनी
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा विद्यमान कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने स्वत:च्या एमएस धोनी क्रिकेट ऍकॅडमींची (MSDCA) साखळी तयार केली आहे. २०१७ मध्ये धोनीने आपली पहिलीच अकॅडमी दुबईमध्ये सुरू केली. सद्यस्थितीत, दुबई आणि सिंगापूर या विदेशातील ऍकॅडमींसोबत भारतातील गुरुग्राम, बोकारो, लखनऊ आणि बरेली या शहरांमध्ये त्याच्या अकॅडमी आहेत.
आरका स्पोर्ट्स या क्रीडा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीसोबत धोनीची भागीदारी आहे. या ऍकॅडमींसाठी लागणारी मार्गदर्शक तत्वे स्वत: धोनीने तयार केली आहेत. या सर्व ऍकॅडमींमध्ये प्राधान्याने भारतीय प्रशिक्षक असतात.
हरभजन सिंग
भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने स्वत:च्या नावे “हरभजन सिंग इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेट” (HSIC) ही अकादमी सुरू केली आहे. HSIC च्या भारतात लखनऊ, कोलकत्ता आणि जालंधरमध्ये शाखा आहेत.
धोनीप्रमाणे हरभजनने देखील आपल्या इन्स्टिट्यूटसाठी काही नियम बनवलेले आहेत. जे त्याच्या स्वत:च्या मार्गदर्शनाखाली लिहिले गेले आहेत. फायनल स्कोर मॅनेजमेंट कंपनी या खाजगी कंपनीद्वारे HSIC चे व्यवस्थापन पाहिले जाते.
आर अश्विन
सध्याच्या भारतीय संघातील अव्वल फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने देखील आपले वडील एन. रविचंद्रन यांच्यासमवेत ‘जेन नेक्स्ट क्रिकेट इन्स्टिट्यूट’ या अकादमीची स्थापना केली आहे. अश्विनच्या अकादमीची सहा केंद्रे एकट्या चेन्नईमध्येच आहेत. याच सोबत शारजा, संयुक्त अरब अमिराती आणि युरोपात देखील “जेन नेक्स्ट क्रिकेट इन्स्टिट्यूट”च्या काही शाखा आहेत.
अश्विनच्या अकादमीचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अकादमीमध्ये वयोगटानुसार प्रशिक्षण दिले जाते. सोबतच, दर उन्हाळ्यात मोफत प्रशिक्षण वर्ग लावून नवनवीन खेळाडूंचा शोध घेतला जातो.
युसूफ पठाण
२०११ विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या युसूफ पठाण (Yusuf Pathan) याने आपला भाऊ इरफान पठाण याच्यासमवेत “क्रिकेट ऍकॅडमी ऑफ पठान्स” सुरू केली आहे.
२०१७ साली सुरू झालेली ही ऍकॅडमी भारतातील अव्वल अकादमींत सामील आहे. चार वर्षात “क्रिकेट ऍकॅडमी ऑफ पठान्स” च्या भारतात उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात मध्ये अनेक शाखा आहेत.
सर्व अकादमीचे संचलन प्रमुख अकादमी असलेल्या बडोदा येथून होते. दोघे पठाण बंधू या ऍकॅडमीचे सर्वेसर्वा, तर माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल हे प्रमुख मार्गदर्शक आहेत.
वाचनीय लेख-
-वनडे सामनाही कसोटीसारखा खेळणारे ५ भारतीय फलंदाज
-२०२०मध्ये बेंगलोर शंभर टक्के जिंकणार आयपीएल परंतू या ३ सुधारणा केल्यावरच
-इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..