आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम उदय झाला कसोटी क्रिकेटचा. कसोटीनंतर ५० षटकांचे वनडे क्रिकेट, २० षटकांचे टी२० क्रिकेट अशा मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्वरुपांची सुरुवात झाली. जरी, आता वनडे आणि टी२०ची लोकप्रियता जास्त असली, तरी कसोटी क्रिकेटला आताही तेवढेच महत्त्व दिले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे, कसोटी क्रिकेटमध्ये नावारुपाला आलेले काही क्रिकेटपटू.
हे खरं आहे की, कसोटीत षटके खूप असतात. मात्र, कसोटीत खेळण्यासाठी मानसिक बळ, चिकाटी आणि सातत्य असावे लागते. तरच खेळाडू मैदानावर तग धरुन राहू शकतो. कसोटीत खेळणाऱ्या गोलंदाजांमध्ये तर सलग १०-१५ षटके टाकण्याची क्षमता असावी लागते. त्यातही प्रत्येक षटक हे आपले पहिले षटक असल्याप्रमाणे स्फुर्ती घेऊन त्यांना गोलंदाजी करावी लागते. त्याप्रमाणेच फलंदाजांनाही परिस्थितीनुसार खेळावे लागते.
पण फायद्याची गोष्ट ही असते की, फलंदाजांना जास्त षटके मिळाल्यामुळे अधिकाधिक धावा करण्याची संधी असते आणि संधीचे सोने करत काही दिग्गज फलंदाजांनी असे कमाल केले की त्यांची चर्चा आजही केली जाते.
या लेखात आपण अशाच ४ दिग्गज फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी कसोटीत शतक, द्विशतक नव्हते तर त्रिशतक करण्याचा पराक्रम केला आहे. तेही एकदी नाही, तर २ वेळा.
कसोटी कारकिर्दीत २ वेळा त्रिशतक करणारे ४ फलंदाज
4 Batsman Who smashed 2 Triple Century In Test Cricket
१. डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)
सर डॉन ब्रॅडमन यांची कसोटी क्रिकेटमध्ये वेगळीच ओळख आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅडमन यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत फक्त ५२ कसोटी सामने खेळले होते. दरम्यान त्यांनी कसोटीत २ त्रिशतके केली आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी ही दोन्ही त्रिशतके त्यांनी इंग्लंडविरुद्ध केली होती. ब्रॅडमन यांनी १९३०मध्ये हेडिंग्ले येथे ३३४ धावा करत त्यांचे पहिले त्रिशतक नोंदवले होते. तर, त्यानंतर १९३४मध्ये त्याच मैदानावर ३०४ धावा करत ब्रॅडमन यांनी दुसऱ्यांदा त्रिशतक करण्याचा कारनामा केला होता.
ब्रॅडमन यांनी त्यांच्या २० वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत ५२ सामन्यात एकूण ६९९६ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या २ त्रिशतकांसह १२ द्विशतके, २९ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.
२. ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)
वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याला सर्वजण ओळखतात. लाराने कसोटीतील त्याची दोन्ही त्रिशतके ही एंटिगा येथे इंग्लंडविरुद्ध केली होती. १९९४मध्ये त्याने ३७५ धावा करत आपले पहिले त्रिशतक केले होते. लाराचा कसोटीत एका सामन्यात सर्वाधिक ३७५ धावा करण्याचा विक्रम अनेक वर्षे अबाधित होता. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडन याने ऑक्टोबर २००३मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ३८० धावा करत लाराचा हा विक्रम आपल्या नावावर केला. तर, २००४मध्ये लाराने नाबाद ४०० धावा करत परत हा विक्रम आपल्या नावावर केला.
लाराने त्याच्या १६ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत १३१ कसोटी सामन्यात ११९५३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ९ द्विशतकांचा, ३४ शतकांचा आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे.
३. विरेंद्र सेहवाग (भारत)
भारताचा दिग्गज विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग यानेदेखील त्याच्या कसोटी कारकिर्दीत २ त्रिशतके केली आहेत. सेहवागने २००४मध्ये मुलतान येथे पाकिस्तानविरुद्द ३०९ धावा करत आपले पहिले त्रिशतक केले होते. तर, २००८मध्ये दक्षिण आफिक्राविरुद्ध ३१९ धावा करत त्याने दुसऱ्या त्रिशतकाचीही नोंद केली होती.
सेहावागने त्याच्या १२ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत १०४ कसोटी सामन्यात ८५८६ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ६ द्विशतचकांचा, २३ शतकांचा आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. सेहवाग हा कसोटीत 2 वेळा त्रिशतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
४. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)
ब्रायन लारानंतर वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलनेही त्याच्या कसोटी कारकिर्दीत २ त्रिशतके करण्याचा कारनामा केला होता. गेलने २००५मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ३१७ धावा करच पहिले त्रिशतक केले होते. तर, २०१०मध्ये त्याने श्रीलंकाविरुद्ध ३३३ धावांची खेळी करत दुसरे त्रिशतक केले होते.
गेलने त्याच्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत १०३ कसोटी सामन्यात ७२१५ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ३ द्विशतकांचा, १५ शतकांचा आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वप्रथम इंग्लंडच्या अँडी सँडहम यांनी त्रिशतक केले होते. १९३०मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी ३२५ धावा करत त्यांनी आपल्या त्रिशतकाची नोंद केली होती.
ट्रेंडिंग लेख-
संघातील पुर्णवेळ यष्टीरक्षक, ज्यांनी गोलंदाजी करताना घेतल्या आहेत…
२००पेक्षा जास्त वनडे खेळून कधीही एकही चेंडू न टाकलेले ५ क्रिकेटपटू