आयपीएल २०२१ स्पर्धेला येत्या एप्रिल महिन्यात प्रारंभ होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये आयपीएल लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. यात २९२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यापैकी ५७ खेळाडूंवर एकूण १४५ कोटींची बोली लावण्यात आली. या लिलावात ख्रिस मॉरिस हा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला. तसेच ५ खेळाडूंवर १४ कोटींपेक्षा जास्त बोली लावण्यात आली.
मात्र लिलावात सहभागी झालेल्या २९२ खेळाडूंमध्ये असेही काही खेळाडू होते, ज्यांचे नाव लिलावाच्या यादीत असताना देखील घोषित करण्यात आले नाही. महत्त्वाचे म्हणजे, या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळले आहे. त्याच खेळाडूंचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
४) मोर्नी मोर्कल :
आपल्या जलद आणि आक्रमक गोलंदाजीने फलंदाजांच्या मनात भीती निर्माण करणारा, दक्षिण आफ्रिकन संघाचा गोलंदाज मोर्नी मोर्कल याने गेल्या काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. २००९ पासून ते २०१६ पर्यंत आयपीएल स्पर्धेचा भाग असलेल्या मोर्कलचा २०२१ लिलावाच्या अंतिम २९२ खेळाडूंच्या यादीत समावेश होता. परंतु त्याचे नाव लिलावाच्या वेळी घेण्यातच आले नाही.
३) शरफेन रुदरर्फोर्ड :
आयपीएल २०१९ च्या सत्रात दिल्ली संघाकडून २ कोटींची बोली लागलेल्या शरफेन रुदरर्फोर्ड याला पहिल्या हंगामात साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याला २०२० आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघात ट्रेड केले होते. परंतु त्याला एकही सामना खेळायची संधी मिळाली नाही. यानंतर यावर्षी त्याला मुंबई संघातून रिलीज करण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल लिलावाच्या अंतिम यादीत रुदरर्फोर्ड याचे देखील नाव होते. परंतु त्याचे नाव घोषित करण्यात आले नाही.
२) मुशफिकुर रहीम :
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टॉप-५ यष्टिरक्षक फलंदाजांनामध्ये समावेश असलेला बांगलादेश संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम हा दरवेळी आयपीएलच्या लिलावात सहभाग घेत असतो. परंतु बऱ्याचदा तो अनसोल्ड राहिला आहे. काही दिवसांपूर्वी मुशफिकुर रहीम आयपीएल २०२१ लिलावात सहभाग घेत नसल्याची चर्चा होती. परंतु लिलावापूर्वीच त्याने आपली नाव नोंदणी केली आणि अंतिम यादीत स्थान मिळवण्यातही तो यशस्वी ठरला. परंतु दुर्दैवाने त्याचे नाव आयपीएल लिलावाच्या वेळी घोषित करण्यात आले नाही.
१) टीम साऊथी :
टी-२० क्रिकेटमधील प्रसिद्ध गोलंदाज टीम साऊथी याने देखील आयपीएल २०२१ च्या लिलावात सहभाग घेतला होता. टीम साऊथी आयपीएलमध्ये आतापर्यंत ३ संघातून खेळला आहे. २०१९ मध्ये आरसीबी संघातून त्याने शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यांनतर २०२० मध्येही त्याला कुठल्याच संघात स्थान मिळाले नाही .२०२१ च्या लिलावात २९२ खेळाडूंचा अंतिम यादीत त्याचे नाव होते परंतु, त्याचे नाव घोषित करण्यात आलेच नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या टी नटराजनची चिमुकली पाहिलीत का? पाहा तिचा फोटो