आयपीएल ही जगातील सर्वात मोठी पैशाने संपन्न असलेली क्रिकेट स्पर्धा आहे. यात खेळाडूंवर मोठ्या संख्येने पैसे खर्च केले जातात. २००८ मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेमुळे गरीबांतील गरीब खेळाडूंना एक व्यासपीठ मिळाले आणि भरपूर पैसेही मिळाले.
२००८ मध्ये आयपीएलचा पहिला हंगाम खेळला गेला. आयपीएलच्या पहिल्या सत्रापूर्वी खेळाडूंचा लिलाव झाला होता, ज्यात काही खेळाडूंवर खूप मोठी बोली लावली गेली.
जसजसे आयपीएलचे हंगाम वाढत गेले तसतसे खेळाडूंवर लावल्या जाणाऱ्या बोलीची किंमत वाढत गेली. आज असे बरेच खेळाडू आहेत ज्यांना करोडो पैसे मिळत आहेत. तर, या लेखात भारतीय क्रिकेटमधील ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्या पहिल्या हंगामातील मानधन व आजचे मानधन यात मोठा फरक आहे.
२००८ च्या हंगामा पासून ते २०२० पर्यंत भारताच्या या ५ खेळाडूंच्या मानधनामध्ये किती तफावत आहे-
एमएस धोनी (MS Dhoni)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा त्याने नुकताच निरोप घेतला आहे. तो पहिल्या सत्रापासून चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे.
त्या २००८ मधील हंगामाच्या लिलावात धोनीला सर्वात जास्त पैसे देऊन विकत घेतले होते. त्या हंगामात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
एमएस धोनीला सीएसके संघमालकांनी १.५ मिलियन डॉलर्समध्ये आपल्या संघात घेतले होते. तेव्हापासून गेले ११ मोसमात चेन्नई सुपर किंग्सचा केवळ भागच नाही तर कर्णधार देखील आहे.
फक्त २०१६ आणि २०१७ या २ आयपीएल मोसमात तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. कारण त्या २ मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या २ संघांवर बेटिंग आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी आली होती. सध्या तो १५ कोटी मानधन घेत आहे.
विराट कोहली (Virat Kohli)
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीत अव्वल आहे. त्याने जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून स्वतःचे नाव मोठे केलं आहे. विराट कोहलीच्या आयपीएल कारकीर्दीचा विचार केला तर तो सुरुवातीपासूनच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाकडून खेळत आहे.
आयपीएलच्या पहिल्या सत्रात विराट कोहली हा एक युवा खेळाडू होता जो भारतीय संघाचा भाग झाला नव्हता. तेव्हा त्याला आरसीबीने ३० हजार डॉलर मध्ये विकत घेतले. कालांतराने संपूर्ण क्रिकेट जगात कोहली कोहलीने त्याचे नाव गाजवले आणि आज तो या स्पर्धेचा सर्वात महागडा खेळाडू आहे, त्याला या हंगामात आरसीबी संघाकडून १७ कोटी रुपये दिले जात आहेत.
रोहित शर्मा (Rohit Sharma)
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा बादशाह म्हटले जाते. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर म्हणून रोहित शर्मा इतका यशस्वी झाला आहे की तो सध्या जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीरांपैकी एक म्हणून ओळखला जातो. रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. तो आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार असून त्याने ४ वेळा मुंबई इंडियन्सला त्याच्या नेतृत्वाखाली जेतेपद मिळवून दिले आहे.
रोहित शर्माचा आयपीएलच्या पहिल्या सत्रात डेक्कन चार्जर्सच्या संघात समावेश होता. डेक्कन चार्जर्सने त्याला ७५००० डॉलर मध्ये संघात सामील करून घेतले होते. तेव्हापासून रोहित शर्मा जबरदस्त कामगिरी करत आला आहे. अशाच कामगिरीमुळे तो मुंबई संघात २०११ वर्षांपासून खेळत आहे. सध्या रोहितला १५ कोटी रुपये दिले जातात.
सुरेश रैना (Suresh Raina)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी मध्यफळी फलंदाज सुरेश रैनाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. सुरेश रैना भारतीय क्रिकेट संघासाठी तिन्ही स्वरूपात खेळला असून मर्यादित षटकांच्या स्वरूपात त्याने दमदार योगदान दिले आहे. सुरेश रैना आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक असल्याचे सिद्ध झाले आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून रैना चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे.
त्याला चेन्नई सुपर किंग्जने २००८ मध्ये ६५००० डॉलर मध्ये खरेदी केले होते. यानंतर रैनाने आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करून स्वतःचे वेगळे स्थान बनवले. तो मधल्या हंगामात सीएसकेवर बंदी असताना गुजरात लायन्सचा देखील एक भाग होता, परंतु तो आता पुन्हा सीएसके संघात सामील झाला आहे. सध्या रैनाला सीएसकेकडून मानधन म्हणून ११ कोटी रुपये दिले जातात.