आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरात लवकर पदार्पण करून प्रदीर्घ काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटूचे असते. परंतु, प्रत्येकाच्या नशिबात असं घडतंच असं नाही.
परंतू जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग हा मिळतोच या उक्तीप्रमाणे वयाचाही विचार न करता अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव नोंदवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यात अनेकांना यश मिळतेही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साधारण ३५ वर्षानंतर निवृत्ती घेण्याचा खेळाडू विचार करण्यास सुरुवात करतात. पण असेही काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी चक्क ३५ व्या वर्षानंतर कसोटीमध्ये पदार्पण केले आहे आणि असे असूनही त्यांनी चांगली कामगिरीही केली आहे.
अशाच वयाच्या ३५ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ४ क्रिकेटपटूंची दखल या लेखात घेण्यात आली आहे.
१. बॉब हॉलंड (Bob Holland) – ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर बॉब हॉलंड यांनी नोव्हेंबर १९८४ मध्ये ३८ वर्षे ३५ दिवस वय असताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी त्यांच्या छोट्या कसोटी कारकीर्दीत फिरकीपटू म्हणून प्रभावी भूमिका बजावली.
हॉलंड यांनी जानेवारी १९८६ पर्यंत फक्त ११ कसोटी सामने खेळले होते. त्यांच्या लेगस्पिन गोलंदाजीने त्यांनी ३९.७६ च्या सरासरीने ३४ बळी मिळविले. त्यांच्या छोट्या कसोटी कारकीर्दीत त्यांनी ३ वेळा ५ विकेट्स आणि २ वेळा १० विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटी सामन्यात त्यांनी सर्वोत्तम गोलंदाजी वेस्ट इंडीज विरुद्ध डिसेंबर १९८४ मध्ये सिडनी येथे केली. त्यांनी त्या सामन्यातील एका डावात ५४ धावांत ६ विकेट्स घेतल्या.
२. डेव्ह ह्यूटन (Dave Houghton) -झिम्बाब्वे
ऑक्टोबर १९९२ मध्ये हरारे येथे भारतीय संघा विरुद्ध झिम्बाब्वेच्या डेव ह्यूटन यांनी वयाच्या ३५ वर्षे ११७ दिवसांनी कसोटीत पदार्पण केले. त्यांनी या कसोटी सामन्यात १२१ आणि नाबाद ४१ धावा केल्या होत्या.
ह्यूटनने १९९७ पर्यंत झिम्बाब्वे कसोटी संघात आपली कामगिरी बजावली. त्यांनी एकूण २२ कसोटी सामने खेळले. या कसोटी कारकीर्दीत ह्यूटन यांनी ४३.०५ च्या सरासरीने १४६४ धावा केल्या, त्यामध्ये ४ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता.
ऑक्टोबर १९९४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध बुलवायो येथे झालेल्या कसोटी सामन्यात सर्वोत्तम खेळी केली. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध द्विशतक केले होते. याव्यतिरिक्त त्यांनी ६३ वनडे सामनेही खेळले.
३. बर्ट आयर्नमॉन्गर (Bert Ironmonger) – ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा मध्यमगती गोलंदाज बर्ट आयरनमॉन्गर यांनी वयाच्या ४६ वर्षे २३७ दिवसांनी कसोटी सामन्यात पदार्पण केले. नोव्हेंबर १९२८ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात त्यांनी कसोटी पदार्पण केले.
आयर्नमॉन्गरने पहिल्या कसोटीत ४ विकेट्स मिळवल्या. त्यांनी १४ कसोटी सामन्यात १९.९७ च्या सरासरीने ७४ विकेट्स घेतल्या. फेब्रुवारी १९३३ पर्यंतच्या कसोटी कारकीर्दीत त्यांनी ४ वेळा ५ विकेट व २ वेळा १० विकेट घेतल्या.
४. अॅडम वोगेस (Adam Voges) – ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया संघातील वरच्या फळीतील फलंदाज अॅडम वोगेस याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या रोझौ कसोटी दरम्यान जून २०१५ मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्या कसोटी सामन्यादरम्यान वोगेसचे वय ३५ वर्ष २४२ दिवसांचे होते. त्या कसोटी सामन्यात वोगेसने नाबाद १३० धावा करून सामन्याचे चित्र बदललं होत.
नोव्हेंबर २०१६ पर्यंत त्याची कसोटी कारकीर्द चालू होती. वोगेसने २० कसोटी सामन्यात ६१.३७ च्या अविश्वसनीय सरासरीने १४८५ धावा केल्या. कसोटी कारकिर्दीत त्याने ५ शतके आणि ४ अर्धशतके ठोकली. त्याने त्याच्या छोट्या कसोटी कारकीर्दीत दोन द्विशतके झळकावली. २०१५ मध्ये होबर्ट कसोटी दरम्यान (डिसेंबर २०१५) वेस्ट इंडिजविरुद्ध (नाबाद २६९) दरम्यान वोगेसने पहिले कसोटी द्विशतक ठोकले.
नंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटी सामन्यात वोगेसने २३९ धावांची खेळी खेळली.
वाचनीय लेख –
२ देशांचे प्रतिनिधित्व केलेले ५ क्रिकेटपटू; एकजण खेळलाय भारत आणि पाकिस्तानकडून
मॅच-फिक्सिंगच्या आरोपामुळे बंदी घालण्यात आलेले ५ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने बाद केलेले ३ फलंदाज…