क्रिकेटला जेंटलमन म्हणजे सभ्य खेळाडूंचा खेळ असे म्हटले जाते. पण क्रिकेट हा देखील एक खेळच असल्याने त्यात २ प्रतिस्पर्धी संघ तसेच खेळाडूंमध्ये स्पर्धा पहायला मिळते. अनेकदा तर या खेळाडूंमध्ये भांडणेही होतात. काहीवेळेस अन्य खेळाडूंना किंवा पंचांना मध्यस्ती करावी लागले.
अशावेळी काही खेळाडू त्यांच्या कामगिरीतून प्रतिस्पर्धी खेळाडूला उत्तर देणे पसंत करतात. अशाच काही घटनांचा या लेखात आढावा घेतला आहेत.
योग्य वेळेची वाट पहात खेळाडूंनी जशात तसे उत्तर दिलेल्या ४ घटना
१. २०१३-१४ ऍशेस मालिका – मिशेल जॉन्सन विरुद्ध जेम्स अँडरसन
ऍशेस मालिका म्हटलं की नेहमीच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात वेगळाच जोश आणि चूरस पहायला मिळते. या मालिकेदरम्यान अनेकदा खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकही घडते. अशीच चकमक २०१३-१४ च्या ऍशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनमध्ये झाली होती.
या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून रायन हॅरिस आणि जॉन्सन फलंदाजी करत होते. त्यावेळी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्या तळातल्या फळीला लवकर बाद करण्याच्या प्रयत्नात होता. यादरम्यान अँडरसन गोलंदाजी करत असताना जॉन्सन त्याला म्हणाला, ‘मित्रा तू ओरडत का आहेस? विकेट्स मिळत नाहीत का?’
जॉन्सनची ही बडबड अँडरसनने ऐकली आणि त्याने पुढच्याच चेंडूवर हॅरिसला बाद केले. त्यानंतर अँडरसनने तोंडूावर बोट ठेवण्याची कृती करत जोरदार सेलिब्रेशन केले होते. पण त्या दोघांतील हे युद्ध पुढेही सुरु राहिले दुसऱ्या कसोटीत जॉन्सनने अँडरसन फलंदाजी करत असताना मधला स्टंम्ट उखडवत त्रिफळाचीत केले होते. त्यावेळी जॉन्सननेही तोंडावर बोट ठेवत सेलिब्रेशन केले होते. त्या मालिकेत जॉन्सनने ३७ विकेट्स घेतल्या होत्या.
२. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामना – एस श्रीसंत विरुद्ध आंद्रे निल
एस श्रीसंत नेहमीच वेगवेगळ्या कारणाने क्रिकेटवर्तुळात चर्चेत आला आहे. असाच एकदा त्याने दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आंद्रे निलने केलेल्या स्लेजिंगला सडेतोड उत्तर दिल्याने चर्चेत आला होता. २००६ ला भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पहिल्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ८४ धावांत गुंडाळत १६५ धावांची आघाडी घेतली होती.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना भारतीय संघाच्या ९ विकेट्स गेलेल्या असताना श्रीसंत फलंदाजी करत होता. त्यावेळी आंद्रे निलने त्याला काहीतरी बोलून डिवचले. त्यामुळे वैतागलेल्या श्रीसंतने त्याच्या पुढच्याच चेंडूवर निलच्या डोक्यावरुन थेट षटकार खेचला. त्यावेळी श्रीसंतने मोठा जल्लोष केला होता. विशेष म्हणजे श्रीसंतने त्या सामन्यात ८ विकेट्स घेतल्या होत्या. पण तरीही त्याचा या सामन्यातील हा षटकाराच नेहमी आठवला जातो.
३. २००७ टी२० विश्वचषक – युवराज सिंग विरुद्ध अँड्र्यू फ्लिंटॉफ
२००७ ला दक्षिण आफ्रिकेत पहिला टी२० विश्वचषक खेळवण्यात आला होता. या विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध भारत संघात झालेल्या सामन्यात युवराज सिंगने ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. त्या सामन्यात युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारण्याआधी १८ व्या षटकात इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि युवराजमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी पंचांना मधे पडावे लागले होते.
त्यावेळी फ्लिंटॉफचा राग आल्याने युवराजने आक्रमक पवित्रा स्विकारला आणि त्याने १९ व्या षटकात २१ वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ चेंडूत ६ षटकार मारले होते.
काही दिवसांपूर्वीच युवराजने फ्लिंटॉफ त्याला त्या सामन्यात काय म्हणाला होता याचा खूलासा केला आहे. त्याने सांगितले की त्याने फ्लिंटॉफच्या षटकात २ चौकार मारल्याचे त्याला आवडले नसल्याने षटक संपल्यानंतर फ्लिंटॉफने त्या चौकारांना खराब म्हटले होते. तसेच फ्लिंटॉफने त्याला गळा कापेल अशी धमकीही दिली होती.
त्यावेळी युवराजने त्याला म्हटले होते की त्याच्या हातात बॅट आहे आणि तो त्याला कुठेही मारु शकतो. तसेच त्याचवेळी युवराजने ठरवले की आक्रमक खेळायचे. अखेर युवराजच्या रागाचा बळी ब्रॉड ठरला. त्याच्या गोलंदाजीवर युवराजने ६ चेंडू ६ षटकार मारत इतिहास घडवला.
#OnThisDay in 2007…@YUVSTRONG12 v @StuartBroad8.
6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣ 😲
Six sixes in an over, and the fastest ever T20I fifty, off just 12 balls! 🔥 pic.twitter.com/xYylxlJ1b6
— ICC (@ICC) September 19, 2018
४. १९९६ विश्वचषक – वेंकटेश प्रसाद विरुद्ध अमिर सोहेल
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की त्याला एकप्रकारे युद्धाचंच स्वरुप येत. त्यातही विश्वचषकाचा सामना असेल तर आणखी चूरस दोन्ही संघांमध्ये पहायला मिळते. त्याचबरोबर विश्वचषकातील भारत – पाकिस्तानच्या सामन्यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा १९९६ च्या विश्वचषकात वेंकटश प्रसादने घेतलेली अमीर सोहेलची विकेट नेहमीच आठवली जाते.
१९९६ ला विश्वचषकात बंगळुरुला भारत विरुद्ध पाकिस्तान संघात उपांत्यपूर्व सामना झाला होता. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ४९ षटकात २८८ धावांचे लक्ष्य दिले होते. त्यावेळी अमीर सोहेल आणि सईद अन्वरने पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली.
यावेळी १५ व्या षटकात प्रसाद गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या या षटकात पहिल्या ४ चेंडूवर सोहेल-अन्वरने ५ धावा काढल्या होत्या. त्याच्या पुढच्या चेंडूवर सोहेलने कव्हर्सला चौकार मारला होता. तसेच “पुढच्या चेंडूला देखील तुला चौकार मारतो” अशा अर्थाचे हावभाव केले होते. ते पाहून प्रसाद त्यावेळी त्याला काही बोलला नाही, पण त्याने त्याच्या पुढच्याच चेंडूवर सोहेलला त्रिफळाचीत करत त्याच्या स्लेजिंगला उत्तर दिले होते.
ही विकेट भारतासाठी महत्त्वाची ठरली. पुढे जाऊन भारताने हा सामना जिंकला आणि उपांत्य सामन्यात प्रवेश केला. सोहेल आणि प्रसाद यांच्या मैदानात चकमक झाली असली तरी ते मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत.
This moment is etched forever in every cricket fan's minds. Perfect time to take everyone in a rewind!!! Happy Birthday Venkatesh Prasad! pic.twitter.com/53tudIiSA4
— BCCI (@BCCI) August 5, 2019
ट्रेंडिंग घडामोडी –
सलग ३ वर्ष ३ वेगवेगळ्या संघांकडून आयपीएल जिंकणारा खेळाडू
टाॅप ५- इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय खेळाडू
या संघाने पाहिले आहेत आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक पराभव