प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, त्याने किमान एक तरी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. मात्र, काहींना एकही विश्वचषक खेळण्याची संधी मिळत नाही. तसेच, काही जण असेही असतात, जे दोन-दोन देशांकडून वेगवेगळ्या विश्वचषकात खेळतात. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यानिमित्ताने आपण अशा 4 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी अनेक विश्वचषकात एकापेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधित्व केले आहे. चला तर, सुरुवात करूयात…
1. केप्लर वेसेल्स
यादीतील पहिले खेळाडू केप्लर वेसेल्स हे आहेत. केप्लर वेसेल्स (Kepler Wessels) यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत 1957 साली झाला होता. मात्र, त्यांनी 1982मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पहिला कसोटी आणि 1983मध्ये पहिला वनडे सामना खेळला होता. त्यांनी 1983च्या वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या मायदेशाकडून म्हणजेच दक्षिण आफ्रिकेकडून 1992चा वनडे विश्वचषक खेळला होता. त्यांच्या नावावर कसोटीत 2788 आणि वनडेत 3367 धावांची नोंद आहे.
2. अँडरसन कमिन्स
दोन देशांकडून विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी अँडरसन कमिन्स (Anderson Cummins) आहेत. अँडरसन यांचा जन्म 1966मध्ये बार्बाडोस येथे झाला होता. त्यांनी 1992मध्ये वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्यांनी थेट 2007चा वनडे विश्वचषक कॅनडा संघाकडून खेळला होता. त्यांच्या नावावर कसोटीत 98 धावा आणि 8 विकेट्स आहेत. तसेच, वनडेत त्यांनी 486 धावा आणि 91 विकेट्स घेतल्या आहेत.
3. एड जोएस
यादीतील तिसरे नाव आहे एड जोएस (Ed Joyce). जोएसचा जन्म 1978मध्ये आयर्लंड येथे झाला होता. मात्र, त्याने पहिला 2007 साली पहिला विश्वचषक इंग्लंड संघाकडून खेळला होता. त्यानंतर तो पुढील दोन्ही विश्वचषक (2011 आणि 2015) आयर्लंड संघाकडून खेळला. जोएसला फक्त 1 कसोटी सामना खेळता आला. हा सामना त्याने आयर्लंडकडून खेळला. त्यात त्याला फक्त 47 धावा करता आल्या. तसेच, वनडेत त्याच्या नावावर 2622 धावांची नोंद आहे.
4. ऑयन मॉर्गन
आयर्लंडमध्ये 1986मध्ये जन्मलेला ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) या यादीत चौथ्या स्थानी आहे. मॉर्गनने वरील तिन्ही खेळाडूंपेक्षा जास्त विश्वचषकात भाग घेतला आहे. तो 2007मध्ये पहिला विश्वचषक आयर्लंड संघाकडून खेळला होता. त्यानंतर तो 2011, 2015 आणि 2019चा विश्वचषक इंग्लंड संघाकडून खेळला. मॉर्गन इंग्लंडला आपल्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा विश्वविजेता बनवणारा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
इंग्लंड 2019 विश्वचषकाचा विजेता
इंग्लंड 2019पूर्वी कधीच वनडे विश्वचषक जिंकू शकला नव्हता. मॉर्गन 2015च्या विश्वचषकातही इंग्लंडचा कर्णधार होता, पण त्यावेळी संघ चांगली कामगिरी करू शकला नव्हता. मात्र, 2019मध्ये मॉर्गनच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडने जबरदस्त कामगिरी करत विश्वचषक आपल्या नावावर केला होता.
दोन देशांकडून वनडे विश्वचषक खेळणारे 4 खेळाडू (4 Players who played for two countries in the ODI World Cup know here)
केप्लर वेसेल्स- ऑस्ट्रेलिया (1983), दक्षिण आफ्रिका (1992)
अँडरसन कमिन्स- वेस्ट इंडिज (1992), कॅनडा (2007)
एड जोएस- इंग्लंड (2007), आयर्लंड (2011, 2015)
ऑयन मॉर्गन- आयर्लंड (2007), इंग्लंड (2011, 2015, 2019)
हेही वाचा-
भारताच्या पराभवासाठी शुबमनने स्वत:ला दिला दोष; म्हणाला, ‘माझीच चूक होती, मी…’
भन्नाट, जबरदस्त! 2023 मध्ये ‘असा’ विक्रम फक्त टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ गिललाच जमला, नजर टाकाच