वनडेमध्ये आत्तापर्यंत २६११ खेळाडूंनी एक तरी सामना खेळला आहे. यातील अनेक खेळाडूंनी धावांचा पाठलाग करताना मोठी कामगिरी करत विक्रम रचले आहेत. तसेच वनडेमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या खेळाडूंचे कौतुकही मोठ्या प्रमाणात होत असते. अशाच आत्तापर्यंत वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंचा आपण या लेखात आढावा घेणार आहोत.
वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे ५ क्रिकेटपटू (5 Batsmen With Most Runs in ODI Chases) –
१. सचिन तेंडुलकर –
क्रिकेटमधील परिपूर्ण खेळाडू म्हणून ज्याचा आदर्श घेतला जातो तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर वनडे धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत ४६३ वनडे सामन्यांपैकी २३६ वनडे सामन्यात धावांचा पाठालाग केला आहे. त्याने या २३६ सामन्यातील २३२ डावात धावांचा पाठलाग करताना ४२.३३ च्या सरासरीने ८७२० धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या १७ शतकांचा आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे.
वनडेत धावांचा पाठलाग करताना १७५ धावा ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. त्याने ही खेळी ५ नोव्हेंबर २००९ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध हैद्राबाद येथे खेळताना केली होती.
२. विराट कोहली –
भारताचा कर्णधार विराट कोहली ‘चेस मास्टर’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. धावांचा पाठलाग करताना विराटच्या कामगिरीचा आलेख नेहमीच चढत्या क्रमांकाचा राहिला आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक मोठ्या खेळी धावांचा पाठलाग करताना केल्या आहेत.
२००८ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या विराटने आत्तापर्यंत २४८ वनडे सामने खेळले आहेत. त्यातील १३८ वनडे सामन्यातील १३४ डावात विराटने धावांचा पाठलाग केला आहे. त्यामध्ये त्याने ६८.३३ च्या सरासरीने ७०३९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २६ शतकाचा आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच त्याच्याबाबतीत खास गोष्ट म्हणजे तो धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. विराटने धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च वैयक्तिक खेळी पाकिस्तान विरुद्ध ढाका येथे २०१२ ला केली होती. त्यावेळी त्याने १८३ धावा केल्या होत्या.
३. सनथ जयसुर्या –
श्रीलंकेचा परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू म्हणून सनथ जयसूर्याला ओळखले जाते. त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरवात एक गोलंदाज म्हणून केली. पण काही दिवसातच त्याच्यातील फलंदाजी कौशल्यही सर्वांना पहायला मिळाले. त्याने त्याच्या कारकिर्दीत ४४५ वनडे सामने खेळले. त्यातील २१४ सामन्यातील २१० डावात त्याने धावांचा पाठलाग केला आहे. त्यात त्याने २९.४४ च्या सरासरीने ५७४२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १० शतकांचा आणि ३० अर्धशकरांचा समावेश आहे.
त्याने धावांचा पाठलाग करताना लीड्स येथे इंग्लंड विरुद्ध २००६ ला १५२ धावांची खेळी केली होती. ही त्याची धावांचा पाठलाग करतानाची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. तो वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. याशिवाय जयसुर्याने वनडेे कारकिर्दीत ३०० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
४. जॅक कॅलिस –
दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिसला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे एक सर्वोत्तम फलंदाज म्हणूनही नावाजले गेले. त्याने १९९६ ला दक्षिण आफ्रिकेकडून वनडेमध्ये पदार्पण केले.
वनडेमध्ये त्याने खेळलेल्या ३२८ वनडे सामन्यांपैकी १६९ सामने धावांचा पाठलाग करताना खेळले आहेत. यातील धावांचा पाठलाग करताना १५८ डावात त्याने ४४.९५ च्या सरासरीने ५५७५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतके ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. तो वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
त्याने वनडेत धावांचा पाठलाग करताना १३९ धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ४ फेब्रुवारी २००४ ला वेस्ट इंडिज विरुद्ध जोहान्सबर्ग येथे केली होती. त्याचबरोबर कॅलिसने वनडे कारकिर्दीत २७३ विकेट्सही घेतल्या आहेत.
५. ख्रिस गेल – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक आक्रमक फलंदाज म्हणून ख्रिस गेलची ओळख आहे. त्याने १९९९ ला वनडेमध्ये पदार्पण केले असून तेव्हापासून त्याने आत्तापर्यंत अनेक मोठ्या आणि तुफानी खेळी केल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत ३०१ वनडे सामने खेळले आहेत. त्यातील १५३ सामन्यातील १५२ डावात त्याने धावांचा पाठलाग करताना फलंदाजी केली आहे.
त्याने १५२ वनडे डावात धावांचा पाठलाग करताना ३९.९९ च्या सरासरीने १२ शतके आणि ३४ अर्धशतकांसह ५५५९ धावा केल्या आहेत. यामध्ये धावांचा पाठलाग करताना १६२ धावांची खेळी ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी आहेत. ही खेळी त्याने २७ फेब्रुवारी २०१९ ला इंग्लंडविरुद्ध खेळताना केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी –
सुरेश रैनाने केलेत गंभीर आरोप, टीम इंडियाशी संबंधित या लोकांवर साधला निशाना
काय सांगता! कसोटीमध्ये चौथ्या डावात या ५ खेळाडूंनी केली आहे द्विशतके
अगदी कोणताही खेळाडू खेळला तरी कसोटी क्रिकेटमध्ये हे ५ विक्रम होणे जवळपास अशक्यचं