क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला कर्णधारपद मिळणे गौरवाचे मानले जाते. त्यातही जर त्या खेळाडूला विश्वचषकात संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर तो मोठा सन्मानच असतो. पण त्याचबरोबर मोठी जबाबदारीही त्या कर्णधारावर असते. कारण संघाच्या प्रत्येक हार-जीतसाठी त्याला जबाबदार धरले जाते. संघाने चांगली कामगिरी केली, तर त्याची वाहवा होते. तसेच जर संघाला वाईट पराभव स्विकारावा लागला, तरी टिकेचा धनी कर्णधाराला व्हावे लागते.
पण असे असतानाही आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक कर्णधार झाले आहेत, ज्यांनी यशाची नवनवी शिखरे गाठली आहेत. त्यांनी विश्वचषकातही अविश्वसनीय कामगिरी केली आहे. या लेखातही अशाच वनडे विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या पहिल्या ५ कर्णधारांचा आढावा घेतला आहे.
५. एमएस धोनी (MS Dhoni) – भारत
एमएस धोनी हा भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. विश्वचषक २०११ मध्ये भारतीय संघाला विजय मिळवून देत त्याने सचिन तेंडुलकरसह लाखो चाहत्यांची स्वप्ने पूर्ण केली. कपिलदेवच्या नेतृत्वात १९८३ मध्ये भारताने प्रथम विश्वचषक जिंकल्यामुळे भारताचा हा दुसरा विश्वचषक विजय होता.
२०१७ मध्ये कर्णधारपद सोडणाऱ्या धोनीने २०११ आणि २०१५ असे दोन विश्वचषकांमध्ये भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. यादरम्यान त्याने १७ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले त्यापैकी भारताने १४ सामने भारताने जिंकले आणि दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले तर एका सामन्यात बरोबरी झाली.
४. इम्रान खान (Imran Khan) – पाकिस्तान
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान जे आता पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत, ते आपल्या देशाचे सर्वात यशस्वी कर्णधारही होते. त्यांनी एकूण तीन विश्वचषकात पाकिस्तानचे नेतृत्व केले. १९९२ च्या विश्वचषकात त्यांना यश मिळाले.
त्यांनी तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये एकूण २२ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्यापैकी पाकिस्तानने एकूण १४ सामने जिंकले आणि ८ सामन्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले. १९९२ च्या विश्वचषकानंतर त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
३. सर क्लाइव्ह लॉईड (Sir Clive Lloyd) – वेस्ट इंडीज
सर क्लाइव्ह लॉईड यांनी आपल्या स्मार्ट डावपेचांनी संघाचे नेतृत्व केले. ७० आणि ८० च्या दशकात ते वेस्ट इंडीज संघाचे कर्णधार होते. जो वेस्ट इंडिज क्रिकेट इतिहासातील सुवर्णकाळ होता. क्लाइव्ह लॉईड यांचा संघ त्यावेळचा सर्वात धोकादायक संघ होता. त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज होते.
लॉईड यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजने १९७५ आणि १९७९ मध्ये दोन विश्वचषक जिंकले तर १९८३ मध्ये ते उपविजेते ठरले. लॉईडने विश्वचषकातील १७ सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व केले होते. त्यापैकी त्यांनी १५ सामने जिंकले आणि दोन सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हे दोन्ही पराभव भारताविरुद्ध त्यांना स्विकारावे लागले आहेत.
२. स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) – न्यूझीलंड
स्टीफन फ्लेमिंग हा न्यूझीलंडचा एक यशस्वी कर्णधार आहे. १९९९, २००३ आणि २००७ या तीन विश्वचषकात त्याने न्यूझीलंडचे नेतृत्व केले. परंतु त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही. विशेष म्हणजे विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या पहिल्या ५ कर्णधारांमध्ये तो असा एकमेव कर्णधार आहे ज्याने विश्वचषक जिंकलेला नाही.
एकूणच त्याने २७ विश्वचषक सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले आणि १६ सामने जिंकले तर १० सामन्यांमध्ये पराभव पत्करला आणि एक सामना अनिर्णित राहिला.
१. रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) – ऑस्ट्रेलिया
रिकी पॉन्टिंगने हा जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत गणला जाणारा खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता.
२००३ आणि २००७ मध्ये तो कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाने दोन विश्वचषक जिंकले. तसेच २०११ च्या विश्वचषकातही त्याने संघाचे नेतृत्व केले परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलियाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच मजल मारता आली.
एकूणच त्याने विश्वचषकात २९ सामन्यात कर्णधारपद सांभाळले आणि त्यापैकी २६ सामने जिंकले तर केवळ दोन सामने पराभूत झाला, एका सामन्याचा निकाल लागला नाही.
वाचनीय लेख –
असा व्यक्ती, ज्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड रातोरात मालामाल झाले
टीम इंडियाला आजपर्यंत मिळालेले ५ सर्वात युवा वनडे कर्णधार
वय तर केवळ आकडा! वयाच्या पस्तिशीनंतर कसोटीत पदार्पण करणारे ४ क्रिकेटपटू…