क्रिकेटवेड्या भारत देशात राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी क्रिकेटपटूंना जीवाचे रान करुन मेहनत करावी लागते. कोणताही क्रिकेटपटू त्याच्या देशाच्या राष्ट्रीय संघात पदार्पण करण्यापुर्वी आपापल्या राज्याच्या संघाकडून क्रिकेट खेळतो. देशांतर्गत स्तरावर खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी तसेच अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यांतील प्रदर्शनाला पाहता अनेक खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान दिले जाले जाते.
पण, बऱ्याचदा देशांतर्गत स्तरावर दमदार कामगिरी करणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना मात्र चांगली कामगिरी करण्यात अयशस्वी ठरतात. असे असले तरी, काही खेळाडूंना त्यांच्या खराब प्रदर्शनानंतरही स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते. अशावेळी खेळाडू आपले उत्कृष्ट देत संघातील नियमित सदस्य बनण्यात यशस्वी ठरतात. तर, काही खेळाडू संधी मिळाल्यानंतरही स्वत:ला सिद्ध करण्यात अयशस्वी होतात आणि परिणामत: त्यांना संघातून बाहेर करण्यात येते.
या लेखात, अशाच ५ भारतीय दिग्गजांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये तर शानदार कामगिरी केली. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर वनडेमध्ये त्यांना तो जलवा दाखवता आला नाही.
वनडे क्रिकेटमध्ये फ्लॉप ठरलेले ५ भारतीय दिग्गज – 5 Legendary Cricketers From List A Who Flopped In ODI Cricket
रॉबिन उथप्पा –
दिग्गज भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाला २००४ साली इंग्लंडविरुद्ध आपले वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. उथप्पाने संधीचे सोने करत पदार्पणाच्या सामन्यातच ८६ धावांची शानदार खेळी केली होती. संपूर्ण वनडे सामन्यात उथप्पाने केलेल्या त्या सर्वाधिक धावा होता. पण, आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरुवात करणारा उथप्पा पुढे चांगले प्रदर्शन करु शकला नाही. त्याने भारताकडून ४६ वनडे सामने खेळले आणि केवळ ९३४ धावा केल्या. एवढेच नव्हे तर, टी२० क्रिकेटमध्येही १३ सामन्यात त्याने फक्त २४९ धावा केल्या.
देशांतर्गत स्तरावरील अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १४ शतके ठोकणारा उथप्पा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही शतक ठोकू शकला नाही. उथप्पाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक स्कोर हा ८६ धावा इतकाच आहे. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने १९७ सामन्यात ६१५७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या सर्वाधिक १६९ धावांचा समावेश आहे.
उथप्पा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी करण्यात फ्लॉप ठरल्यामुळे गेली ५ वर्षे झाली तो संघातून बाहेर आहे. त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०१५ला झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता.
वसीम जाफर –
देशांतर्गत क्रिकेटचा दिग्गज म्हणून ओळखला जाणारा फलंदाज वसीम जाफर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा जलवा दाखवण्यात यशस्वी ठरला नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने शानदार फलंदाजी प्रदर्शन करत १९४१० धावा केल्या आहेत. एवढेच नव्हे तर, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ४००० धावांचा टप्पा पार केला आहे. पण हाच फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त चांगली कामगिरी करु शकला नाही.
फेब्रुवारी २०००मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत वसीम २००८पर्यंत भारतीय कसोटी संघाचा भाग होता. दरम्यान त्याने ३१ कसोटी सामने खेळत १९४४ धावा केल्या. ५० षटकांच्या वनडे क्रिकेटमध्ये तर वसीमला अवघे २ सामने खेळायला मिळाले. २००६ साली दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेतच वसीमने २ सामने खेळले. दरम्यान त्याने दोन्ही सामन्यात मिळून फक्त १० धावा केल्या. अशाप्रकारे देशांतर्गत क्रिकेटमध्ये हीट ठरलेला खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र फ्लॉप ठरला.
चेतेश्वर पुजारा –
अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजाराच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद आहे. त्याने १०३ अ दर्जाचे सामने खेळत ५४.२० सरासरीने ४४४५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ११ शतकांचा आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे. पुजाराच्या या शानदार विक्रमाला पाहता त्याला भारतीय संघात संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. पण, पदार्पणाच्या वनडे सामन्यातच हा फलंदाज केवळ १३ धावांवर बाद झाला. पुढेही त्याला वनडेत चांगली कामगिरी करता आली नाही. परिणामत: पुजाराला भारताकडून फक्त ५ वनडे सामने खेळायला मिळाले. दरम्यान त्याने १०.२०च्या सरासरीने फक्त ५१ धावा केल्या. यात त्याच्या सर्वाधिक २७ धावांचा समावेश आहे.
असे असले तरी, पुजाराची कसोची क्रिकेटमधील आकडेवारी प्रशंसनीय आहे. त्याने भारताकडून ७७ कसोटी सामने खेळत ५९४० धावा केल्या आहेत.
दिनेश कार्तिक –
दिनेश कार्तिकला अ दर्जाच्या क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटू म्हणून संबोधले जाते. कारण, त्याची अ दर्जाच्या क्रिकेटमधील आकडेवारी शानदार आहे. यष्टीरक्षक फलंदाज कार्तिकने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २३८ सामने खेळत ४०.०५च्या सरासरीने ६८९० धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा ९१.७३ इतका होता. पण, कार्तिकला वनडे क्रिकेटमध्ये हवे तसे योगदान देता आले नाही.
त्याने भारताकडून ९४ वनडे खेळत १७५२ धावा केल्या आहेत आहेत. पण, त्याची वनडेतील फलंदाजी सरासरी ही ३०.२० इतकी आहे. तर, त्याचा स्ट्राईक रेट हा ७३.२४ इतका आहे.
वृद्धिमान साहा –
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १०२ सामने खेळत ४२.०९च्या सरासरीने २७६२ धावा केल्या आहेत. पण,जेव्हा त्याला वनडे क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. साहाने भारताकडून फक्त ९ वनडे सामने खेळले आहेत. त्यातही त्याने १३.६६च्या सरासरीने फक्त ४१ धावा केल्या आहेत.
जरी साहा वनडे क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करु शकला नसला, तरी कसोटी क्रिकेटमध्ये त्याने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. साहाने भारताकडून ३७ कसोची सामने खेळत १२३८ धावा केल्या आहेत.