कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम हे भारतीय खेळाडूंच्या नावावर आहे. धावांची गोष्ट केली तर सचिन तेंडूलकर व राहुल द्रविडने विक्रमांचा रतिब घातला आहे.
सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड व सुनिल गावसकर या ३ भारतीय खेळाडूंनी कसोटीत १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तर जगातील एकूण १३ खेळाडू असे आहेत ज्यांनी कसोटीत १० हजार धावांचा हा टप्पा पार केला आहे.
परंतु सध्या खेळत असलेले काही खेळाडू असेही आहे ज्यांना १० हजार धावांचा टप्पा पार करता येऊ शकतो. 5 current batsmen who can score 10,000 runs in Test Cricket.
५. स्टिवन स्मिथ- ७२२७ धावा
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिवन पीटर डेवेरेक्स स्मिथने आपली कारकिर्द एक गोलंदाज म्हणून सुरु केली होती. पुढे जाऊन सध्याच्या क्रिकेटमधील तो एवढा मोठा कसोटीपटू होईल असा कुणी अंदाजही केला नव्हता. ३० वर्ष व ३०७ दिवस वय असलेल्या स्मिथने २०१० ते २०२० या काळात ७३ कसोटी सामन्यात ६२.८४च्या सरासरीने ७२२७ धावा केल्या आहेत. २२ मार्च २०१८ ते १ ऑगस्ट २०१९ या काळात स्मिथवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणी बंदी घातली होती. या काळात ऑस्ट्रेलिया ९ सामने खेळली व यातील एकाही सामन्यात स्मिथला खेळता आले नाही. नाहीतर कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांसाठी त्याला जास्त वाट पहावी लागली नसती.
४. राॅस टेलर- ७२३८ धावा
कसोटी, वनडे व टी२०मध्ये प्रत्येकी १०० पेक्षा जास्त सामने खेळलेला जगातील एकमेव अवलिया खेळाडू. २००७ साली कसोटी पदार्पण केलेल्या टेलरने आजपर्यंत १०१ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ४६.१०च्या सरासरीने ७२३८ धावा केल्या आहेत. टेलरचे वय सध्या ३६ वर्ष असून जर त्याने चांगली कामगिरी करत राहिला तर त्यालाही १० हजार धावांचा आकडा पार करता येईल. कठीण नक्कीच आहे परंतु अशक्य नाही.
३. विराट कोहली- ७२४० धावा
भारतीय संघाचा स्टार कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात जबरदस्त कामगिरी केलेली आहे. भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ६वा आहे. २०११मध्ये कसोटीत पदार्पण केलेल्या ३१ वर्षीय विराटने कसोटीत ८६ सामन्यात ५३.६२च्या सरासरीने ७२४० धावा केल्या आहेत. विराटने यात महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत २०२३ नंतर तो कसोटी क्रिकेटला प्राधान्य देईल असे अप्रत्यक्ष सांगितले आहे. त्यामुळे विराटसाठी १० हजारांचा टप्पा सध्यातरी एकदम सोपा वाटत आहे.
२. डेविड वाॅर्नर- ७२४४ धावा
ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेविड वाॅर्नरलाही कसोटीत १० हजार धावांचा टप्पा सहज पार करता येऊ शकतो. २०११ साली कसोटी पदार्पण केलेल्या वाॅर्नरने ८४ कसोटीत ४८.९४च्या सरासरीने ७२४४ धावा केल्या आहेत. स्टिवन स्मिथप्रमाणे २२ मार्च २०१८ ते १ ऑगस्ट २०१९ या काळात वाॅर्नरवरही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणी बंदी घातली होती. त्यालाही त्याच्याही ९ कसोटी या काळात खेळता आल्या नाहीत. सध्या वाॅर्नरचे वय ३३ वर्ष असून त्याला हा सलामीवीर असल्याने हा पराक्रम करण्याची संधी लवकर मिळू शकते.
१. ज्यो रुट- ७५९९ धावा
इंग्लंडचा कसोटी कर्णधार असलेला ज्यो रुट एका अशा देशाचं नेतृत्त्व करतो जो कसोटी सामन्यांना प्रचंड महत्त्व देतो. याचमुळे जेमतेम ८ वर्षात रुटला ९४ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यात २९ वर्षीय खेळाडूने ४८.४०च्या सरासरीने ७५९९ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा कऱणाऱ्या खेळाडंच्या यादीत रुट १०व्या स्थानी आहे. रुटने कारकिर्दीत अजून ५ हजार कसोटी धावा केल्या तर इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होऊ शकतो.
या खेळाडूंनाही आहे संधी
याच बरोबर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलीयर्सला देखील कसोटीत १० हजार धावांचा टप्पा पार कऱण्याची संधी आहे. त्याने जर क्रिकेटमध्ये पुनरागम केले तर तो हा कारनामा करु शकतो. सध्या त्याच्या नावावर ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५ धावा आहेत व वय आहे ३६ वर्ष. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियनसनला देखील हा पराक्रम कऱण्याची संधी आहे. २९ वर्षीय विलीयनसनने ८० कसोटीत ५०.९९च्या सरासरीने ६४७६ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
–या ५ खेळाडूंना आहे वनडेत १० हजार धावा करण्याची संधी, एक नाव आहे भारतीय
–वनडेत १० हजार धावा, १०० विकेट व १०० झेल घेणारे फक्त ६ खेळाडू, दोन आहेत भारतीय
–जेन्हा सचिन विराटने १० हजार धावांचा टप्पा पार केला तेव्हा घडले होते बाप योगायोग