क्रिकेटमध्ये अनेकदा तळातील फलंदाजांवर धावा करुन संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी येते. अशावेळी अनेक खेळाडूंनी चांगल्या धावा करत पराक्रम केले आहेत. अगदी असे गोलंदाज आहेत जे ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करतानाही कमाल करतात. अनेकदा ते १० व्या विकेटसाठी चांगली भागीदारी करत प्रतिस्पर्धी संघाला संघर्ष करायला लावतात. असेच वनडेत ११ व्या क्रमांकावर सर्वोच्च धावा करणाऱ्या पहिल्या ५ खेळाडूंचा घेतलेला आढावा –
वनडेत ११ व्या क्रमांकावर सर्वोच्च धावा करणारे फलंदाज –
५ – पिटर ओंगोंडो – ४२ चेंडूत ३६ धावा
२००१ मध्ये वेस्ट इंडिज संघाने केनियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने सहज जिंकला होता. दुसऱ्या वनडेतही त्यांची चांगली कामगिरी होत होती.
दुसऱ्या वनडेत केनियाने प्रथम फलंदाजी करताना १२६ धावातच ९ विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी पिटर ओंगोंडो ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने जीमी कामांडेला चांगली साथ द्यायला सुरुवात केली. या दोघांनी मिळून १० विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. पण अखेर ख्रिस गेलने ओंगोंडोला ३६ धावांवर बाद करत केनियाचा डाव १९२ धावांवर संपुष्टात आणला.
ओंगोंडोने या खेळीत २ चौकार आणि १ षटकार मारला होता. ११ व्या क्रमांकाच्या खेळाडूने वनडेत केलेल्या ही ५ व्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. नंतर वेस्ट इंडिजने १९३ धावांचे लक्ष्य पूर्ण करत हा सामना जिंकून मालिकाही खिशात घातली.
४. जोएल गार्नर – २९ चेंडूत ३७ धावा
१९८३ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजचा भारताशी पहिला सामना झाला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. यावेळी भारताने यशपाल शर्माच्या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर २६२ धावा केल्या होत्या. त्यानंतर २६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघाची अवस्था १५७ धावांवर ९ विकेट अशी झाली होती.
त्यावेळी जोएल गार्नर मैदानात आले आणि त्यांनी अँडी रॉबर्ट्सला साथ द्यायला सुुवात केली. या दोघांनीही एकेरी दुहेरी धावांवर लक्ष देताना भारतीय गोलंदाजांना सतावले. त्यांनी ७१ धावांची भागीदारी केली. अखेर रवी शास्त्रीच्या चेंडूवर गार्नर यांना सय्यद किरमाणी यांनी यष्टीचीत केले.
गार्नर २९ चेंडूत १ षटकारासह ३७ धावा करुन बाद झाले. ही ११ व्या क्रमांकाच्या खेळाडूने केलेली चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. हा सामना वेस्ट इंडिज ३४ धावांनी पराभूत झाला होता.
३. मखाया एन्टीनी – ३५ चेंडूत नाबाद ४२ धावा
२००४ ला दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असताना ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडने ४-१ ने आघाडी घेतली होती. पण मालिका पराभूत झाली असली तरी दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात होता. ६ व्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली होती. मात्र त्यांची फलंदाजी ११९ धावांत ९ विकेट्स अशी गडगडली.
पण त्याचवेळी मखाया एन्टीनीने ११ व्या क्रमांकावर एल्बी मॉर्केलला भक्कम साथ दिली. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारत ३५ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. या ११ व्या क्रमांकाच्या फलंदाजाने वनडेत केलेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा आहेत.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ५० षटकार १८६ धावा केल्या. पण न्यूझीलंडने मायकल पाप्सने कलेल्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर १८७ धावांचे आव्हान सहज पार करत हा सामना जिंकला आणि मालिका ५-१ ने जिंकली.
२. शोएब अख्तर – १६ चेंडूत ४३ धावा
२००३ च्या विश्वचषकात पाकिस्तानकडून इंग्लंड विरुद्ध शोएब अख्तरने ११ व्या क्रमांकावर खेळताना आक्रमक खेळी केली होती. या सामन्यात इंग्लंडने २४७ धावांचे आव्हान पाकिस्तान समोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना जेव्हा ११ व्या क्रमांकावर शोएब अख्तर फलंदाजीला आता तेव्हा पाकिस्तानची आवस्था ९ बाद ८० धावा अशी होती.
अशा स्थितीत अख्तरने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारताना केवळ १६ चेंडूत ४३ धावा केल्या. पण अखेर फ्लिंटॉफने त्याला बाद केल्याने पाकिस्तानचा डाव १३४ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने हा सामना ११२ धावांनी सहज जिंकला.
१. मोहम्मद अमीर – २८ चेंडूत ५८ धावा
वनडेमध्ये ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना केवळ मोहम्मद अमीरलाच अर्धशतकी खेळी करता आली आहे. त्याने २०१६ ला इंग्लंड विरुद्ध ट्रेंट ब्रिजला झालेल्या सामन्यात अर्धशतक केले होते. त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून ऍलेक्स हेल्सने केलेल्या १७१ धावांच्या जोरावर आणि रुट, बटलर, मॉर्गनने केलेल्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने विक्रमी ४४४ धावांचा डोंगर उभारला.
यानंतर ४४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची अवस्था १९९ धावांवर ९ बाद अशी झाली होती. यावेळी मोहम्मद अमीर यासिर शहाला साथ देण्यासाठी ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्यांनी ७६ धावांची भागीदारी केली. पण वोक्सने अमीरला बाद करत पाकिस्तानचा डाव संपुष्टात आणला आणि हा सामनाही जिंकला.
अमीरने ५ चौकार आणि ४ षटकार मारताना २८ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. ही ११ व्या क्रमांकाच्या फलंदाजाने वनडेत केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
लहानपणी तुम्ही ऐकलेल्या क्रिकेटबद्दलच्या ५ खोट्या गोष्टी
हा महान खेळाडू म्हणतो, माझ्यामुळे धोनी-कोहलीसारखे हिरे मिळाले भारताला
रक्कम उघड न करता स्टार कबड्डीपटूने केली मदत…