भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५३८ सामने खेळताना १७ हजारांपेक्षा अधिक धावा केल्या. एवढेच नाही तर त्याने ३०० पेक्षा अधिक सामन्यात नेतृत्वही केले. तो भारतीय संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खूप यशस्वी ठरला. परंतु या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे काही भारतीय क्रिकेटपटूंमध्ये मतभेद असल्य़ाच्याही चर्चा झाल्या. या लेखात त्या ५ भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांचे एमएस धोनीशी वाद झाल्याची चर्चा होती.
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)
२००७ मध्ये टी-२० विश्वचषकादरम्यान वीरेंद्र सेहवाग आणि एमएस धोनी यांच्यात पहिल्यांदाच मतभेद झाल्याची चर्चा समोर आली. अंतिम सामन्यात युवा फलंदाज युसुफ पठाणला संधी देण्याच्या कारणारे धोनीने सेहवागशी संबंध खराब झाल्याचे म्हटले गेले होते.
२००८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सीबी मालिकेदरम्यान या दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचे वृत्त आले. धोनीने सेहवागला या मालिकेतील काही सामन्यात बाहेर बसायला लावले होते. धोनी म्हणाला की सेहवाग पूर्णपणे फिट नाही, परंतु सेहवागने याचा विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धोनीने सेहवागच्या जागी रॉबिन उथप्पाला अंतिम अकरामध्ये खेळवल्याने प्रकरण आणखीनच पेटले होते.
२००९ मधील टी-२० विश्वचषकात पुन्हा नवीन वाद समोर आला. विश्वचषकात खांद्याची दुखापत लपवून सेहवाग संघात दाखल झाला. या प्रकारामुळे धोनीला संघात कोणताही मतभेद नसल्याचे जाहीरपणे स्पष्टीकरण द्यावे लागले. सेहवागने विश्वचषकानंतर आपल्या एका विधानावरून हा वाद पुन्हा वाढवला. सेहवागने कर्णधारपदासाठी तयार असल्याचे सांगून उपकर्णधार होण्यास नकार दिला.
गौतम गंभीर (Gautam Gambhir)
जानेवारी ते फेब्रुवारी २०१२ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर गेला होता. भारतीय संघाने तेथे ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका विरुद्ध तिरंगी वनडे मालिका खेळली. एमएस धोनीने या मालिकेत रोटेशन पॉलिसी आणली. या अंतर्गत विश्वचषक २०१५ चा विचार करून संघातील तीन ज्येष्ठ खेळाडूंपैकी केवळ दोनच खेळाडू अंतिम अकरामध्ये खेळू शकतील, असे मत त्याने मांडले.
या रोटेशन पॉलिसीचा उपयोग सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्यावर केला जाणार होता. या तीन दिग्गजांपैकी केवळ २ खेळाडूच अंतिम संघात खेळणार होते. परंतु धोनी या रोटेशन धोरणात पूर्णपणे अपयशी ठरला, कारण भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता आणि भारतीय संघ या तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीपर्यंत देखील पोहोचू शकला नव्हता.
नंतर गौतम गंभीरने आपल्या एका मुलाखतीत धोनीचे रोटेशन पॉलिसी चुकीची असल्याचे म्हटले आणि गंभीरने धोनीविरोधात अशी बरीच वादग्रस्त विधाने केली.
अजित आगरकर (Ajit Agarkar)
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा सर्वात मोठा मतभेद कोणाबरोबर तर तो निश्चितच माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकर याच्या बरोबर. माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकरने आपल्या वक्तव्यातुन एमएस धोनीवर अनेकदा निशाणा साधला आहे. त्याची कारकीर्द संपवण्यासाठी तो धोनीला जबाबदार मानतो. त्या कारणास्तव तो धोनीविरुद्ध थेट बोलण्यास कोणताही विचार करत नाही.
अजित आगरकरने काही वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची वनडे मालिका गमावली होती तेव्हा त्याने धोनीच्या संघातील असलेल्या जागेवर प्रश्न उपस्थित केला होता. आगरकरने ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले की, ‘निवड समितीने आता एमएस धोनीकडे कर्णधार आणि खेळाडू म्हणून बारकाईने पाहावे आणि त्याच्या कामगिरीचा आढावा घ्यावा. जर त्याची कामगिरी पुढे चांगली राहिली नाही. तर त्याऐवजी काही पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे.
युवराज सिंग (Yuvraj Singh)
स्पोर्ट्स तकला दिलेल्या एका मुलाखतीत युवराज सिंगने स्पष्टपणे सांगितले होते की, त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याला धोनीचा पाठिंबा मिळाला नाही. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान धोनीला खेळाडूंची निवड करताना खूप विचार कसा करावा लागला, असे युवराज सिंगने सांगितले.
अंतिम ११ जणांच्या संघात धोनीपुढे युसूफ पठाण, सुरेश रैना आणि स्वतः युवराज सिंग असे पर्याय होते. धोनी रैनाच्या बाजूने होता, असे त्याने स्पष्टपणे सांगितले, परंतु डाव्या हाताच्या गोलंदाजीमुळे युवराजला अंतिम ११ मध्ये स्थान देण्यात आले. युवराज सिंगने ‘स्पोर्ट्स तक’ यूट्यूब चॅनलला सांगितले,
“त्यावेळी सुरेश रैनाला धोनीचा खूप पाठिंबा होता. धोनीची त्याला खूप साथ होती. प्रत्येक कर्णधारांचे त्यांचे आवडते खेळाडू असतात आणि मला असे वाटते की त्यावेळी माही सुरेश रैनाला भरपूर साथ देत होता. मला त्यांचा पाठींबा कधी मिळाला नाही,” असे युवराज काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. त्यामुळेही धोनी आणि युवराजमध्ये मतभेदाच्या चर्चा झाल्या होत्या.
इरफान पठाण (Irfan Pathan)
इरफान पठाण त्याच्या कारकिरर्दीच्या सुरुवातीला शानदार स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जात होता. पहिली २-३ वर्षे त्याने आपल्या शानदार स्विंग गोलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडविली होती. कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शानदार स्विंग गोलंदाजी करत त्याने हॅटट्रिकही घेतली होती. संपूर्ण पाकिस्तान दौर्यादरम्यान त्याने शानदार कामगिरी करून मोठे नाव कमावले होते.
गांगुलीनेही या गोलंदाजाला जोरदार पाठिंबा दिला, परंतु कर्णधारपद एमएस धोनीच्या हातात गेले आणि इरफान पठाण संघातून बाहेर होत राहिला. शेवटी त्याने परतीची आशा सोडली आणि अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा केली. अलीकडेच त्याने एक विधान केले होते, ज्यात तो म्हणाला की धोनीचा पाठिंबा आपल्याला कधी मिळाला नाही.