भारतात अनेक असे क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. परंतु असेही क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी निवड समितीच्या विरुद्ध जाऊन भाष्य केले होते. त्यामुळे त्यांना पुढे खेळायची अधिक संधी मिळाली नाही. परिणामत: काहींना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकावा लागला तर काहींना त्यानंतर संघात पुरेशी संधी मिळाली नाही. अशाच काही दुर्देवी भारतीय क्रिकेटपटूंचा येथे आढावा घेण्यात आला आहे.
१) अंबाती रायुडू : भारतीय संघासाठी गेले काही वर्ष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंबाती रायुडूला विश्वचषक २०१९ स्पर्धेत स्थान देण्यात आले नव्हते. त्याच्या ऐवजी विजय शंकरला स्थान दिले गेले होते. विजय शंकरला संघात स्थान देताना मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी म्हटले होते की, “तो संघासाठी थ्रीडी कामगिरी करेल.” याच वक्तव्यावर अंबाती रायडूने ट्विट करत लिहिले होते की, ‘मी विश्वचषक स्पर्धा पाहण्यासाठी, थ्रीडी चष्म्याची ऑर्डर दिली आहे.’ त्यानंतर विजय शंकर आणि शिखर धवन यांना दुखापत झाली होती. तरीदेखील रायुडूला संघात स्थान देण्यात आले नव्हते. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसला नाही.
२) मुरली विजय : भारतीय कसोटी संघातील महत्त्वपूर्ण खेळाडूंपैकी एक मुरली विजय याला अचानक संघातून वगळण्यात आले होते. २०१८ मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला होता. तेव्हा मुरली विजयने पहिला सामना खेळला होता. त्यानंतर त्याला बेंचवर बसवण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्याला संघाबाहेर देखील काढण्यात आले होते. मुरली विजयची निवड न झाल्यामुळे त्याने निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्याने विचारले होते की, “मला का वगळण्यात आले हे तरी सांगावे.” मुरली विजयच्या या वक्तव्यावर पडदा पडला आणि त्याला पुन्हा कधीही भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.
३) वसिम जाफर : देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वसिम जाफरने देखील भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. परंतु काही काळानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याने लिहिले होते की, ‘निवडकर्त्यांवर कसा प्रभाव पाडावा हे मला माहित नाही. मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १३,००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. गेल्या रणजी हंगामात मी १२६० धावा केल्या आहेत. मला असे वाटत नाही की निवडकर्त्यांचे या गोष्टीकडे लक्ष दिले आहे.’ त्यानंतर वसीम जाफरला संघात स्थान देण्यात आले नव्हते. अखेर मार्च २०२० मध्ये त्यांनी निवृत्ती जाहीर केली होती.
४) फैज फजल : रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भ संघाला सलग २ वेळेस जेतेपद मिळवून देणाऱ्या फैज फजलला निवड समितीने नेहमी दुर्लक्ष केले होते. जेव्हा फैज फजलला भारतीय संघातून बाहेर करण्यात आले होते. तेव्हा त्याने ट्विट करत, निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्याने ट्विट करत लिहिले होते की, ‘आम्ही सलग २ वेळेस रणजी ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे.’ त्यावेळी फैज फजलने ७०.१५ च्या सरासरीने ९१२ धावा केल्या होत्या.
५) मनोज तिवारी : भारतीय संघातून वगळल्यानंतर मनोज तिवारीने देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने २०१७ मध्ये १२७ च्या सरासरीने ५०७ धावा केल्या होत्या. तरी देखील त्याला दुर्लक्ष केले गेले होते. त्यानंतर तिवारीने निवड समितीवर प्रश्न उपस्थित करत लिहिले होते की, ‘इतक्या धावा केल्या तरीही, आपण एखाद्या खेळाडूसोबत असे कसे करू शकता.’ मनोज तिवारीला हे विधान खूपच भारी पडले होते. त्यानंतर त्यांला पुन्हा संघात संधी मिळू शकली नाही. अखेर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेत राजकारणाची वाट धरली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मिसेस आफ्रिदी कुठ आहेत’? आफ्रिदीच्या जावयाच्या कुशीत दिसलं चिमुकलं बाळ; आल्या भन्नाट प्रतिक्रिया
धोनीच्या काळात हिरो असलेला ‘कुलदीप’ आता राहतोय दुर्लक्षित; ‘या’ ३ कारणांमुळे करावा लागतोय संघर्ष
कोरोनामुळे माजी भारतीय अष्टपैलू हरपला, तब्बल १४८ विकेट्स घेणारे जडेजा कालवश