ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत चौथ्या कसोटी सामन्यात १५७ धावांनी विजय मिळवला आहे. यासह ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात अनेक उतार चढाव आले. परंतु, भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी कुठेही न डगमगता इंग्लंड संघावर ऐतिहासिक विजय मिळवला.
भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने इंग्लंड संघाचा डाव अवघ्या २१० धावांवर गुंडाळला. चला तर जाणून घेऊया ५ अशी प्रमुख कारणे ज्यामुळे भारतीय संघाने मिळवला ऐतिहासिक विजय.
१)शार्दुल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर भारतीय संघाच्या विजयाचे प्रमुख कारण ठरला. शार्दुलने या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ५७ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात देखील त्याने ६० धावांचे बहुमूल्य योगदान दिले. त्याने अप्रतिम फटकेबाजी करत रिषभ पंत सोबत महत्वपूर्ण भागीदारी केली. यासह त्याने भारतीय संघाला मोठी आघाडी मिळवून दिली होती.
त्यानंतर गोलंदाजी करताना दाखल जो रूटला दोन वेळेस त्रिफळाचित केले. तसेच दुसऱ्या डावात रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद यांची शतकी भागीदारी देखील तोडली होती. त्यामुळेच शार्दुल ठाकूर या विजय मिळवण्यामागचे प्रमुख कारण ठरला आहे.
२) रोहित शर्माचे शतक
या संपूर्ण मालिकेत रोहित शर्माने जबरदस्त फलंदाजी केली आहे. ओव्हल कसोटीत देखील भारतीय संघ अडचणीत असताना रोहित शर्माने शतक झळकावून भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली होती. त्याने या डावात १२७ धावांची खेळी केली होती. रोहितने शतक झळकावले, त्यामुळेच भारतीय संघाला मोठी आघाडी घेता आली. भारतीय संघाकडे मोठी आघाडी नसती, तर या सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता. या खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
३) विराट कोहलीचे नेतृत्व
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. त्याने पहिल्या डावात ५०, तर दुसऱ्या डावात ४४ धावांची खेळी केली होती. ही खेळी जरी छोटी असली तरी देखील ही खेळी अत्यंत महत्वाची होती. यासह विराट कोहलीच्या नेतृत्वाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. कारण या सामन्यात त्याने गोलंदाजांचा योग्य वापर केला होता.
खेळपट्टीतून मदत मिळत नव्हती, परंतु त्याने योग्यवेळी योग्य गोलंदाज आणि अचूक क्षेत्ररक्षण सजवून इंग्लंडच्या फलंदाजांना जाळ्यात अडकवले होते. शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या १० फलंदाजांना बाद करून सामना जिंकवण्यात विराट कोहलीने देखील तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
४) उमेश यादव आणि जसप्रीत बुमराहची धारदार गोलंदाजी
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी १० इंग्लिश फलंदाजांना बाद करायचे होते. हे काम सोपे नव्हते कारण, सपाट खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत नव्हती. ज्यामुळे इंग्लिश खेळाडू घरच्या परिस्थितीचा फायदा घेत घातक ठरू शकले असते. परंतु, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी अप्रतिम यॉर्कर चेंडू टाकून इंग्लंड संघातील फलंदाजांना अडचणीत टाकले होते.
उमेश यादवने या सामन्यात एकूण ६ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराहने एकूण ४ गडी बाद केले होते. जर हे दोघेही गोलंदाज या सामन्यात फ्लॉप ठरले असते, तर भारतीय संघाला हा सामना जिंकता आला नसता.
५) चेतेश्वर पुजाराची फलंदाजी
चेतेश्वर पुजाराने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन मोलाचे योगदान दिले. पुजारा पहिल्या डावात स्वस्तात माघारी परतला होता. परंतु, दुसऱ्या डावात त्याने रोहित शर्मा सोबत मिळून १५३ धावांची भागीदारी केली होती. यासह ६१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. पुजाराच्या खेळीने भारतीय संघाला मोठी आघाडी घेण्यात मदत केली होती. यासह रोहित शर्माला देखील मनमोकळेपणाने खेळता आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्याच्यामुळे सामन्यात फरक पडला’, विराटने रोहितला नव्हे, तर ‘या’ खेळाडूला दिले विजयाचे श्रेय
मँचेस्टर कसोटीत ‘हिटमॅन’ मैदानात उतरणार का? दुखापतीबाबत स्वतः रोहित शर्माने दिली मोठी अपडेट
आयपीएल पदार्पणासाठी ‘हे’ सात खेळाडू आहेत सज्ज; १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात झालेत सामील