“क्रिकेट हा एक अतिशय रोमांचक असा खेळ आहे.” बहुतेक वेळा सामन्याच्या निकालाचा अंदाज आपल्याला आधीच येतो. परंतु, बऱ्याच वेळा सामन्याच्या शेवटच्या क्षणी खेळात असा काही बदल घडतो की सामन्याचे चित्र बदलून जाते. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असे म्हटले जाते.
वनडे आणि टी२०मध्ये असे तर बऱ्याचदा झाले आहे की सामन्याचा निकाल अगदी शेवटच्या चेंडूवर लागला आहे. या लेखात अशा ५ वनडे सामन्यांचा आढावा घेतला आहे, ज्यात एखादा संघ पराभूत होईल असे वाटत असतानाच त्या संघाने शेवटच्या क्षणी जबरदस्त पुनरागमन करत सामन्यात विजय मिळवला,
वनडेत पाच अविश्वसनीय पुनरागमन झालेले सामने –
५. १७ जानेवारी २०१४, अॅडलेड – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
पाच सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा वनडे सामना होता. त्या सामन्यापूर्वी यजमान ऑस्ट्रेलियाने त्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ओयन मॉर्गनच्या १०६ धावांच्या मोबदल्यात ५० शतकांत ३००/९ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलिया संघ धावांचा पाठलाग करताना झगडत होता. ऑस्ट्रेलिया जेव्हा ३५ व्या षटकात २०६/७ वर संघर्ष करत होता तेव्हा जेम्स फॉल्कनर (James Faulkner) फलंदाजीस आला.
४४ व्या षटकात यजमान ऑस्ट्रेलिया संघ अधिक अडचणीत सापडला. आता शेवटच्या सहा षटकांत ५७ धावा करायच्या होत्या आणि शेवटची विकेट शिल्लक होती.
शेवटचा फलंदाज क्लिंट मॅके (Clint McKay) मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर फॉल्कनरने सर्व सूत्र आपल्या हाती घेण्याचा निर्णय घेतला आणि शक्य तितक्या स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. फॉल्कनरने ४९ व्या षटकात ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
आता ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात १२ धावांची आवश्यकता होती. फॉल्कनरने शेवटच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंत तीन चौकार मारले आणि त्याने ४७ चेंडूत (३ चौकार आणि ५ षटकार) नाबाद ६९ धावा काढून एक गडी राखून संघाला विजय मिळवून दिला.
४. ३ नोव्हेंबर २०१०, मेलबर्न – श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२०१० मध्ये श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मेलबर्न येथे झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ५० षटकांत २३९/८ धावा केल्या. त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाज मायकेल हसीने नाबाद ७१ धावा केल्या.
प्रतिउत्तरात श्रीलंकेने कोणतीही लक्षणीय भागीदारी न करता एकामागोमाग एक गडी गमावले. त्यांची २६ व्या षटकात १०७/८ अशी अवस्था होती. श्रीलंका संघाचा पराजय समोर दिसत होता, पण अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) आणि लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) नवव्या विकेटसाठी १३२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्या.
४४ व्या शतकात मलिगा ४८ चेंडूत ५६ धावा (६ चौकार आणि २ षटकार) करून धाव बाद झाला. धावसंख्या बरोबरीत होता. पण पुढच्या षटकातील दुसर्या चेंडूवर मुथय्या मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) षटकार मारत श्रीलंका संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेने तो सामना एक विकेट ३४ चेंडू राखून जिंकला. त्या सामन्याचा “सामनावीर” पुरस्कार मॅथ्यूजला मिळाला. तो ८४ चेंडूत ७७ धावांवर (८ चौकार आणि १ षटकार) नाबाद राहिला.
३. १८ जून १९८३, ट्यूनब्रिज वेल्स – भारत विरुद्ध झिम्बाब्वे
आयसीसी क्रिकेट विश्वचषक १९८३ (ग्रुप – बी) च्या स्पर्धेतील भारतीय संघासाठी झिम्बाब्वेविरुद्ध मिळवलेला विजय महत्त्वपूर्ण होता. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघ फलंदाजी स्वीकारून मैदानात उताराला. पण सुरुवातीपासूनच संघ अडचणीत सापडत गेला, भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) जेव्हा मैदानामध्ये आला तेव्हा भारत ९/४ अशा दयनीय अवस्थेत खेळत होता.
मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी कपिलला विकेटवर टिकून राहण्यास मदत केली, तरीही संघाची अवस्था ७८/७ अशी होती. पण त्यावेळी कपिल यांनी केवळ भारताचे पहिले वनडे शतकच नोंदवले नाही, तर त्याने ६० षटकांपर्यंत खेळ नेला. त्याने सहाव्या विकेटसाठी रॉजर बिन्नी (Roger Binny) (२२) यांच्यासह ६२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मदन लाल (Madan Lal) (१) यांच्यासह आठव्या विकेटसाठी आणखी ६२ धावांची भागीदारी रचली आणि अखेर यष्टिरक्षक-फलंदाज सय्यदसह नवव्या विकेटसाठी १२६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. सय्यद किरमानी (Syed Kirmani) यांनी ५६ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या.
अखेरीस भारतीय कर्णधार कपिल देवने १३८ चेंडूत नाबाद १७५ धावांची जबदस्त खेळी केली, त्यात १६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. त्यावेळी वनडेमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. त्याच्या फलंदाजीमुळे भारतीय संघाला २६६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. प्रत्युत्तरादाखल भारताने झिम्बाब्वेला २३५ धावांत सर्वबाद केले आणि हा महत्त्वपूर्ण सामना ३१ धावांनी जिंकला.
२. १३ जुलै २००२, लॉर्ड्स – इंग्लंड विरुद्ध भारत
२००२ च्या नेटवेस्ट तिरंगी मालिकेचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध भारत संघात झाला होता. भारतीय क्रिकेट इतिहासामधील हा सर्वात मोठा विजय मानला जातो. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंड संघाने सलामीवीर मार्कस ट्रेस्कोथिक (Marcus Trescothick) १०९ धावा आणि कर्णधार नासेर हुसेन (Nasser Hussain) ११५ धावा, या दोन शतकांच्या मदतीने ५० षटकांत ३२५ धावांचा डोंगर भारता समोर उभा केला.
प्रत्युत्तरादाखल भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी पहिल्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण अचानक भारतीय फलंदाजी कोसळत गेली आणि २४ व्या षटकात १४६/५ अशी भारताची अवस्था झाली. या अवस्थेतून युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) या युवा खेळाडूंनी भारतीय संघाची पराभवातून सुटका केली.
युवराज-कैफने सहाव्या विकेटसाठी १२१ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. युवराजची ६९ धावांवर विकेट गेल्यानंतर कैफने त्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावली. सातव्या विकेटसाठी कैफने हरभजन सिंग (Harbhajan Singh) (१५ धावा) याच्यासह ४७ धावांची अजून एक महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
अंतिम षटकात भारत विजयापासून २ धावा मागे होता आणि त्यांच्याकडे अजूनही दोन विकेट बाकी होत्या. एंड्रयू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यास आला. त्या षटकातील पहिले दोन चेंडू सलग निर्धाव (डॉट) गेले. झहीर खानने (Zaheer Khan) त्या अंतिम षटकातील तिसर्या चेंडूवर विजयी दोन धावा काढल्या आणि सामना भारताने जिंकला. २ विकेट आणि फक्त ३ चेंडू राखून भारताने हा विजय मिळवला. धावांचा पाठलाग करताना कैफ ७५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार मारत ८७ धावांवर नाबाद राहिला.
याच सामन्यानंतर गांगुलीने लॉर्ड्स बाल्कनीत टी-शर्ट काढून फिरवला होता.
१. २ मार्च २०११, बेंगळुरू – इंग्लंड विरुद्ध आयर्लंड
आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०११ (ग्रुप बी) मधील १५ वा सामना इंग्लंड विरुद्ध आर्यंलड संघात झाला होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी ५० षटकांत पीएटरसेन (५९), ट्रॉट (९२), आणि बेल (८१) यांच्या अर्धशतकीय खेळीच्या मदतीने ३२७/८ अशी मोठी धावसंख्या रचली.
त्या विशाल धावांचा पाठलाग करताना आयर्लंड संघाने काहीशी संघर्षमय सुरुवात केली. २५ व्या षटकात १११/५ अशी संघाची बिकट अवस्था होती. दरम्यान, केव्हिन ओ ब्रायन २३ व्या षटकात फलंदाजीला आला. २५ व्या षटकानंतर त्याने जलद गतीने धावा करत जबरदस्त खेळी केली.
अवघ्या १७ षटकांत केव्हिनने सहाव्या विकेटसाठी अलेक्स क्युसॅकबरोबर १६२ धावांची भागीदारी रचली. केविनने ५० चेंडूत शतक झळकावले आणि हे विश्वचषकातील जलद गतीने केले शतक ठरले होते. क्युसॅक ४७ धावांवर बाद झाल्यानंतरही केव्हिनने वादळी फलंदाजी सुरू ठेवली आणि जॉन मूनीसह सातव्या विकेटसाठी ४४ धावांची आणखी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
४९ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर केव्हिन केवळ ६३ चेंडूत १३ चौकार आणि ६ षटकार मारून ११३ धावांवर बाद झाला. पण आयर्लंडने पुढच्या सहा चेंडूंमध्ये आणखी विकेट न गमावता शानदार विजय मिळविला.
आयर्लंडने हा सामना ५ चेंडू आणि ३ गडी राखून जिंकला. जॉन मूनी ३० चेंडूत ३३ धावांवर नाबाद राहिला तर ट्रेंट जॉन्सनने नाबाद ७ धावा केल्या.
वाचनीय लेख –
क्रिकेट समजलेला माणूस: जगमोहन दालमिया
वय तर केवळ आकडा! वयाच्या पस्तिशीनंतर कसोटीत पदार्पण करणारे ४ क्रिकेटपटू…
२ देशांचे प्रतिनिधित्व केलेले ५ क्रिकेटपटू; एकजण खेळलाय भारत आणि पाकिस्तानकडून