टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये सोमवारी (२६ जुलै) मजेशीर सामने पाहायला मिळाले. एकीकडे जपानच्या १३ वर्षीय मुलीने स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले, तर दुसरीकडे कुवेतच्या ५७ वर्षीय नेमबाजानेही आपले ऑलिंपिकमधील दुसरे पदक जिंकले.
कुवेतचे ५७ वर्षीय अब्दुल्लाह अल- रशिदी यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या स्कीट नेमबाजी खेळात कांस्य पदक पटकावले. अल- रशिदी यांचे हे ऑलिंपिकमधील दुसरे पदक होते. असे असले, तरीही कुवेतसाठी हे त्यांचे पहिलेच पदक होते. (57-year-old Al-Rashidi wins bronze for Kuwait 4 years after sporting Arsenal jersey in Rio final)
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने कुवेतवर बंदी घातल्यानंतर सन २०१६ मध्ये अल- रशिदी यांनी स्वतंत्र ऑलिंपिक ऍथलिट म्हणून रियो ऑलिंपिकमध्ये भाग घेतला होता.
https://twitter.com/Olympics/status/1419573591872610306
खरं तर, तत्कालीन ५२ वर्षीय नेमबाज अल- रशिदी यांनी स्कीट फायनलसाठी आर्सेनल जर्सीत खेळून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांची जर्सी त्यांच्यासाठी भाग्यवान ठरली. कारण, त्यांनी भाग घेतलेल्या ६ व्या ऑलिंपिक स्पर्धेत त्यांना पहिले पदक मिळाले होते.
https://twitter.com/gaGunNarang/status/1419577082561011714
सोमवारी (२६ जुलै) अल- रशिदी यांनी कुवेतच्या जर्सीत ४६ गुणांसह तिसरे स्थान मिळवत कांस्य पदक पटकावले. याव्यतिरिक्त अमेरिकेच्या व्हिन्सेंट हॅनकॉकने ५९ गुण मिळवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले, तर डेन्मार्कच्या जेस्पर हॅन्सनने ५५ गुण मिळवत रौप्य पदक जिंकले.
भारतीय ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज गगन नारंगनेही सोशल मीडियावर पोस्ट करत अल- रशिदींचे कौतुक केले. त्याने लिहिले की, “अल रशिदीने ५७ वर्षांच्या वयात स्कीट कांस्य पदक जिंकले. वय फक्त एक संख्या आहे.”
अल- रशिदी यांनी अटलांटा ऑलिंपिक्स १९९६ मध्ये पदार्पण केले होते. त्यात ते ४२ व्या क्रमांकावर होते. त्यानंतर त्यांनी सिडनी ऑलिंपिक्स २००० मध्ये १४ वा क्रमांक पटकावला होता. तसेच अथेन्स ऑलिंपिक २००४ आणि बीजिंग ऑलिंपिक २००८मध्ये ते संयुक्तरीत्या ९ व्या क्रमांकावर होते, तर लंडन ऑलिंपिक्स २०१२ मध्ये ते २१ व्या क्रमांकावर होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?
-तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका