भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने आजवर अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. त्याला जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर फलंदाजांमध्ये गणले जाते. २००७मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रोहितसाठी २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी हा मोठा टर्निंग पॉईंट ठरला. तिथून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपातील सलामीवीर फलंदाज बनला.
रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आत्तापर्यंत ३६४ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने १४००० पेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये वनडेतील २९, कसोटीतील ६ आणि टी२०तील ४ अशा एकूण ३९ शतकांचा समावेश आहे.
यादरम्यान रोहित अनेक दिग्गज आणि युवा भारतीय खेळाडूंसोबत खेळला आहे. रोहितने विराटबरोबर २७७ तर धोनीबरोबर २६७ सामने एकत्र खेळले आहेत. भारतीय संघातील व विरोधी संघातील मिळून रोहितने ७९९ खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळले आहे.
या लेखात आपण अशा खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्याबरोबर रोहित खेळला आहे, पण त्यांचे नाव कुणालाही आठवत नाही. 7 indian players you dont know whom with rohit sharma played international cricket
७ असे खेळाडू ज्यांच्याबरोबर रोहितने क्रिकेट खेळले आहे, पण त्यांचे नाव कुणालाही आठवत नाही-
रमेश पोवार-
भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक रमेश पोवार यांनी भारताकडून २ कसोटी आणि ३१ वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान त्यांनी कसोटीत ६ आणि वनडेत ३४ अशा एकूण ४० विकेट्स घेतल्या आहेत. २ ऑक्टोबर २००७ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी भारताकडून शेवटचा सामना खेळला आहे.
पोवार यांनी २६ जून २००७ला रोहितबरोबर आपला पहिला व शेवटचा सामना खेळला होता. हा सामना बेलफास्ट येथे दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झाला होता. यावेळी रोहितने अवघ्या ८ आणि पवार यांनी फक्त १ धाव केली होती. दक्षिण आफ्रिकेने तो सामना ४ विकेट्सने जिंकला होता.
सुदिप त्यागी-
सुदिप त्यागीने भारताकडून डिसेंबर २००९पासून ते फेब्रुवारी २०१०पर्यंत ४ वनडे आणि १ टी२० सामना खेळला आहे. या दरम्यान त्यागीने ४०च्या सरासरीने ३ विकेट्स घेतल्या आहेत. त्यागीने रोहितबरोबर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील केवळ एक सामना खेळला आहे.
हा सामना २७ फेब्रुवारी २०१०ला अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झाला होता. यावेळी रोहितने ४८ धावा केल्या. तर, त्यागी एका धावेवर नाबाद राहिला होता. विशेष म्हणजे, हा सामना त्यागीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना होता.
पंकज सिंग-
देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या पंकज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त सामने खेळले नाहीत. त्याने केवळ २ कसोटी आणि १ वनडे सामना खेळला आहे. यामध्ये त्याने १४६च्या सरासरीने २ विकेट्स घेतल्या आहेत.
पंकजला ५ जून २०१०ला त्याच्या एकमेव वनडे सामन्यात रोहितबरोबर खेळण्याची संधी मिळाली होती. हा सामना हरारे येथे श्रीलंकाविरुद्ध झाला होता. यावेळी रोहितने ३२ धावा केल्या होत्या. तर, पंकजने नाबाद ३ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना ६ विकेट्सने गमावला होता. रोहित व पंकज एकत्र केवळ दोन सामने खेळले. त्यात एक कसोटी व एक वनडेचा समावेश आहे.
नमन ओझा-
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझाने भारताकडून २ टी२०, १ वनडे आणि १ कसोटी सामना खेळला आहे. यामध्ये कसोटीत ५६, टी२०त १२ आणि वनडेत १ अशा मिळून एकूण ६९ धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे, ओझाने खेळलेल्या ४ही आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहितचा संघातील ११ जणांमध्ये समावेश होता. दोघांनी ५ जून २०१०ला श्रीलंकाविरुद्धचा वनडे सामना सोबत खेळला आहे. यात रोहितने ३२ आणि ओझाने ५ धावा केल्या होत्या.
राहूल शर्मा-
भारताचा फिरकी गोलंदाज राहूल शर्माने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४ वनडे आणि २ टी२० सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने वनडेत ६ आणि टी२०त ३ विकेट्स घेतल्या आहेत.
८ डिसेंबर २०११मध्ये इंदोर येथील वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यातून राहूलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात रोहितही खेळत होता. राहूलने या सामन्यात ३/४३ अशी सर्वोत्तम कामगिरी केली होती. विशेष म्हणजे, या वनडे सामन्यात भारताचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने द्विशतक ठोकले होते.
परविंदर अवाना-
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज परविंदर अवानाने भारताकडून केवळ २ टी२० सामने खेळले आहेत. त्याने डिसेंबर २०१२मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून पदार्पण केले होते आणि या मालिकेतच त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामनाही खेळला होता.
अवाना आणि रोहित २२ डिसेंबर २०१२ला मुंबईत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यात एकत्र होते. हा अवानाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. भारताने हा टी२० सामना ६ विकेट्सने गमावला होता.
कर्ण शर्मा-
भारताचा फिरकीपटू कर्ण शर्माने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २ वनडे, १ कसोटी आणि १ टी२० सामना खेळला आहे. दरम्यान त्याने एकूण ५ विकेट्स घेतल्या आहेत. ७ सप्टेंबर २०१४ला बर्मिंघम येथील इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यातून कर्णने पदार्पण केले होते. त्याने ४ षटके गोलंदाजी करत १ विकेटही घेतली होती. या सामन्यात रोहितही भारतीय संघाचा भाग होता.
विशेष म्हणजे, रोहितने कर्णच्या वनडे पदार्पणाच्या सामन्यात २६४ धावांची उल्लेखनीय खेळी केली होती. हा सामना नोव्हेंबर २०१४मध्ये कोलकाता येथे श्रीलंकाविरुद्ध झाला होता. भारताने हा वनडे सामना १५३ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
ड्रीम ११: फक्त कन्यारत्नं असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम टीम इंडिया
भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या मुलांची हटके नाव, जाणून घ्या काय आहेत…
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रीयन खेळाडू