---Advertisement---

72वी वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा: महाराष्ट्र ठरला उपविजेता, भारतीय रेल्वेला विजेतेपद

On: शनिवार, फेब्रुवारी 28, 2026 6:53 PM
---Advertisement---

महाराष्ट्राने “७२व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” अंतिम फेरीपर्यंत धडक दिली. पण त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. गुजरातच्या वडोदरा येथील सागा बंदिस्त क्रीडा संकुल येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र रेल्वेकडून ३१-४९ असा पराभूत झाला. हरियाणा येथे २०२२ मध्ये झालेल्या ६८व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत देखील महाराष्ट्र सेनादलाकडून पराभूत झाला होता. हैद्राबाद येथे २०१७ मध्ये झालेल्या विजयाची पुनरावृत्ती करण्यात महाराष्ट्र अपयशी ठरला.

भारतीय रेल्वेचे स्पर्धेत सहभाग (१९५९) घेतल्या पासूनचे हे २५ वे विजेतेपद ठरले आहे. १९६१ पासून महाराष्ट्राची अंतिम फेरी गाठण्याची ही २१वी वेळ होती. त्यामध्ये महाराष्ट्राने केवळ ८वेळा विजेतेपद मिळविले.

या सामन्यात महाराष्ट्राने उत्तम सुरुवात करत रेल्वेवर १८-१३ अशी आघाडी घेतली होती, पण काही वेळातच रेल्वेने २२-१८ अशी आघाडी घेत आपला इरादा स्पष्ट केला. याच गुणांवर सामन्याचा मध्यंतर झाला. दुसऱ्या डावात मात्र रेल्वेने आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी चढाईत २१ गुण, यशस्वी पकडी करत १४ गुण आणि ५ बोनस गुण मिळवत महाराष्ट्रावर बाजी पलटविली.

महाराष्ट्राला चढाईत १२ गुण, पकडीत १३ आणि ३ बोनस गुण घेता आले. तसे पाहिले असता महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र असाच हा सामना झाला. पंकज मोहिते, शुभम शिंदे, अजिंक्य पवार यांच्या खेळण्याने रेल्वेचा संघ वरचढ ठरला. महाराष्ट्राच्या शिवम पठारे यांनी एकाकी लढत दिली.

मागील २ वर्षापासून महाराष्‍ट्र संघाची राष्‍ट्रीय पातळीवरील कामगिरी खालावली होती. महाराष्‍ट्र राज्‍य संघटनेतील राजकारण व निवड समिती सदस्‍यांवरील दबाव यामुळे महाराष्‍ट्राची कामगिरी सुमार दर्जाची झालेली होती. परंतु राज्‍य संघटनेत अलिकडेच काही फेरबदल झाल्‍यानंतर निवड समितीला खेळाडू निवडीचे पूर्ण स्‍वातंत्र्य दिल्यामुळेच महाराष्‍ट्र संघाची कामगिरी उंचावली असल्‍याचे दिसून येते.

महाराष्‍ट्र संघाच्‍या या कामगिरीबद्दल राज्‍य कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्‍यक्ष गजानन कीर्तिकर व कार्यकारी मंडळाने समाधान व्‍यक्‍त केले असून कबड्डीप्रेमींना देखील आनंद झाला आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---