मंगळवारी (४ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएल २०२१ हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारतात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने आयपीएल संघांच्य़ा बायोबबलमध्येही प्रवेश केल्याने अखेर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयानंतर परदेशी खेळाडूंच्या परतण्यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, आता एक एक करुन परदेशी खेळाडू आपल्या मायदेशात परतू लागले आहेत.
या आयपीएल हंगामात एकूण ११ इंग्लंडचे खेळाडू सध्या खेळत होते. त्यातील ८ खेळाडू बुधवारी (५ मे) इंग्लंडला पोहचले आहेत. यात जॉस बटलर, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, टॉम करन, ख्रिस वोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स आणि जेसन रॉय हे खेळाडू इंग्लंडला पोहचले आहेत.
तसेच इंग्लंडच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार ओएन मॉर्गन, डेव्हिड मलान आणि ख्रिस जॉर्डन हे खेळाडू पुढील ४८ तासात भारतातून इंग्लंडला पोहचतील. इंग्लंडच्या खेळाडूंना मायदेशात पोहचल्यानंतर त्यांच्या सरकारी नियमाप्रमाणे १० दिवसांसाठी क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
आयपीएल २०२१ हंगाम स्थगित झाल्यानंतर बीसीसीआयने परदेशी खेळाडूंना त्यांच्या मायदेशी सुखरुप पाठवण्याचा विश्वास दिला होता. आता त्यानंतर परदेशी खेळाडू मायदेशी जाण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरी सध्या सर्वात मोठा प्रश्न ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर आहे. कारण ऑस्ट्रेलिया सरकारने १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठी सीमाबंदी केली आहे.
त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियन खेळाडू, समालोचक आणि प्रशिक्षक हे पुढील काही दिवसात मालदीव किंवा श्रीलंकेला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे सर्व ऑस्ट्रेलियन सदस्य त्यांच्या सरकारने परवानगी दिल्यानंतर मायदेशी परततील.
महत्त्वाच्या बातम्या –
‘खास जोडीदाराकडून खास भेट’; मायदेशी परतण्यापूर्वी बटलरने जयस्वालला दिली भेटवस्तू






