जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग आयपीएलच्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून यूएईत सुरुवात होत आहे. आयपीएलमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा आपली चमकदार कामगिरी दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. आयपीएलमध्ये खेळाडू दरवर्षी षटकारांचा पाऊस पाडतात आणि यावर्षीही खेळाडूंकडून अशीच अपेक्षा असणार आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक खेळाडूंनी धडाकेबाज खेळी केली आहे. आयपीएल हा मर्यादित षटकांचा म्हणजेच २० षटकांचा खेळ असल्यामुळे झटपट धावा करण्याचा खेळाडूंची योजना असते. यामध्ये खेळाडू पळून धावा कमी घेतात, तर षटकार आणि चौकारांनी आपल्या संघाच्या धावसंख्येत भर घालत असतात. आयपीएलचे आयोजन जरी यावर्षी यूएईत होत असले, तरी चाहत्यांच्या मनोरंजनाला कोणताही तडा बसणार नाही.
चला तर मग आयपीएल २०२०च्या आयोजनापूर्वी आपण त्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यांनी आयपीएलच्या अंतिम सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.
आयपीएलच्या अंतिम सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू
आयपीएलच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये सुरेश रैना आणि शेन वॉटसन या खेळाडूंचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू सध्या आयपील फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतात. आयपीएलमध्ये अंतिम सामन्यांमध्ये खेळताना आत्तापर्यंत रैना आणि वॉटसनच्या नावावर प्रत्येकी १३ षटकार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु असे असले तरीही आयपीएलमध्ये हे दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी खूप महत्त्वाचे खेळाडू आहेत.
अंतिम सामन्यात पोलार्ड पॉवर
आयपीएलचे ४ वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने आयपीएलच्या अंतिम सामन्यांमध्ये एकूण १२ षटकार ठोकले आहेत. पोलार्ड आपल्या धडाकेबाज खेळीसाठी ओळखला जातो. लीग सामन्यांव्यतिरिक्त त्याने अंतिम सामन्यातही चमकदार कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयातील तो महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.
एमएस धोनीचा लागतो तिसरा क्रमांक
आयपीएल अंतिम सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीचा तिसरा क्रमांक लागतो. धोनीने आयपीएलच्या अंतिम सामन्यांमध्ये ११ षटकार ठोकले आहेत. धोनी हा आयपीएलचे सर्वाधिक अंतिम सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने एकूण ९ अंतिम सामने खेळले आहेत.
याव्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळलेल्या युसूफ पठाणनेही अंतिम सामन्यांमध्ये १० षटकार ठोकले आहेत. तर सीएसके आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळलेल्या मुरली विजयनेही आयपीएलच्या अंतिम सामन्यांमध्ये ९ षटकार मारले आहेत.