१५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन. या खास दिवशी कोणतीही घटना असो, ती कायम लोकांच्या लक्षात असते. अशाच प्रकारे, असे तीन भारतीय प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत, ज्यांचा वाढदिवस हा भारताच्या स्वातंत्र्यदिनी असतो.
आज याच तीन खेळाडू विषयी आपण जाणून घेऊ –
१) विजय भारद्वाज
९० च्या दशकात कर्नाटकने जिंकलेल्या तीन रणजी विजेतेपदांमध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या विजय भारद्वाज यांचा या यादीत समावेश होतो. विजय यांचा जन्म १५ ऑगस्ट १९७५ मध्ये झाला. अष्टपैलू खेळाडू म्हणून देशांतर्गत क्रिकेट मध्ये शानदार कामगिरी करत त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवले होते.
१९९९ च्या भारत, द. आफ्रिका व केनिया यांच्यातील तिरंगी मालिकेद्वारे त्यांनी भारतासाठी पदार्पण केले. पहिल्याच मालिकेत १० बळी मिळवत त्यांनी मालिकावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला होता. मात्र, त्यानंतर त्यांना जास्त संधी मिळाली नाही.
विजय यांनी भारताकडून ३ कसोटी व १० एकदिवसीय सामने खेळले. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे सहप्रशिक्षक म्हणून २००८-२०१० या काळात त्यांनी काम पाहिले.
२) हेमलता काला
१५ ऑगस्ट या दिवशी जन्मलेली दुसरी भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे महिला क्रिकेटपटू हेमलता काला. हेमलता यांनी १९९९-२००८ या काळात भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व केले. कसोटी क्रिकेटमधील ५०+ ची सरासरी त्यांच्या तंत्रशुद्ध फलंदाजीचे प्रमाण आहे.
हेमलता यांनी भारतासाठी ७ कसोटी, ७८ वनडे व एक टी२० सामना खेळला. वनडे क्रिकेटमध्ये मात्र त्यांची सरासरी अवघी २०.१० इतकीच राहिली. २००५ मध्ये विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतीय महिला संघाच्या त्या सदस्या होत्या.
३) ईश्वर पांडे
मध्यप्रदेशचा वेगवान गोलंदाज व रणजी कर्णधार ईश्वर पांडे याचा जन्म देखील १५ ऑगस्टचाच. २०१२-१३ रणजी हंगामात सर्वाधिक बळी घेऊन ईश्वर भारत अ संघात दाखल झाला. इंग्लंड विरुद्ध सराव सामन्यात व इराणी चषक सामन्यात चमकदार कामगिरी केल्याने त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली.
२०१४ न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात कसोटी व वनडे मालिकेसाठी त्याची निवड केली गेली, मात्र, संपूर्ण दौऱ्यावर त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर, सतत दुखापतग्रस्त राहिल्याने तो कधीही भारतीय संघासाठी खेळू शकला नाही.
२०१४-२०१५ मध्ये आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना त्याने अप्रतिम कामगिरी केली. २०१६-१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट संघात निवड होऊनही त्याला जास्त संधी मिळाली नाही. २०१७ नंतर तो आयपीएल खेळलेला नाही. सध्या तो मध्य प्रदेश रणजी संघाचा कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार – एक स्कॉलर खेळाडू