विस्डेनने सप्टेबर १९९९ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपची सुरुवात केली. या चॅम्पियनशिपमध्ये एकूण ९ संघ होते. या ९ संघांमध्ये अखेरच्या स्थानावर होता क्रिकेटचा जनक म्हटला जाणारा इंग्लंड संघ. क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंददायी बातमी नव्हती. कोणत्याही संघांच्या खराब कामगिरीचे खापर खरतर संघाच्या कर्णधारावर फोडले जाते. मात्र, इंग्लंड संघाबाबत अशी परिस्थिती नव्हती. कारण, त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार नवखा होता.
ऍलेक स्टीवर्टकडून या कर्णधाराने केवळ दोन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारलेला. त्यानंतर मात्र इंग्लंड संघाने विजयाची लय पकडली. सलग चार कसोटी मालिका इंग्लंड संघाने आपल्या नावे केल्या. आयसीसीने त्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी कसोटी क्रमवारी जाहीर केली तेव्हा इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानी होता. इंग्लंडला ‘फर्श से अर्श तक’ घेऊन जाणारा हा कर्णधार म्हणजे नासिर हुसेन.
चेन्नईत गेले बालपण
नासिर हे भारतातील पूर्वीचे मद्रास म्हणजेच आत्ताच्या चेन्नई येथील. २८ मार्च १९६८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भारतीय तर, आई ब्रिटिश होती. आपले मोठे बंधू मेहरियार व अब्बास यांना चेपॉकच्या मैदानावर खेळताना पाहून त्यांनाही क्रिकेटबद्दल आवड निर्माण झाली. मुलांमधील प्रतिमा पाहता घरच्यांनी इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी नासीर केवळ ८ वर्षांचा होता. तसेच क्रिकेटबरोबर त्यांनी चांगले शिक्षण घ्यावे ही देखील वडिलांची इच्छा होती. नासीर पुढे एसेक्सच्या मुलांच्या संघाचा भाग बनले. सुरुवातीपासून त्यांना फिरकी गोलंदाज व्हायचे होते. मात्र, फलंदाजीमध्ये मिळालेले यश पाहून त्यांनी त्या निर्णयाला पूर्णविराम दिला. १९८९ च्या काउंटी हंगामात एसेक्ससाठी ९९० धावा काढून त्यांनी इंग्लंड संघात स्थान मिळवले.
इंग्लंडचे यशस्वी कर्णधार
नासिर यांनी १९८९ पासून इंग्लंड संघाच्या फलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. १९९९ मध्ये कर्णधारपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी इंग्लंड क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेले. त्यावेळी त्यांना इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हटले जायचे. मात्र, २००३ क्रिकेट विश्वचषकातून इंग्लंड लवकर बाहेर पडल्याने त्यांनी आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. सोबतच, कसोटी संघाचे कर्णधारपद देखील त्यांनी सोडले. मात्र, वर्षभर ते इंग्लंडसाठी क्रिकेट खेळत राहिले. २००३ मध्ये त्यांना ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला. त्याच वर्षी त्यांना ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ चा सन्मान मिळाला.
संस्मरणीय बनविला अखेरचा सामना
नासिर हे आपल्या कारकिर्दीच्या अखेरीसकडे येत होते. इंग्लंडमधून मोठ्या प्रमाणात यांना संघाबाहेर करण्याची मागणी होऊ लागली. मात्र, मे २००४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी त्यांचा संघात समावेश केला गेला. लॉर्ड्स कसोटीतील पहिल्या डावात त्यांनी ३४ धावा केल्या. दुसऱ्या डावात मात्र नाबाद १०३ धावांची अफलातून खेळी त्यांनी साकारली. ही कसोटी समाप्त झाली तेव्हा नासिर यांनी जाहीर केले की, यापुढे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. इंग्लंडच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी असलेल्या नासिर यांना १०० कसोटी खेळण्याचे सौभाग्य लाभले नाही. त्यांनी ९६ कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले.
कॉमेंट्री बॉक्समधील आक्रमक अवतार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते क्रिकेटशी जोडून राहीले. समालोचक म्हणून त्यांनी नवी कारकीर्द सुरू केली. मैदानाप्रमाणे ते कॉमेंट्री बॉक्समध्येही अत्यंत आक्रमकपणे आपली बाजू मांडत. रवी शास्त्री यांच्यासोबत झालेला त्यांचा वाद सर्वश्रुत आहे. भारतीय क्षेत्ररक्षकांना त्यांनी गाढव म्हटल्यानंतर रवी शास्त्री संतापले. मात्र, नासिर यांनी आपली बाजू दृढपणे मांडली. हे प्रकरण चांगलेच तापले होते. आजही समालोचन व ट्विटरच्या माध्यमातून ते परखडपणे आपली मते मांडताना दिसतात.
पांढऱ्या ओठांचा क्रिकेटपटू
नासिर हे आपल्या अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखले जायचे. नासिर हे कायम ओठांवर पांढरी क्रीम लावत. आपल्या ओठांचे सूर्यकिरणांपासून रक्षण करण्यासाठी ही क्रीम ते वापरत. कर्णधार असताना तर, एकाच षटकात ते तीन-चार वेळा क्षेत्ररक्षणात बदल करत. एतकेच काय तर त्यांनी अभिनयात देखील हात आजमावले. अक्षय कुमार अभिनित ‘पटियाला हाउस’ चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती.
नासिर हुसेन यांचे इंग्लिश क्रिकेटसाठीचे योगदान कोणीही विसरू शकणार नाही. स्टायलिश फलंदाजी, आक्रमक नेतृत्व आणि नेहमी विरुद्ध संघावर वर्चस्व गाजवण्याची इच्छाशक्ती त्यांना इतर खेळाडूंपेक्षा वेगळे बनवत होती. क्रिकेटविश्वात त्यांची पांढऱ्या ओठांचा क्रिकेटपटू ही ओळख मात्र कायम राहील.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटचे पहिले विक्रमादित्य ‘पॉली उम्रीगर’, कर्णधारपद सोडले पण निर्णय नाही बदलला!
पंजाब संघ ‘या’ बाबतीत खरंच आहे ‘किंग्स’, भल्याभल्या संघांना जे जमलं नाही; ते यांनी करून दाखवलंय