या आधीही हरयाणा स्टीलर्स संघाचा सामना तेलगू टायटन्स या संघाबरोबर झाला होता. परंतु या सामन्यात तेलगू टायटन्सने हरयाणा स्टीलर्सला जोरदार टक्कर दिली होती. या सामन्यात तेलगू टायटन्सने ३७ गुण मिळवून हा सामना जिंकला होता.
हरयाणा स्टीलर्सचा कर्णधार आणि डिफेंडर सुरिंदर नाडा या मोसमात सध्या झालेल्या सामन्यात सर्वात जास्त टॅकल पॉईंट आणि हाय फाइव्ह घेणारा खेळाडू आहे.तरी त्याला आजच्या सामन्यात आपल्या संघाला जिंकविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन कर्णधारांमध्येही आज चांगलीच लढत पाहायला मिळेल.
तेलगू टायटन्सने आतापर्यंत २० सामने खेळले असून त्यातील फक्त ७ सामने जिंकले आहेत तर ११ सामने ते गमावले आहेत. त्यांना २ सामने बरोबरीत सोडवण्यात यश आले आहे. त्यांचे एकूण ४८ गुण आहेत. तेलगू टायटन्स संघाचा मागचा सामना तमील थलाइवाज या संघाबरोबर होता.
या सामन्यात तेलगू टायटन्सने या मोसमातील आपले सर्वाधिक ५८ पॉईंट्स एका सामन्यात मिळवले. या सामन्यापासून नक्कीच त्यांना विजयासाठीचे प्रोत्साहन मिळाले असेल.
संघाचा कर्णधार राहुल चौधरीने या सामन्यात सर्वात ज्यास्त १६ गुण मिळविले. त्याला रेडर मोनेशने १२ गुण व निलेशने ११ गुण मिळवून संघाला जिंकविण्यासाठी चांगली साथ दिली. संघाचे डिफेंडर्स विशालने ३ गुण तर सोमबीरने ० गुण मिळविले. तेलगू संघाला पाहिजे अशी डिफेंडर्सची साथ मिळाली नाही त्यामुळे डिफेंडर्सला या सामन्यात आपली कामगिरी सुधरविण्याची संधी आहे.
हरयाणा स्टीलर्सने आतापर्यंत १९ सामने खेळले असून एकूण १० सामने जिंकले आहेत तर ५ सामने गमावले आहेत. त्यांना ४ सामने बरोबरीत सोडवण्यात यश आले. त्यांचे एकूण गुण ६४ आहे. झोन ए मध्ये ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
हरयाणा स्टीलर्सचा या आधीचा सामना यु मुंबा सोबत होता. हा सामना हरयाणा स्टीलर्सया संघाने ४१-३० असा जिंकला. या सामन्यात संघाचे रेडर दिपक दहियाने ८ गुण, विकास कंडोला ८ गुण व वझीर सिंग याने ७ गुण मिळविले.
संघाचा कर्णधार सुरिंदर नाडा व डिफेंडर मोहीत चिल्लर यांनी ४ व ५ असे गुण मिळवून संघाला विजय मिळवून दिला. संघातील सर्वच खेळाडूंची कामगिरी चांगलीच होती असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
जरी मागचा सामना तेलगू टायटन्सने सर्वाधिक गुणांनी जिंकला असला तरी डिफेंडर्सची कामगिरी आणि या आधी हरलेले सामने, यावरून आजचा सामना जिंकण्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील. तर हरयाणा स्टीलर्सची एकूण कामगिरी बघता ते आजचा सामना जिंकण्यासाठी चांगलाच प्रयत्न करतील यात काही वाद नाही.