या लेखात महाराष्ट्राच्या मराठमोळ्या ३४ वर्षीय रहाणेच्या वाढदिवसादिवशी त्याच्या जीवनप्रवासाबद्दल माहित नसलेल्या रंजक गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. Amazing Facts You Didn’t Know About Ajinkya Rahane
नम्र सुरुवात
रहाणे मुंबईच्या डोंबिवली येथे एका सर्वसामान्य कुटुंबात वाढला. त्याचे वडील मुंबईच्या परिवहन कंपनीत काम करत होते, तर आई हाऊसवाईफ म्हणजेच गृहिणी होती. फोर्ब्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रहाणेने खुलासा केला होता, की ७वर्षांचा असताना त्याने क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळविला होता. तो म्हणाला होता, “घरात वेळ घालविण्याऐवजी व्यायाम करून फीट राहण्याचा माझा उद्देश होता. ते क्रिकेटपटू बनण्यासाठी नव्हतेच.” गल्ली क्रिकेट खेळत असताना काचेच्या खिडक्या तोडत त्याची वाटचाल पुढे क्रिकेटच्या दिशेने झाली.
ब्लॅक बेल्ट
रहाणे हा तांत्रिकदृष्ट्या हुशार फलंदाज असून तो एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे. मैदानाबाहेर तो एक कराटेपटू असून त्यात त्याने ब्लॅक बेल्टही मिळविला आहे. रहाणेचे कराटो खेळतानाचे बालपणीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
भारताच्या १५ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व
रहाणेने २००२मध्ये दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान भारताच्या १५ वर्षांखालील संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी त्याच्या संघसहकाऱ्यांमध्ये पीयूष चावला आणि तन्मय श्रीवास्तव या खेळाडूंचा समावेश होता. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध १५ वर्षांखालील सामना खेळला होता. त्यावेळी श्रीलंकेच्या संघात अँजेलो मॅथ्यूज होता. त्यानंतर २००७मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघाचाही रहाणे भाग राहिला होता. विराट कोहली (Virat Kohli), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि इशांत शर्माचाही (Ishant Sharma) त्या दौऱ्यात समावेश होता.
प्रथम श्रेणी पदार्पण
रहाणेने २००७मध्ये कराची अर्बनविरुद्ध खेळलेल्या सामन्यात मुंबई संघाकडून पहिल्यांदा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ती मोहम्मद निसार ट्रॉफीची स्पर्धा होती. ती स्पर्धा भारत आणि पाकिस्तानच्या देशांतर्गत चॅम्पियन्स संघात रंगली होती. त्यादरम्यान रहाणेने राष्ट्रीय स्टेडियम, कराची येथे सलामीला फलंदाजी करताना १४३ धावांची शतकी खेळी केली होती. त्यात २८ चौकारांचा समावेश होता.
जेव्हा अजिंक्य रहाणेने मोडला होता सचिनचा विक्रम
भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कोणत्याही भारतीय खेळाडूने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये केलेल्या सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम रहाणेने होता. सचिनने १९९९मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात केलेल्या १८६ धावांचा विक्रम केलेला. ही खेळी कोणत्याही भारतीय फलंदाजाची अ दर्जाच्या (वनडे) क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी त्यावेळी होती.
पण, मार्च २००८ साली पुणे येथे विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्राविरुद्ध खेळताना मुंबईचा सलामीवीर फलंदाज रहाणेने १८७ धावा काढल्या होत्या. त्यामुळे भारताच्या कोणत्याही फलंदाजाने अ दर्जाच्या (वनडे सहित) क्रिकेट कारकीर्दीत केलेल्या सर्वाधिक वैयक्तिक धावा होत्या. त्याने सचिनचा हा विक्रम मोडला होता. यामुळे तो चर्चेत आला होता.
परंतु २४ फेब्रुवारी, २०१०मध्ये सचिनने रहाणेच्या १८७ धावांचा विक्रम मोडला. तसेच सचिन अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा भारताचा पहिला फलंदाज बनला होता. ग्वाल्हेर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना सचिनने नाबाद २०० धावांची द्विशतकी खेळी केली होती. अशाप्रकारे तो अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणारा भारतीय फलंदाज बनला होता.
सध्या अ दर्जाच्या म्हणजेच वनडे क्रिकेट कारकीर्दीत सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने २६४ धावा ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही मुंबईकर.
आयपीएल
आयपीएलमधील सुरुवातीचे काही मोसम रहाणे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा भाग होता. मुंबईकडे मजबूत सलामीची फलंदाजी फळी असल्याने, त्याला त्यात स्थान मिळवणे कठीण झाले आणि संपूर्ण हंगामात त्याने फक्त काहीच सामने मुंबईकडून खेळले. त्यानंतर त्याला राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आपल्या संघात सामील केले. तिथे तो आपला आदर्श व्यक्ती राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वात खेळला. परंतु २०१५मध्ये राजस्थान रॉयल्स संघावर २ वर्षांसाठी बंदी घातल्यामुळे त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर तो पुन्हा राजस्थान रॉयल्स संघात समाविष्ट झाला. तसेच नंतर त्याचे दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स या संघातही स्वागत झाले.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये राहुल द्रविडसोबत पदार्पण
राहुल द्रविडला २०११ च्या इंग्लंड दौर्यादरम्यान वनडे संघात स्थान देण्यात आले होते आणि त्याचवेळी रहाणेने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला होता. त्यावेळी द्रविड आणि रहाणे यांनी सोबत आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले होते. त्या सामन्यात रहाणेने ३९ चेंडूत ६१ धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना द्रविडने ३१ धावांची खेळी केली होती. त्यात ३ षटकारांचा समावेश होता. त्यादरम्यान रहाणे आणि द्रविडने दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली होती.
एका षटकात ६ चौकार
रहाणे एका षटकात ६ चौकार ठोकणारा टी२० क्रिकेटमधील पहिला-वहिला फलंदाज आहे. आयपीएल २०१२मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १४व्या षटकात रहाणेने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (Royal Challengers Bangalore) ६ चौकार ठोकले होते. त्यादरम्यान आरसीबीकडून श्रीसंत अरविंद गोलंदाजी करत होता. त्या सामन्यात रहाणेने नाबाद १०३ धावांची खेळी केली होती.
देशांतर्गत सामन्यांपेक्षा देशाबाहेरच्या सामन्यांमध्ये रहाणेचे कसोटी विक्रम चांगले
रहाणेने २०१३ मध्ये दिल्ली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने बऱ्यापैकी कसोटी सामनेे देशाबाहेर खेळत चांगली कामगिरी केली. त्यात त्याने बरीच शतके ठोकली. रहाणेने आतापर्यंत न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी केली आहे. बांगलादेश व दक्षिण आफ्रिका वगळता देशाबाहेर खेळलेल्या प्रत्येक संघाविरुद्ध त्याने शतकी खेळी केली आहे.
रहाणेने भारतात आतापर्यंत ३२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३५.७३ च्या सरासरीने १६४४ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ४ शतकांचा समावेश आहे, तर परदेशात त्याने आतापर्यंत ५० कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४०.०८ च्या सरासरीने ३२८७ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ८ शतकांचा समावेश आहे. त्यामुळे परदेशात अनेक क्रिकेटपटू फ्लाॅप ठरत असताना रहाणे मात्र जोरदार यशस्वी होताना दिसतो.
सचिन तेंडुलकरकडून स्तुती
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवातीच्या काळात रहाणेने मैदानापेक्षा ड्रेसिंग रूममध्ये जास्त वेळ घालवला. मुंबईमध्ये आपल्या शेवटच्या २००व्या ऐतिहासिक कसोटी सामन्यानंतर रहाणेला प्रोत्साहित करण्यासाठी सचिनकडे काही शब्द होते.
“मी रहाणेला कित्येक वर्षांपासून ओळखत होतो आणि पाहत होतो, की तो या खेळावर किती सारं प्रेम करतोय. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने समर्पण आणि वचनबद्धतेने क्रिकेटची सेवा केली आहे. मी त्याला म्हणालो की आतापर्यंतच्या कारकीर्दीत जे काही घडले, त्यामुळे त्याला कठीण वाटले असेल. परंतु तरीही त्याने तसे केले पाहिजे. कारण मला खात्री होती, की अजिंक्यला आणखी एक संधी मिळेल,” असे सचिनने आपल्या ‘प्लेइंग इट माय वे’ या पुस्तकात लिहिले आहे.
लहाणपणाची रंजक गोष्ट
असे म्हटले जाते, की रहाणे डोंबिवलीत खेळत असताना वयाच्या ८ व्या वर्षी एका गोलंदाजाने त्याच्या हेल्मेटवर सलग तीन बाऊंसर चेंडू मारले होते. त्याला गोलंदाजी करणारा व्यक्ती हा त्याच्यापेक्षा तिप्पट वयाने मोठा होता. त्यानंतर रहाणेला रडू कोसळले होते. परंतु काही वेळानंतर तो पुन्हा फलंदाजीसाठी तयार झाला आणि त्याच गोलंदाजाविरुद्ध त्याने सलग ५ चौकार ठोकले होते.
वाढदिवसाच्या तारखेवरून संभ्रम
रहाणेचा वाढदिवस दरवर्षी ६ जून रोजी साजरा केला जातो. परंतु त्यावरून थोडासा गोंधळ उडाला. कारण त्याच्या अनेक चाहत्यांनी वास्तविक तारखेच्या एक दिवस आधी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. कदाचित, हे सर्व काही विश्वसनीय साईट्सवर चुकीची जन्मतारीख दिल्यामुळे सुरू झाले होते. परंतु त्यानंतर रहाणेने २८व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ट्वीट करत चाहत्यांचा संभ्रम दूर केला होता.
Thank you all for your lovely wishes .. But my birthday is tomorrow i.e 6th June .. 🙂 Love.
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) June 5, 2016
कसोटीत सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम
ऑगस्ट २०१५ मध्ये श्रीलंका आणि भारत यांच्यातील गाॅल येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रहाणेने एकाच कसोटीत सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम ८ झेल घेऊन आपल्या नावावर केला होता. यापूर्वी एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल झेलण्याचा विक्रम ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया), यजुर्विंद्रसिंग (भारत), हशान तिलकरत्ने (श्रीलंका), स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) आणि मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया) यांच्याकडे होता. या सर्वांनी प्रत्येकी ७ झेल झेलले होते.
विशेष म्हणजे त्याने आठपैकी ७ झेल स्लिपमध्ये पकडले आणि एक झेल त्याला गली येथे मिळाला होता.
कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पाचवा भारतीय
फिरोज शाह कोटला स्टेडियम, दिल्ली येथे डिसेंबर २०१५ रोजी झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील चौथ्या कसोटी सामन्यात, कदाचित सर्वात आऊट ऑफ फॉर्ममध्ये असलेल्या रहाणेने जबरदस्त पुनरागमन केले होते. त्याने त्या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी १ शतक जडले होते. त्याच्या या धडाकेबाज खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. रहाणेपूर्वी अशी कामगिरी विराट कोहली, राहुल द्रविड, सुनील गावसकर आणि विजय हजारे यांनी केली होती.
विवाह आणि कुटुंब
रहाणेने आपली बालमैत्रीण राधिका धोपवकरबरोबर २६ सप्टेंबर २०१४ ला विवाह केला होता. त्या दोघांनाही ५ ऑक्टोबर २०१९ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले असून त्यांनी तिचे नाव आर्या ठेवले आहे.
कसोटी उपकर्णधारपद
जुलै २०१६मध्ये रहाणेला भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. खांद्याच्या दुखापतीमुळे २०१६-१७ मध्ये जेव्हा विराट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्याला मुकला होता, तेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी रहाणेला पार पाडावी लागली होती. त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. आजही तो कसोटी सामना धरमशाला कसोटीने प्रसिद्ध आहे.
अजिंक्य रहाणे गोलंदाजाच्या भूमिकेत
रहाणेला गोलंदाजी करताना खूप क्वचित पाहिले आहे. आजपर्यंत रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही चेंडू गोलंदाजी केली नाही. असे असले तरी त्याने अ दर्जाच्या क्रिकेट कारकीर्दीत ३ बळी घेतले आहेत. तसेच त्याने आतापर्यंत टी२० कारकीर्दीत केवळ १ विकेट घेतली आहे. रहाणे उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे.
पुरस्कार
बीसीसीआयने मे २०१६ मध्ये, अर्जुन पुरस्कार २०१६साठी रहाणेच्या नावाची शिफारस केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेच्या महिला फलंदाजाचे जबरदस्त सेलिब्रेशन, शतक ठोकल्यानंतर बॅटच दिली फेकून, Video पाहतच राहाल
‘ही एक अद्भूत कसोटी, कर्णधारपदाची पर्वा न करता…’, विजयी पताका फडकवल्यानंतर स्टोक्सने मांडल्या भावना