महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या पुढाकारामुळे आयपीएलच्या धरतीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा दिमाखात पार पडली. जून महिन्यात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे एकापेक्षा एक युवा खेळाडू चमकले. यामध्ये अंकित बावणे, विजय पावले, सचिन भोसले, मनोज यादव, यांसारख्या खेळाडूंचा समावेश होता. अशात देशांतर्गत क्रिकेटच्या 2023-24 हंगामाला सुरुवात होत आहे. हंगामातील पहिली स्पर्धा कॅप इंटरस्टेट सीनिअर मेन टी20 2023 पाँडिचेरी येथे खेळली जाणार आहे. स्पर्धेत एमपीएल 2023 गाजवणाऱ्या खेळाडूंचाही समावेश झाला आहे.
कॅप इंटरस्टेट सीनिअर मेन टी20 स्पर्धेसाठी 16 सदस्यीय महाराष्ट्र संघाची घोषणा झाली आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि एमपीएल 2023 (MPL 2023) स्पर्धेतील उपविजेत्या कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार केदार जाधव (Kedar Jadhav) याच्याकडेच महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. केदारच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघात एमपीएल गाजवणाऱ्या युवा धुरंधरांना संधी मिळाली आहे.
एमपीएल 2023 स्पर्धेत चमकलेले खेळाडू
अंकित बावणे (Ankeet Bawane) या युवा खेळाडूने एमपीएल 2023 स्पर्धेत सर्वाधिक धावा चोपल्या होत्या. 7 सामन्यांमध्ये 72.4च्या सरासरीने 1 शतक आणि 3 अर्धशतकासह सर्वाधिक 362 धावा केल्या होत्या. तसेच, केदारनेही स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. त्याने 198 धावा केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त महाराष्ट्र संघात निवडलेल्या खेळाडूंमध्ये धनराज शिंदे याचाही समावेश आहे. त्याने एमपीएलमध्ये 162 धावा चोपल्या होत्या. तसेच, स्पर्धेतील एकमेव हॅट्रिक आणि 11 विकेट्स घेणारा मनोज यादव हादेखील महाराष्ट्राच्या ताफ्यात सामील आहे. चॅम्पियन रत्नागिरी जेट्सचा कर्णधार अझीम काझीलाही संघात स्थान मिळाले आहे. याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणाऱ्या प्रशांत सोलंकी यानेही महाराष्ट्राच्या संघात जागा मिळवली. तसेच, सचिन भोसले (सर्वाधिक 14), विजय पावले (9) या धुरंधरांनाही जबरदस्त कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघात जागा मिळवण्यात यश आले. आता या खेळाडूंकडून देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामात महाराष्ट्र संघाला उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल.
कॅप इंटरस्टेट सीनिअर मेन टी20 स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ
केदार जाधव (कर्णधार), प्रीतम पाटील, अझीम काझी, कौशल तांबे, विकी ओस्तवाल, मंदार भंडारी (यष्टीरक्षक), निखिल नाईक (यष्टीरक्षक), प्रशांत सोलंकी, धनराज शिंदे (यष्टीरक्षक), अंकित बावणे, सिद्धार्थ म्हात्रे, विजय पावले, मनोज यादव, सचिन भोसले, ऋषभ राठोड आणि प्रदीप धाडे.
महत्त्वाच्या बातम्या-
आणखी किती खेळणार उस्मान ख्वाजा? पठ्ठ्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, ‘जोपर्यंत…’
‘पहिल्यांदाच भारतीय खेळाडूशिवाय ड्रेसिंग रूम…’, CPL 2023मध्ये रायुडूला झाली टीम इंडियाची आठवण