वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी गल्ली ते दिल्लीच काय, तर जगभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहे. ही स्पर्धा यावेळी भारतात आयोजित केली जात आहे. स्पर्धेचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. वनडे विश्वचषकात एकूण 10 संघ भाग घेत आहेत. मात्र, या 10 संघांमध्ये एक संघ असा आहे, जो 12 वर्षांनंतर भाग घेताना दिसेल. या संघाने वनडे विश्वचषकात आतापर्यंत फक्त 2 सामने जिंकले आहेत.
तब्बल 12 वर्षांनंतर विश्वचषक खेळणार ‘हा’ संघ
तब्बल 12 वर्षांनंतर वनडे विश्वचषक खेळणारा संघ इतर कुठला नसून नेदरलँड (Netherlands) आहे. नेदरलँडने दशकभरानंतर वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी क्वालिफाय केले आहे. संघाने अखेरचा वनडे विश्वचषक 2011मध्ये भारतातच खेळला होता. नेदरलँड संघाने यावेळी क्वालिफायर फेरीत जबरदस्त प्रदर्शन केले. नेदरलँडने क्वालिफायर फेरीत वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघालाही सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर त्यांनी स्कॉटलंडचा पराभव करत वनडे विश्वचषकासाठी क्वालिफाय केले. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत नेदरलँडचा पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
पाचव्यांदा केले क्वालिफाय
तसं पाहिलं, तर नेदरलँडने पाचव्यांदा वनडे विश्वचषकासाठी क्वालिफाय केले आहे. यापूर्वी संघाने 4 वनडे विश्वचषकात भाग घेतला होता. त्यामध्ये 1996, 2003, 2007 आणि 2011 विश्वचषकांचा समावेश आहे. मात्र, संघ एकदाही साखळी फेरीतून पुढे जाण्यात यशस्वी ठरला नाही. संघाने विश्वचषकात स्कॉटलंड आणि नामीबिया यांसारख्याच संघांना पराभूत केले आहे.
विश्वचषकातील कामगिरी
नेदरलँड संघाची विश्वचषकातील कामगिरी पाहायची झाली, तर त्यांनी 2003 आणि 2007च्या विश्वचषकात फक्त 1-1 सामना जिंकला आहे. संघ आतापर्यंत विश्वचषकातील एकूण 20 सामने खेळला आहे. त्यात 2 विजय, तर 18 पराभवांचा समावेश आहे. वनडे विश्वचषक 2011मध्ये नेदरलँड संघाने 6 सामने खेळले होते, त्या सर्व सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी नेदरलँड संघ
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डौड, बास डी लीड, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सीब्रँड एंजेलब्रेच. (netherlands team play icc odi world cup 2023 match after 12 years read more)
हेही वाचा-
वर्ल्डकपला उरले फक्त 4 दिवस, जाणून घ्या बलाढ्य भारत 9 संघांविरुद्ध कधी-कधी भिडणार
World Cupमधील पहिल्या सामन्यात उतरताच विराट करणार ‘हा’ भीमपराक्रम, यादीतला टॉपर सचिन तेंडुलकर