इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या क्रिकेट मालिकेत भारतकडून पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या चमकदार आणि विक्रमी कामगिरींचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. ही त्यांची कामगिरी पाहून भारतीय क्रिकेटचे भविष्य अधिक उज्जल असल्याचे दिसून येते. तसेच कसोटी,एकदिवसीय आणि टी२० या तीनही स्वरूपात भारतीय संघ बळकट राहिला असल्यामुळे भारतीय क्रिकेटच्या येणाऱ्या सुवर्ण दिवसांची चाहूल लागत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चालू असलेल्या सध्याच्या मालिकेत चार ते पाच खेळाडूंनी आतापर्यंत पदार्पण केले आहे. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी असे काही नवीन विक्रम प्रस्थापित करत जागतिक क्रिकेट मध्ये आपले नाव मोठे केले आहे.
१) अक्षर पटेल –
यामध्ये पहिला खेळाडू म्हणजे भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल. इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दुसर्या कसोटीत त्याला प्रथमच संधी देण्यात आली होती. या मालिकेत त्याने कोणत्याही भारतीय गोलंदाजाने आतापर्यंत केलेल्या कसोटी सामन्यातील कामगिरीपैकी सर्वोत्कृष्ट अशी कामगिरी केली. त्याने तीन कसोटी सामन्यात २७ बळी घेतले आहेत. तत्पूर्वी, भारताकडून खेळणारा डावखुरा फिरकीपटू दिलीप दोषीने १९७९ मध्ये सहा कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकूण 27 बळी घेतले होते. तर अक्षर पटेलने केवळ तीन कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी करून दाखविली.
याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील सर्वात कमी चार डावात पाच विकेट घेण्याचा मानही अक्षरला मिळाला आहे. यात त्याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला मागे टाकले आहे. जेमिसनने सहा कसोटीत चार वेळा ५ विकेट्स घेतल्या आहेत तर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने १४ कसोटी सामन्यांत चार वेळा ५ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. पण अक्षर पटेलने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील अवघ्या तीन सामन्यात या विक्रमाची बरोबरी केली आहे.
२) इशान किशन –
तसेच या मालिकेत टी२० मध्ये विक्रम करणारा आणखी एक खेळाडू म्हणजे झारखंडचा सलामीवीर इशान किशन. पाच सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्या सामन्यात इशान किशनला इंडियाची कॅप घालण्याचा मान मिळाला होता. इशान किशनने पहिल्या पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजीच्या आतिषबाजीने कमीतकमी चेंडूंमध्ये शानदार अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम केला आणि असे करणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या अगोदर अजिंक्य रहाणेने २०११ मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या टी२० सामन्यात ६१ धावा केल्या होत्या, पण ईशान किशनने अवघ्या ३२ चेंडूत ५६ धावांची आकर्षक खेळी केली. त्याने ६ चौकार आणि ४ षटकार लगावले आणि पदार्पणच्या सामन्यात भारतासाठी वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला.
३) सूर्यकुमार यादव –
त्यानंतर येतो सूर्यकुमार यादव. त्याने नवीन विक्रम जरी रचला नसला तरीपण आपल्या पहिल्या डावात ज्या शैलीने त्याने फलंदाजी केली त्यामुळे त्याचा उल्लेख करणे देखील आवश्यक आहे. पदार्पण सामन्यात सूर्यकुमार यादवला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती पण जेव्हा दुसर्या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने ५७ धावांची आक्रमक खेळी केली. जोफ्रा आर्चरच्या वेगवान आणि अचूक बाउन्सर षटकाराने मारून टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ज्या पद्धतीने धावा केल्या त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.
४) कृणाल पंड्या –
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना २३ मार्च रोजी खेळला गेला. हा सामना भारताने ६६ धावांनी सहज जिंकला. हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्या कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा अशा दोन खेळाडूंच्या विक्रमी कामगिरीमुळे ओळखले जातील. अष्टपैलू कृणाल पांड्याने पदार्पण केलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने फक्त २६ चेंडूत शानदार अर्धशतक झळकावत नवीन विश्वविक्रम केला. पदार्पण सामन्यात जगातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा मान त्याला मिळाला. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या जॉन मॉरिसच्या नावावर होता. १९९० मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मॉरिसने ३५ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. एकदिवसीय सामन्यात सातव्या स्थानावर खेळताना अर्धशतक झळकावणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी रवींद्र जडेजाने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद ६० धावांची खेळी केली होती.
५) प्रसिद्ध कृष्णा –
तसेच आपल्या पदार्पण सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यानेही ५४ धावा देऊन ४ बळी घेतले. एकदिवसीय सामन्यात भारताच्या गोलंदाजाची पदार्पणातील ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वी हा विक्रम नोएल डेव्हिडच्या नावे होता त्याने २१ धावा देऊन ३ बळी घेतले होते. डेव्हिड व्यतिरिक्त भारताकडे आतापर्यंत एकदिवसीय पदार्पण सामन्यात 3 बळी घेणारे 16 गोलंदाज आहेत. यात केवळ भारतच नाही तर जगातील महान लेग ब्रेक गुगली गोलंदाज भागवत चंद्रशेखर यांचा देखील समावेश आहे.
एकंदरीत, या भारतीय खेळाडू्ंची विक्रमी कामगिरी पाहता, आगामी काळात भारतीय संघ विरोधी संघांविरुद्ध आणखी एक मोठे आव्हान म्हणून उदयास येईल याबद्दल कोणतीही शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् राहुलच्या फ्लॉप शोवर पूर्णविराम! शतक केल्यानंतर पकडले कान, पाहा सेलिब्रेशनचा व्हिडिओ
पंतने चेंडू मारला सीमापार, तरीही टीम इंडियाला मिळाली नाही एकही धाव! वाचा कोणत्या नियमाचा बसलाय फटका
वनडे पदार्पणासाठी त्याने अजून काय करायला हवं? सूर्यकुमारला संधी न दिल्याने चाहत्यांचा विराटला प्रश्न