मागील काही आठवड्यांपासून असा अंदाज वर्तविला जात होता की, यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषकात एबी डिव्हिलियर्स आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकतो. परंतु मंगळवारी दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्ध टी२० मालिकेसाठी आपला राष्ट्रीय संघ निवडला, ज्यात डिव्हिलियर्सचा समावेश नाही. डिव्हिलियर्सने अचानक २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तेव्हापासून अनेक वेळा त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या वावड्या उठत आहेत. मात्र आता या शक्यतांना जवळजवळ पूर्णविराम लागला आहे.
डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यात काहीही गैर नाही. कारण यापूर्वी अनेक खेळाडूंनी अशा प्रकारचे कृत्य केलेले आहे. आपण या लेखात बघणार आहोत असे काही खेळाडू ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही पुन्हा आपला निर्णय बदलला होता.
१)बॉब सिम्पसन- ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू बॉब सिम्पसननेही निवृत्तीनंतर पुनरागमन केले होते. सिम्पसनने १९६८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले व त्यानंतर १९७७ मध्ये पुनरागमन केले होते.
२)इम्रान खान- पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इम्रान खान देखील निवृत्तीनंतर पुनरागमन केले होते. १९८७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकल्यानंतर इम्रान यांनी लगेच १९८८ मध्ये पुनरागमन केले. त्यांनी पाकिस्तानला १९९२ मध्ये क्रिकेटचे विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.
३)जावेद मियांदाद- पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील एक महान फलंदाज मानल्या जाणाऱ्या जावेद मियांदाद यांनीही निवृत्तीनंतर पुनरागमन करण्याचे एक अचंबित करणारे काम केले होते. मियांदाद यांनी १९९६ साली निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याच वर्षी आपला निर्णय मागे घेतला.
४)कार्ल हूपर- वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कार्ल हूपरने १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले होते. व त्यानंतर २००१ मध्ये ते पुन्हा विंडीज संघात परतले.
५)ग्रँट फ्लॉवर- झिम्बाब्वेचा माजी अष्टपैलू खेळाडू ग्रँट फ्लॉवरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्त झाल्यानंतर परतले होते. २००४ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी २०१० मध्ये पुन्हा झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले.
६)शाहिद आफ्रिदी- पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू शाहिद आफ्रिदीची क्रिकेटर कारकीर्द दीर्घ होती. २००६ मध्ये निवृत्त झाल्यानंतर आफ्रिदी २०१० मध्ये परत आले होते.
७)केव्हिन पीटरसन- इंग्लंड क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्या माजी कर्णधार केविन पीटरसननेही निवृत्तीनंतर पुनरागमन केले होते. २०११ साली निवृत्ती स्वीकारल्यानंतर केव्हिन पीटरसनने पुन्हा आपले मत बदलले, आणि त्याच वर्षी पुनरागमन केले.
८)स्टीव्ह टिकलो- केनियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह टिकोलोनेही प्रथम आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला, आणि त्यानंतर दोन वर्षानंतर तो पुन्हा परतला. २०११ मध्ये क्रिकेट सोडल्यानंतर तो पुन्हा २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल आयोजनासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला लागणार कात्री? पाहा काय आहे बीसीसीआयचा प्लॅन
श्रीलंका दौर्यावर भुवनेश्वर नाहीतर हा खेळाडू होणार कर्णधार, दोन भावांच्या जोड्याचांही संघात समावेश