भारतीय संघ येत्या जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळेल. मात्र याच दरम्यान भारताचा मुख्य संघ इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळत असेल. त्यामुळे या दौऱ्यावर युवा खेळाडूंना संधी दिल्या जाईल. राहुल द्रविड या संघाचा प्रशिक्षक असेल हे यापूर्वीच निश्चित झाले आहे. आता शिखर धवनला संघाचे कर्णधारपद सोपवले जाईल, असे वृत्त समोर आले आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार शिखर धवनकडे श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली जाईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. याशिवाय दोन भावंडांच्या जोड्या देखील या दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग असतील. यात हार्दिक आणि कृणाल पंड्या या एका जोडीचा समावेश असेल. तर दीपक आणि राहुल चाहर या भावंडांचा देखील संघात समावेश केला जाऊ शकतो.
‘हे’ खेळाडू करू शकतात पदार्पण
या दौऱ्यात अनेक युवा भारतीय खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते. यात आयपीएल आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचा समावेश असेल. यामध्ये प्रामुख्याने आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळणारा देवदत्त पडिक्कल आणि केकेआरकडून खेळणारा नितीश राणा यांचा समावेश असले. हे दोघेही श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाकडून पदार्पण करू शकतात.
या व्यतिरिक्त राहुल तेवातिया आणि वरुण चक्रवर्ती या दोन खेळाडूंनाही या दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी मिळू शकते. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमधील कामगिरीने लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय इंग्लंड दौऱ्यासाठी निवड न झालेला भुवनेश्वर कुमार श्रीलंका दौऱ्यात संघाचा भाग असेल हे जवळपास निश्चितच आहे. तर दुखापतीतून सावरल्यास श्रेयस अय्यरची देखील निवड केल्या जाऊ शकते.
श्रीलंका दौऱ्याला १३ जुलैपासून सुरुवात
भारतीय संघाच्या श्रीलंका दौर्यावर १३ जुलै रोजी वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. त्यानंतर १६ आणि १९ जुलै रोजी वनडे मालिकेचे उर्वरित दोन सामने खेळवले जातील. वनडे मालिका संपल्यानंतर टी२० मालिकेची सुरुवात होईल. या मालिकेचा पहिला सामना २२ जुलै रोजी खेळवला जाईल. तर उर्वरित दोन सामने अनुक्रमे २४ आणि २७ जुलै रोजी खेळवले जातील. अशा प्रकारे तीन वनडे सामने आणि तीन टी२० सामने खेळवण्यात येतील.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvNZ: विराटचा भिडू भारतीय फलंदाजांसाठी ठरणार कर्दनकाळ, अवघ्या ६ कसोटीत घेतल्यात ३६ विकेट्स
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा वार्षिक करार जाहीर, नव्या गुणांकन पद्धतीसह तब्बल ८ खेळाडूंना डच्चू