प्रो कबड्डीचा मुक्काम नागपूरहून अहमदाबादला आला आहे. नागपूरमध्ये ६ दिवस प्रो कबड्डीचा मुक्काम होता. नागपूरमध्ये झालेल्या सामन्यात काही खेळाडूंनी खूप अप्रतिम खेळ केला. त्यामुळे आपण नागपूरमध्ये ज्यांनी चांगला खेळ केला त्यांचा संघ बनवणार आहोत. पाहुयात कोण मिळवतंय या संघात स्थान.
१. सुरिंदर नाडा – (लेफ्ट कॉर्नर)
हरयाणा स्टीलर्सचा कर्णधार सुरिंदरने खेळलेल्या तिन्ही सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. तीन सामन्याचे मिळून त्याने १७ टॅकल गुण मिळवले आहेत. नागपूरमध्ये झालेल्य सामन्यातही त्याने खूप चांगली कामगिरी केली. या सामन्यात त्याने ‘हाय ५’ मिळवला आणि त्याच बरोबर त्याने रेडींगमध्येही गुण मिळवला होता. त्यामुळे आपण त्याला या संघात स्थान देत आहोत.
२. प्रदीप नरवाल – (लेफ्ट इन)
‘रेडींग मशीन’ आणि ‘डुबकी किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने नागपूरमध्ये एक सामना खेळला. त्यात त्याने १५ गुण मिळवले होते. या कामगिरीमुळे पटणा पायरेट्सने बेंगलुरु बुल्स विरूध्दचा सामना जिंकला होता. मागील तिन्ही सामन्यात प्रदीपने ‘सुपर टेन’ मिळवले आहेत. तीन सामन्यात त्याचा नावावर तब्बल ४२ गुण आहेत.
३. मंजीत चिल्लर – (लेफ्ट कव्हर)
प्रो कबड्डीच्या इतिहासात डिफेन्समध्ये २०० गुण मिळवणारा पहिला खेळाडू ठरलेला मंजीत या संघात लेफ्ट कव्हर आहे. मंजीतने पुणेरी पलटण संघाविरुध्द खेळताना ७ गुण मिळवले होते. त्याच्या या खेळीमुळे जयपुरला हा सामना जिंकला आला होता.
४. रोहीत कुमार – (सेंटर)
प्रो कबड्डीमध्ये नागपूर येथे झालेल्या ६ सामन्यात रोहीतने ४८ रेडींग गुण मिळवले आहेत. त्याने खेळलेल्या ७ सामन्यात मिळून ५८ रेडींग गुण मिळवले आहेत. त्याने डिफेन्स आणि रेडींगमध्ये मिळून ६५ गुणांची कमाई केली आहे. या गुणांमुळे तो या मोसमामध्ये सर्वाधीक गुण मिळवणारा खेळाडू ठरला आहे.
५. आशिष सांगवान – (राइट कव्हर)
बेंगलुरु बुल्सने रिटेन केलेला हा खेळाडू नागपूरमध्ये झालेल्या सामन्यात बेंगलुरु संघासाठी खूप चांगला खेळला. आशिषने बेंगाल वॉरियर्स विरुध्द हाय ५ मिळवला होता. हा सामना जिंकून देण्यात मोलाची साथ आशिषने संघाला दिली होती.
६. राहुल चौधरी – (राइट इन)
राहुलने बेंगलुरु बुल्स विरुद्ध खेळताना उत्तम कामगिरी केली. शेवटच्या काही मिनिटात रेडींग गुण मिळवत तेलुगु टायटन्सची सलग सहावा पराभव होण्यापासून वाचवले होते. खूप कमी गुणांच्या झालेल्या या सामन्यात राहुलने ८ गुणांची कमाई केली होती.
७. मोहीत चिल्लर – (राइट कॉर्नर)
गुजरात विरुध्द झालेल्या सामन्यात हाय ५ मिळवून हरयाणाच्या पहिल्या विजयात खूप मोठा वाटा या खेळाडूने उचलला होता. त्या अगोदरच्या दोन्ही सामन्यात त्याला डिफेन्समध्ये एकही गुण मिळवता आला नव्हता. गुजरात विरुध्द मोहितने तीन ‘सुपर टॅकल’ केले होते.