मुंबई | जगभरातील बहुतांश देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू असल्याने सर्वच खेळाडू घरांमध्ये आहेत. मैदानावर धडाकेबाज कामगिरी करणारे हे खेळाडू आता निवड समितीच्या भूमिकेत दिसून येत असून आपापला आवडता संघात निवडत आहेत. नुकतेच ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचने भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशातील खेळाडूंचा मिळून ‘ऑल टाइम’ सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ निवडला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे फिंचने अनेक दिग्गज खेळाडूंना संघात स्थान दिले नाही. सचिन तेंडुलकर, स्टिव्ह वॉ, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, रोहित शर्मा यांची नावे त्या संघात नाहीत.
अॅरॉन फिंचने एका कार्यक्रमात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशातील खेळाडूंचा मिळून ऑल टाइम सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ निवडला आहे. या संघात सलामीची जबाबदारी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबत अॅडम गिलख्रिस्टला संधी दिली.
फिंच म्हणाला की, “सेहवाग सलामीसाठी माझी पहिली पसंत असेल त्याचा दबाव इतका असायचा की तो मैदानावर खेळत असताना वाटायचे की सामना लवकर संपून जाईल. रोहितचा विक्रम चांगला आहे पण सेहवाग आणि गिलख्रिस्ट यांच्यावर सलामीची जबाबदारी देईल.”
रिकी पाँटिंगला तिसर्या तर विराट कोहलीला चौथ्या क्रमांकासाठी संधी दिली. यष्टिरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनीला पसंती दिली. फिंचने आपल्या संघात दोन अष्टपलू खेळाडूंना संधी दिली. यामध्ये हार्दिक पंड्या आणि अँड्रु सायमंड्स यांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजीची मदार ब्रेट ली जसप्रीत बुमरा ग्लेन मॅग्रा यांच्यावर सोपवली. फिरकीची जबाबदारी हरभजन सिंग आणि ब्रॅड हॉग यांच्यावर दिली.
धोनीच्या बाबतीत बोलताना फिंच म्हणाला की, ” मी प्रामाणिकपणे सांगतो धोनी एक महान खेळाडू आहे. त्याला मैदानावर खेळताना पाहायला मला आवडते. त्याच्या भविष्याविषयी मी काही बोलणार नाही. कारण मला त्याच्याविषयी काही माहिती नाही.”
अॅरॉन फिंचच्या ऑल टाइम भारत आणि ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ –
वीरेंद्र सेहवाग, अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, विराट कोहली, हार्दिक पंड्या, महेंद्रसिंह धोनी, अँड्रू सायमंड्स , ब्रेट ली, जसप्रीत बुमरा, ग्लेन मॅकग्रा, ब्रॅड हॉग/ हरभजन सिंग