इंडियन प्रीमियर लीग हा एक असा मंच आहे, जिथे आपल्या दमदार प्रदर्शनाचा जलवा दाखवत अनकॅप क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय संघात जागा मिळवतात. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या अशी कित्येक उदाहरणे आपण पाहिली आहेत. याच साखळीत लवकरच एका नवोदित शिलेदाराचे नाव जोडले जाणार आहे. जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारी भारत-इंग्लंड कसोटी मालिका यासाठी त्या शिलेदाराची निवड झाली आहे. हा शिलेदार म्हणजे, आवेश खान.
वेगवान गोलंदाज आवेशला भारतीय कसोटी संघात राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. यानंतर त्याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आयएएनएसशी बोलताना आवेश म्हणाला की, “मी आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून सर्व सामने खेळले आहेत. यामुळेच माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. मी यावर्षी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. यामुळे माझ्या संघानेही अधिकतर सामना जिंकले आहेत. आम्ही गुणतालिकेत अव्वलस्थानीही आलो होतो, त्यावेळी माझा आत्मविश्वास खूप वाढला.”
भारतीय संघातील निवडीबद्दल बोलताना आवेश म्हणाला की, “मला आता मोठी जबाबदारी मिळाली आहे आणि मी निश्चितच योग्यरित्या माझी जबाबदारी पार पाडेल. मी आयपीएलमध्ये पावरप्ले, मधील षटके आणि डेथ ओव्हर्स अशा सर्व चरणांमध्ये गोलंदाजी आहे. माझ्या संघ प्रशिक्षकांनी आणि कर्णधाराने माझ्यावर विश्वास दाखवला. याचमुळे आज मला एवढी मोठी संधी मिळाली आहे.”
साल २०१७ पासून आवेश आयपीएलचा भाग आहे. परंतु यापुर्वी त्याला पुरेशी संधी न मिळाल्याने तो आपल्यातील प्रतिभा दाखवू शकला नाही. परंतु आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने त्याच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे ८ सामन्यात खेळताना आवेशने १४ विकेट् चटकावल्या. यात एमएस धोनी, विराट कोहली अशा दिग्गज खेळाडूंच्या विकेट्सचाही समावेश आहे. याबरोबरच १४ विकेट्ससह आवेश पर्पल कॅपच्या (सर्वाधिक विकेट्स) शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे.
टी२० स्वरुपातील आयपीएलमध्ये शानदार गोलंदाजी प्रदर्शन करणारा आवेश कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाल्यास कशी कामगिरी करेल?, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अवघ्या ६ सामन्यात ८६१ धावा कुटत आला प्रकाशझोतात, आता इंग्लंडमध्ये गरजणार ‘बंगालचा शेर’!
फॉर्मात असलेल्या पृथ्वीला भारतीय कसोटी संघात का मिळाली नाही संधी? प्रसिद्ध समालोचकाने सांगितले कारण