---Advertisement---

टी१०‌ लीगमध्ये तिसरा दिवशी ठरला रोमांचक, ‘या’ संघांनी साजरे केले विजय

On: रविवार, जानेवारी 31, 2021 4:28 PM
---Advertisement---

अबुधाबी येथे सुरू असलेल्या अबुधाबी टी१० लीगच्या तिसऱ्या दिवशी तीन सामने खेळले गेले. बांगला टायगर्स, कलंदर्स व नॉर्दन वारियर्स संघांनी विजय मिळवत तिसरा दिवस गाजवला. निकोलस पूरन व वेन पार्नेल यांनी दिमाखदार कामगिरी केली. अबुधाबीच्या शेख झायेद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडत आहे.

अबुधाबी टी१० लीगमधील तिसऱ्या दिवशीचे निकाल-

बांगला टायगर्सचा मोठा विजय

गतविजेत्या मराठा अरेबियन्स व बांगला टायगर्स यांच्यादरम्यान झालेल्या पहिल्या सामन्यात बांगला टायगर्सने ७ गड्यांनी मोठा विजय मिळवला. अनुभवी मोहम्मद हफिजने ३० चेंडूत ६७ धावांची वेगवान खेळी साकारली. अब्दुल शकूरने त्याला चांगली साथ दिली मात्र तो धावांची अपेक्षित गती राखू शकला नाही. मराठा अरेबियन्सने निर्धारित १० षटकात १०३ धावा काढल्या.

प्रत्युत्तरात, बांगला टायगर्सने कर्णधार आंद्रे फ्लेचर, जॉन्सन चार्ल्स व चिराग सूरीच्या योगदानामुळे आठव्या षटकातच विजयी लक्ष्य प्राप्त केले. किफायतशीर गोलंदाजी करणार्‍या करीम जनतला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

कलंदर्सची टीम अबुधाबीवर मात

दिवसातील दुसऱ्या सामन्यात कलंदर्सने टीम अबुधाबीवर ९ गड्यांनी मात केली. अबुधाबीने दिलेल्या १०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर टॉम बॅन्टन व शारजील खान यांनी ताबडतोब फलंदाजी करत चांगली सुरुवात करून दिली.‌ बॅन्टन बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार सोहेल अख्तरने विरोधी गोलंदाजांची पिसे काढत ८.२ षटकांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. कलंदर्सकडून दोन षटकात १६ धावा देऊन २ बळी मिळवणाऱ्या अनुभवी शाहिद आफ्रिदीला सामनावीर घोषित करण्यात आले.

नॉर्दन वारियर्सची दिल्ली बुल्सविरुद्ध दमदार कामगिरी

निकोलस पूरन नेतृत्व करत असलेल्या नॉर्दन वारियर्सने दिल्ली बुल्सवर ३२ धावांनी मोठा विजय मिळवला. खराब सुरुवातीनंतर ही निकोलस पूरन, फॅबियान ऍलन व रोवमन पॉवेल यांनी आक्रमक फलंदाजी करत वॉरियर्सला दहा षटकांत १३७ अशी भलीमोठी धावसंख्या गाठून दिली. कर्णधार पूरनने ५ चौकार व ५ षटकारांच्या सहाय्याने २१ चेंडूत ५४ धावा ठोकल्या.

फलंदाजांनी उभारलेल्या १३७ धावांचा बचाव करताना अनुभवी वेगवान गोलंदाज वेन पार्नेलच्या नेतृत्वातील वॉरियर्सच्या गोलंदाजांनी दिल्ली बुल्सचा डाव १०५ धावांवर रोखला. पार्नेलने ड्वेन ब्राव्हो, शेरफेन रुदरफोर्ड व अली खान यांना बाद करत हॅट्रिक पूर्ण केली.

महत्वाच्या बातम्या:

वानखेडे स्टेडियमवर ९ मार्चला सुनील गावसकर यांचा होणार खास सन्मान? कारणही आहे तसंच विशेष

केवळ एक सामनावीर अन् विराट कोहली टाकेल तब्बल ५ दिग्गजांना मागे

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून परतलेल्या नटराजनने केलं मुंडन, फोटो भन्नाट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---