विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. या लढतीत भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने असणार आहेत. त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर आणि इंग्लंड दौऱ्यापुर्वी भारतीय संघ श्रीलंका संघाविरुद्ध जुलै महिन्यात मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. तसेच या संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी माजी भारतीय फलंदाजाकडे देण्यात येणार आहे, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.
भारतीय संघाची पहिली तुकडी जूनच्या सुरुवातीला इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहे. यामध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश असणार आहे. तसेच जुलै महिन्यात भारतीय संघाची दुसरी तुकडी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर ३ टी-२० सामने आणि ३ वनडे सामने खेळले जाणार आहेत. या संघात आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत झालेल्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात येऊ शकते. तसेच या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांना देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या संघासोबत प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री, विक्रम राठोड देखील इंग्लंडला जाणार आहेत. क्रिकबजच्या अहवालानुसार असे म्हटले जात आहे की, राहुल द्रविड दुसऱ्या तुकडीसह श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. परंतु याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नाहीये.
राहुल द्रविड हे अंडर १९ आणि इंडिया ए संघाचे मार्दर्शक राहिले आहेत. तसेच पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांसारखे खेळाडू राहुल द्रविडच्या देखरेखीखालीच घडले आहेत. शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांसारखे खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकतात. यातील बऱ्याचशा खेळाडूंना राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन लाभल्याने त्यांच्यासाठी हा निर्णय सोईचा ठरेल.
असा असेल श्रीलंका दौरा
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना -१३ जुलै
२)दुसरा वनडे सामना-१६ जुलै
३)तिसरा वनडे सामना -१९ जुलै
टी-२० मालिका
१)पहिला टी -२० सामना -२२ जुलै
२) दुसरा टी -२० सामना -२४ जुलै
३) तिसरा टी -२० सामना -२७ जुलै
महत्त्वाच्या बातम्या-
वयाची पन्नाशी ओलांडलेला ‘हा’ क्रिकेटपटू हॉलिवूड अभिनेत्रीवर झालाय घायाळ, सोशलवर रंगली तुफान चर्चा
सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीला लहानाची मोठी करणाऱ्या ‘या’ व्यक्तीचे कोरोनामुळे निधन