नुकतेच तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर आपला ताबा मिळवल्याने, संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. अनेक अफगानी लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात पलायन करत आहेत. त्यामुळे, अफगाण क्रिकेटच्या भविष्याला देखील धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, एका माजी अफगाण क्रिकेटपटूने व प्रशिक्षकांनी तालिबानमुळे अफगाणिस्तानातील क्रिकेटला धोका निर्माण होणार नसल्याचा दावा केला.
तालिबानचा क्रिकेटला पाठिंबा
अफगाणिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने आणि प्रशिक्षकांनी या तणावाच्या वातावरणात देखील, अफगाणिस्तान क्रिकेट सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानचा माजी खेळाडू खालिकदाद नुरी एका मुलाखतीत म्हणाला, “ज्यावेळेस १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य होते, तेव्हाच अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटने पाय रोवलेले. गेल्या २-३ वर्षांपासून अफगाणिस्तानमधील देशांतर्गत क्रिकेटदेखील व्यवस्थित होत नव्हते. याची संरचनाच मुळात खूप खराब स्थितीत होती. मात्र अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये आता सुधारणा होईल.”
नुरी पुढे म्हणाला, “तालिबानमुळे तिथल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला मला देखील याबाबत भीती वाटत होती. तालिबान जेव्हा काबूलमध्ये दाखल झाला. तेव्हा मी माझ्या परिवारासोबत देश सोडण्याच्या तयारीत होतो. मात्र, आता इथली परिस्थिती आटोक्यात आली आहे. एक दिवस घरात राहिल्यानंतर मी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. आता मी कोणत्याही भीतीशिवाय रस्त्यावर देखील फिरू शकत आहे.”
त्याचवेळी, २०१० ते २०१८ पर्यंत अफगाणिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षक राहिलेले उमेश पटवाल म्हणाले, “मी काही वेळा काबूलला गेलो होतो. तेथे मला सांगण्यात आले की, तालिबानला क्रिकेट आणि क्रिकेटपटूंविषयी ओढ आहे”
दोन दिवसांपूर्वीच काही तालिबानी एका माजी क्रिकेटपटूसह अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मुख्यालयात पोहचले होते. सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीग खेळत असलेला अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने अफगाणिस्तान मधील एकूण परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या –
–आयपीएलमधील संघांना बसणार मोठा धक्का! कमिन्ससह ‘हे’ चार ऑसी खेळाडू दुसऱ्या टप्प्याला मुकणार
–‘असली पिक्चर बाकी है’, उर्वरित आयपीएल २०२१ पूर्वी आलेला धोनीचा व्हिडिओ तुुफान व्हायरल
–त्यावेळी सिराज हॉटेल रूममध्ये एकटा रडत बसला होता, परंतु मैदानात त्याने कधीच हार मानली नाही