आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत रविवारी (३१ ऑक्टोबर) अफगानिस्तान विरुद्ध नामिबिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होणार आहे. पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर अफगानिस्तान संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर अफगानिस्तान संघाचा माजी कर्णधार असगर अफगानचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.
अफगानिस्तान संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. राशिद खानने आपल्या फिरकी गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. तर, मुजीब उर रहमान आणि कर्णधार मोहम्मद नबी यांनी देखील त्याला चांगलीच साथ दिली आहे. ही गोलंदाजांची तिकडी नामिबियाविरुद्धही आपली कमाल दाखवताना दिसेल.
पाकिस्तानविरुद्ध करावा लागला पराभवाचा सामना
पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अफगानिस्तान संघाने जवळ जवळ हा सामना पाकिस्तान संघाच्या हातून हिसकावून घेतला होता. परंतु शेवटच्या क्षणी पाकिस्तान संघाने बाजी मारत विजय मिळवला. या सामन्यात मोहम्मद नबी आणि गुलबदिन नायब यांनी ४५ चेंडुंमध्ये ७१ धावांची भागीदारी केली होती. जर अफगानिस्तान संघातील फलंदाजांना आणखी २० धावा करण्यात यश आले असते तर, या सामन्याचा निकाल काही वेगळाच असता.
नामिबिया संघ आपली ऐतिहासिक कामगिरी सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात
तर दुसरीकडे नामिबिया संघ आपली ऐतिहासिक कामगिरी सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. २५ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. पात्रता फेरीतील सामन्यात नामिबिया संघाने आयर्लंड आणि नेदरलँड संघाला पराभूत केले होते. तर सुपर -१२ फेरीतील पहिल्याच सामन्यात नामिबिया संघाने स्कॉटलॅंड संघावर जोरदार विजय मिळवला होता.
त्यामुळे अफगानिस्तान आणि नामिबिया या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. परंतु नामिबिया संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या फलंदाजांना अफगानिस्तान संघातील गोलंदाजांचा योग्यरीत्या सामना करावा लागेल.
असा आहे अफगानिस्तान संघ
राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह जजई, उस्मान गनी, असगर अफगान, मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्ला शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जनत, गुलबदीन नायब, नवीन उल हक, हामिद हसन, फरीद अहमद
असा आहे नामिबिया संघ
गेरहार्ड इरासमस (कर्णधार), स्टीफन बार्ड, कार्ल बिरकेनस्टॉ, मीचो डू प्रिज, जेन फ्रिलिंक, जेन ग्रीन, निकोल लोफी- इटन, बर्नार्ड सोल्ट्ज, बेन शिकोंगो, जेजे स्मिट, रूबेल ट्रंपेलमॅन, माईकल वेन लिंगेन, डेविड वाईसी, क्रेग विलियम्स आणि पिक्की ये फ्रान्स.
महत्त्वाच्या बातम्या-
कधी, कुठे आणि कसा पाहाल टी२० विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
मानलं भावा! आई व्हेंटिलेटरवर असूनही भारताशी भिडला, अर्धशतकी योगदान देत इतिहास बदलला