तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर देशातील स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. याचा फटका देशातील सगळ्याच गोष्टींना बसला आहे. यादरम्यान तालिबानच्या अफगाणिस्तानवरील अधिकारानंतर अफगाणिस्तानमधील क्रिकेट आणि खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे तालिबानच्या नेत्यांनी तसेच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (एसीबी) कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी यांनीदेखील म्हटले होते.
मात्र, अफगाणिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीचा परिणाम क्रिकेटवर पडला आहे. अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात येत्या महिन्यात ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे आयोजन होणार होते. मात्र, या मालिकेला आता अनिश्चित काळासाठी स्थगित केले गेले आहे.
अफगाणिस्तानच्या यजमानपदात ३ सप्टेंबरपासून श्रीलंकेमध्ये या मालिकेचे आयोजन होणार होते. मात्र, श्रीलंकेतील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार होती. याबाबत दोन्ही क्रिकेट बोर्डामध्ये सोमवारी (२३ ऑगस्ट) सहमती देखील झाली होती. मात्र, एसीबीने या मालिकेला देशातील परिस्थितीमुळे खेळाडूंच्या मानसिक स्थितीचे आणि अपूर्ण सराव व वस्तूंच्या अभावाचे कारण देत, ही मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे ठरवले. तसेच काबुलमधून कोणत्याही प्रकारच्या विमानांना उड्डाण भरण्यासाठी बंदी देखील घालण्यात आली आहे, असे सांगितले.
याबाबत पीटीआयसोबत बोलताना शिनवारी म्हणाले, “तालिबानच्या अफगाणिस्तानवरील अधिकारामुळे खेळाडूंची मानसिक स्थिती आणि परिस्थिती पाहता आम्ही ही मालिका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.” आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही मालिका २०२२ मध्ये आयोजित केली जाऊ शकते.
https://twitter.com/ACBofficials/status/1430102106531377171?s=20
दरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. अशात अफगाणिस्तानची अशी स्थिती राहिल्यास त्यांच्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. जून महिन्यातील क्रमवारीनुसार अफगाणिस्तानचा संघ सरळ सुपर १२ साठी पात्र ठरला आहे. अफगाणिस्तानचा संघ ब गटात आहे. ज्यामध्ये त्यांच्यासह भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारीच की! वॉर्नर कुटुंबात ‘वाथी कमिंग’चे पसरले वारे, बापासह लेकींनीही धरला ठेका
–रवी शास्त्रींनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचे मत
–“कारकिर्दीत मला असे कधीच जाणवले नव्हते”, बुमराहच्या बाउंसरबाबत अँडरसनने सोडले मौन





