भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, आता तो नवीन इनिंगची सुरुवात करण्यासाठी निघाला आहे. पंजाबमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आम आदमी पक्षाकडून हरभजन सिंगची निवड केली गेली आहे. विशेष म्हणजे, हरभजन राज्यसभा सदस्य होणार, हे जवळपास नक्की आहे. सोमवारी (२१ मार्च) त्याने राज्यसभेचे सदस्यपद मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आणि यावेळी भविष्यातील रणनीती स्पष्ट केली.
हरभजनच्या मते, भारतासारख्या मोठ्या देशाने ऑलिम्पिकमध्ये अधिक चांगली कामगिरी केली पाहिजे. सध्या देश ऑलिम्पिकमध्ये करत असेलली कामगिरी अपेक्षित नाहीये. हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला, “आपल्याकडे दोन पदक जिंकल्यानंतर लोकं जल्लोष करतात. आपल्या एवढ्या मोठ्या देशाने ऑलिम्पिकमध्ये २०० पदक जिंकले पाहिजेत. माझे लक्ष खेळाला प्रोत्साहन देणे आहे. खेळात विकास होण्याची आवश्यकता आहे. मी पंजाबच्या युवकांना खेळाशी जोडण्याचा प्रयत्न करेल. पंजाबव्यतिरिक्त देशभरात खेळाचा प्रसार करण्याचे काम करेल. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) मला जे काही काम देतील, मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.”
असा अंदाज बांधला जात होता की, हरभजन सिंग आम आदमी पक्षाऐवजी काँग्रेसमध्ये सहभागी होईल. डिसेंबर महिन्यात क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी हरभजन आणि नवज्योत सिंग सिद्धू यांची भेट झाली होती. यो दोघांचे फोटो व्हायरल झाले होते आणि हरभजन कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे म्हणले जात होते. मात्र, हरभजनने त्यावेळी खुलासा केला होता की, सिद्धूंसोबत त्याची झालेली भेट ही राजकीय नसून वैयक्तिक होती.
दरम्यान, हरभजनच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर तो भारताचा एक महान गोलंदाज आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २००७ विजेत्या भारतीय संघाचा हरभजन सदस्य राहिला आहे. तसेच, २०११ विश्वचषक विजेत्या संघातही हरभजन सहभागी होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि २८ टी२० सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४१७, एकदिवसीयमध्ये २६९ आणि टी-२० क्रिकेटमध्ये २५ विकेट्स आहेत. आयपीएलमध्ये त्याने १६३ सामने खेळले आणि यामध्ये १५० विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये कोणत्या मैदानावर येणार सर्वाधिक प्रेक्षक? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा १४ कोटींचा पठ्ठ्या दाखवणार आपला दम? व्हिडिओतून दिले संकेत
आयपीएलच्या १५व्या हंगामात ‘या’ अँकर्स वेधणार साऱ्यांचे लक्ष, यादीत बुमराहची पत्नीही सामील