भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली. भारताने मायदेशात खेळताना 4-1 अशा अंतराने मालिका नावावर केली. भारताच्या युवा खेळाडूंना या कसोटी मालिकेतून देशासाठी पदार्पणाची संधी मिळाली. सरफराज खान, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल, आकाश दीप आणि रजत पाटीदार या पाच खेळाडूंना या मालिकेत कसोटी पदार्पण करता आले. पण सरफराजचे कसोटी पदार्पण खास ठरले. युवा फलंदाजाला भारतासाठी कसोटी खेळल्यानंतर त्याला सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद मोठ्या प्रामाणात वाढला.
इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत भारताच्या पाच खेळाडूंनी पदार्पण केले. पण यातील सरफराज खान (Sarfaraz Khan) याचे पदार्पण खास होते. पत्नी आणि वडिलांच्या उपस्थितीत कसोटी पदार्पण करताना खान कुटुंबीय भावूक झाले होते. मागच्या काही वर्षांपासून सरफराज आणि त्याचे कुटुंबीय त्याला कसोटी कॅप मिळण्याची वाट पाहत होते. इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटी (15 फेब्रुवारी) सामन्यात ही प्रतिक्षा अखेर संपली. कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात सरफराजने 62 आणि 68* धावांची खेळी केली. रांचीमध्ये तो 14 आणि शुन्यावर बाद झाला. पण धरमशालामध्ये खेळलेल्या शेवटच्या सामन्यात त्याने 56 धावांची खेळी केली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सरफराज खान याने भारतासाठी कसोटी पदार्पण आणि त्यानंतर सोशल मीडियावर वाढलेल्या फॉलोवर्सची माहिती दिली. युवा फलंदाज म्हणाला, “मागच्या चार वर्षात इंस्टाग्रामवर मझे 6-7 लाख फॉलोअर्स होते. भारतासाठी खेळल्यानंतर ही संख्या अचानक 15 लाख झाली आहे, ही चांगली गोष्ट आहे.” म्हणजेच भारतासाठी कसोटी पदार्पण केल्यानंतर सरफराजची लोकप्रियता वाढली आहे. पदार्पणानंतर त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या जवळपास 8 लाखांनी वाढली, जो आकडा नक्कीच मोठा आहे.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकते सरफराज तीन सामने खेळला. यात त्याने 50च्या सरासरीने 200 धावा केल्या. या प्रदर्शनानंतर त्याने भारतीय संघाचे निवडकर्ते, कर्णधार, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाच्या नजरेत आपली वेगळी छाप सोडली आहे. येत्या काळात त्याला पुन्हा एकदा भारताकडून कसोटी खेळण्याची संधी मिळू शकते. मागच्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये सरफराज दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. पण यावर्षी त्याला एकही संघाने खरेदी केले नाही. अद्याप सरफराजला आयपीएलमध्ये खेळवण्यासाठी एखादा संघ उत्सुक असल्याचे अद्याप तरी झाले नाहीये.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलचं समालोचन पॅनेल जाहीर; सुनील गावसकर, रवी शास्त्रींसह अनेक दिग्गज घेणार हातात माईक
टी20 वर्ल्डकप 2026 होणार भारतात, अन् 20 संघ असे ठरतील पात्र, घ्या जाणून सविस्तर