न्यूझीलंडमध्ये खेळला जात असलेला आयसीसी महिला विश्वचषक २०२२ सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गुरुवारी (२४ मार्च) दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडीज महिला संघात आमना सामना झाला. पण हा सामना पावसाच्या कारणास्तव रद्द करावा लागला. दोन्ही संघांना या सामन्यासाठी समान गुण वाटून दिले गेले. असे असले तरी, दक्षिण अफ्रिका संघाने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात स्वतःचे स्थान पक्के केले आहे. तर दुसरीकडे विंडीज संघाच्या अडचणी थोड्या वाढल्याचे दिसत आहे.
आयसीसी महिला विश्वचषकातील (ICC Women’s World Cup 2022) हा सामना वेलिंग्टनमध्ये आयोजित केला गेला होता, पण पावसामुळे सामन्याची सुरुवात उशीरा झाली. जेव्हा पाऊस थांबला तेव्हा सामन्याचा खूप वेळ वाया गेला होता. त्याच कारणास्तव पंचांनी हा सामना ५० ऐवजी २६ षटकांचा केला. वेस्ट इंडीजचा (West Indies Women’s Team) कर्णधार स्टेफनी टेलरने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि दक्षिण अफ्रिका (South Africa Women’s Team) संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टेलरचा हा निर्णय योग्य ठरला.
पावसानंतर दक्षिण अफ्रिका संघाला फलंदाजी करताना अडथळे आले आणि त्यांची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. दक्षिण अफ्रिका संघाने त्यांच्या पहिल्या ४ विकेट्स अवघ्या २२ धावांवर गमावल्या होत्या. मध्यमगती गोलंदाज चिनेल हनरीने ३ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडीजसाठी सामना योग्य दिशेने पुढे चालला होता, पण १०.५ षटकांचा खेळ उरकल्यानंतर पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले. त्यावेळी आफ्रिकी संघाची धावसंख्या ४ विकेट्सच्या नुकसानावर ६१ धावा होती. मिग्नन डू प्रीज ३८ आणि मारियान कॅप ५ धावांसह खेळपट्टीवर खेळत होत्या. त्यानंतर खेळ पुढे जाऊ शकला नाही. पंचांनी दोन्ही संघांना १-१ गुण देऊन सामना रद्द केला.
दक्षिण अफ्रिका संघाने खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले आहेत आणि या सामन्यानंतर त्यांच्याकडे एकूण ९ गुण झाले आहेत. गुणतालिकेत दक्षिण अफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषकात खेळलेल्या ६ सामन्यांपैकी एकही गमावला नाहीय आणि त्यांचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका संघाचे उपांत्य सामन्यातील स्थान पक्के आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीज आहे. वेस्ट इंडीजने खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये ७ गुण मिळवले आहेत.