आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. हा सामना दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीत पोहचण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. परंतु या सामन्यात देखील भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. ज्यामुळे भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्नं जवळ जवळ संपुष्टात आले आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला देखील मोठी खेळी करता आली नाही. तो बाद झाल्यानंतर ट्रेंट बोल्टने त्याची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले.
प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करण्यात अपयश आले होते. त्यावेळी ११ वे षटक टाकण्यासाठी ईश सोढी गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि तो डीप मिड विकेटवर क्षेत्ररक्षणासाठी उभारलेल्या ट्रेंट बोल्टच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला.
ज्यावेळी त्याने हा झेल टिपला त्यावेळी त्याने मुद्दाम विराट कोहलीची खोड काढत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि विराट कोहलीची खिल्ली उडवली. हा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
विराट कोहलीला या डावात १७ चेंडूंमध्ये अवघ्या ९ धावा करता आल्या. अशाप्रकारे विराट कोहली पुन्हा एकदा मोठ्या सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला आहे. कारण संघातील इतर फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर विराट कोहलीवर टिकून खेळण्याची जबाबदारी होती. परंतु त्याला तसे करता आले नाही. या पराभवानंतर भारतीय संघाचा मार्ग आणखी कठीण झाला आहे. भारतीय संघाला जर उपांत्यफेरी गाठायची असेल तर येणाऱ्या पुढील सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. यासह दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर देखील भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
https://www.instagram.com/reel/CVsnHncl0sR/?utm_medium=copy_link
तसेच सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात न्यूझीलंड संघांने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक २६ तर हार्दिक पंड्याने २३ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद ११० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून डॅरी मिचेलने सर्वाधिक ४९ आणि केन विलियमसनने ३३ धावांची खेळी करत न्यूझीलंड संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
दैदिप्यमान कारकिर्दीची अखेर! असगर अफगाणला मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’; पाहा भावनिक व्हिडिओ
हार्दिकच्या नावावर ‘मोठा’ विक्रम, यापूर्वी केवळ युवराज सिंगला जमलाय ‘असा’ पराक्रम
अरेरे! टी२० विश्वचषकाचा पहिलाच सामना खेळताना ईशान किशनचा नकोशा विक्रमाच्या यादीत समावेश





