देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाची मानली जाणारी रणजी ट्रॉफी स्पर्धा (Ranji Trophy 2022) सध्या सुरू आहे. रणजी ट्रॉफीमध्ये चांगले प्रदर्शन करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न युवा खेळाडू करत असतात, तर दुसरीकडे काही दिग्गज खेळाडूही रणजीमध्ये खेळताना दिसतात, जे राष्ट्रीय संघातून सध्या बाहेर आहेत. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे असेच खेळाडू आहेत, ज्यांना राष्ट्रीय संघातून सध्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. या दोघांनी त्यांच्या पहिल्या रणजी सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते, पण दुसऱ्या सामन्यात त्यांनी पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली आहे.
मुंबई संघाचा दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे आणि सौराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणारा चेतेश्वर पुजारा रणजी ट्रॉफी २०२२ च्या पहिल्या सामन्यात आमने-सामने होते. पहिल्या सामन्यात रहाणेने वैयक्तिक शतक केले होते,तर दुसरीकडे पुजारा पहिल्या डावात तर शून्य धावांवर बाद झाला, पण दुसऱ्या डावात त्याने मोठी खेळी केली होती.
आता दुसऱ्या सामन्यात गोव्याविरुद्ध खेळताना मुंबईचा अजिंक्य रहाणे शुन्यावर बाद झाला आहे, तर सौराष्ट्रचा चेतेश्वर पुजाराही ओडिसा संघाविरुद्ध अवघ्या ८ धावा करून बाद झाला आहे.
रहाणेने सैराष्ट्रविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पहिल्या डावात १२९ धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यातील पुजाराच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने पहिल्या डावात एकही धाव केली नाही, पण दुसऱ्या डावात ९१ धावा केल्या. मुंबई आणि सौराष्ट्रमधील हा पहिला सामना अनिर्णीत राहिला होता.
मुंबई आणि गोव्याच्या सामन्याचा विचार केला, तर रहाणे फलंदाजीसाठी आला, तेव्हा मंबई संघाने ३० धावांवर त्यांच्या पहिल्या दोन विकेट्स गमावल्या होत्या. अशात रहाणेवर टिकून खेळण्याची जबाबदारी होती, पण तो अवघ्या तीन चेंडूत शून्य धावा करून बाद झाला. लक्ष्य गर्गने त्याला पायचीत पकडले.
ओडिसा आणि सौराष्ट्रच्या सामन्याचा विचार केला, तर सौराष्ट्रने ७२ धावांवर त्यांची दुसरी विकेट गमावली आणि पुजारा फलंदाजीसाठी आला. त्याने सहा चेंडूंचा सामना करून २ चौकार मारले आणि अवघ्या ८ धावा केल्या आणि तंबूत परतला. देबब्रात प्रधानने त्याला देबाशीष सामंत्रेच्या हातून झेलबाद केले.
दरम्यान, या दोन्ही फलंदाजांनी मागच्या जवळपास दोन वर्षांमध्ये खूपच निराशाजनक प्रदर्शन केले आणि यादरम्यान त्यांना एकही शतक करता आले नाही. वारंवार संधी मिळून देखील त्यांना प्रदर्शनात सुधारणा करता आली नाही. याच कारणास्तव श्रीलंकेविरुद्ध ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत त्यांना संधी दिली गेली नाही. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘माझ्यावरही अन्याय झाला’, वृद्धिमान सहाला धमकी प्रकरणानंतर माजी खेळाडूने मांडली व्यथा
भारतीय कर्णधार मिताली राजने रचला इतिहास, संघाला क्लिन स्वीपपासून वाचवत मोठा विक्रमही केला नावे
‘सरदार’ बनलेल्या कोहलीला पाहून चाहते क्रेझी, अनुष्काही नव्या लूकमध्ये कॅमेरात कैद; काय आहे प्रकरण?






