इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) १५ व्या हंगामाला येत्या काही महिन्यात सुरुवात होणार आहे. हा हंगामापासून काही बदल झालेले आयपीएलमध्ये दिसणार आहेत. या हंगामापासून स्पर्धेत ८ नाही, तर १० संघ एकमेकांना टक्कर देताना दिसतील. या हंगामापासून लखनऊ फ्रँचायझी आणि अहमदाबाद फ्रँचायझी हे दोन्ही संघ नव्याने स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, अहमदाबादने नुकतेच आपल्या संघाचे अधिकृत नाव जाहीर केले आहे.
अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव ‘गुजरात टायटन्स’ असे ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद टायटन्स असे संघाचे नाव असेल, अशी चर्चा होती. मात्र, बुधवारी (९ फेब्रुवारी) ट्वीटरवर संघाचे अधिकृत अकाऊंट लाँच झाले आणि या अकाऊंटचे नाव गुजरात टायटन्स असे दिसत आहे. तसेच अकाऊंटच्या बायोमध्ये लिहिले आहे की, ‘गुजरात टायटन्सचे अधिकृत अकाऊंट आहे, हा इंडियन प्रीमीयर लीगमधील नवा संघ आहे.’
गुजरात हे नाव आयपीएलमध्ये नवे नसले तरी, गुजरात टायटन्स संघ नवा आहे. यापूर्वी गुजरात लायन्स संघ २०१६ आणि २०१७ साली आयपीएलमध्ये खेळला होता.
सीव्हीसी कॅपिटल्सकडे संघाची मालकी
सीव्हीसी कॅपिटल्सने मागील वर्षी अदानी समूहाला मागे टाकत तब्बल ५६२५ कोटी रुपयांची बोली लावत अहमदाबाद फ्रॅंचाईजी विकत घेतली होती. या संघाने हार्दिक पंड्या, राशिद खान आणि शुबमन गिल यांना संघात समील करून घेतले आहे. तसेच हार्दिकडे संघाचे नेतृत्त्वही सोपवण्यात आले आहे. त्याला १५ कोटींमध्ये संघात स्थान देण्यात आले असून राशिदसाठीही १५ कोटी रुपये मोजले आहेत. तर युवा सलामीवीर शुबमन गिलला ८ कोटींमध्ये संघात संधी दिली आहे.
या संघाच्या मुख्य प्रशिक्षरपदी आशिष नेहराची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे, तर विक्रम सोळंकी या संघाचा संचालक असेल. तसेच गॅरी कर्स्टर्न हे संघाचे मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक असतील.
लखनऊ संघाचेही नामकरण
अहमदाबादपूर्वी लखनऊ फ्रँचायझीने देखील आपल्या संघाचे नामकरण केले आहे. संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी ग्रुपकडे या संघाची मालकी असून त्यांनी या संघाचे नाव लखनऊ सुपरजायंट्स ठेवले आहे. या संघाच्या कर्णधारपदी केएल राहुलची नियुक्ती केली असून मार्कस स्टॉयनिस आणि रवी बिश्नोई यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.
दोन दिवस होणार लिलाव
या हंगामासाठी १२ आणि १३ फेब्रुवारी असा दोन दिवसांचा लिलाव होणार आहे. या लिलावात एकूण १० संघ ५९० खेळाडूंवर बोली लावताना दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvsWI: दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने जिंकला टॉस; केएल राहुलचे पुनरागमन, तर पोलार्ड बाहेर
वडिलांची नजर चुकवून खेळायचा क्रिकेट, आता ठरला १९ वर्षाखालील विश्वचषकाचा हिरो