व्यक्ती कितीही मोठा आणि दिग्गज असला तरी नियम सर्वांनाच सारखे असतात, याचाच प्रत्यय नुकताच एका घटनेतून आला आहे. भारताचा ९० च्या दशकातील दिग्गज क्रिकेटपटू अजय जडेजाला गोव्यातील गावात कचरा फेकण्याबद्दल ५००० रुपयांचा दंड भरावा लागला आहे.
जडेजाला भरावा लागला दंड
उत्तर गोव्यातील एल्डोना गावात अनेक दिग्गजांची घरं आहेत, यात अजय जडेजाचाही समावेश आहे. मात्र, गावात कचरा फेकण्याबद्दल गावाची सरपंच तृप्ती बंदोदकरने त्याच्यावर ५००० रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे. जडेजाने सोमवारी (२८ जून) हा दंड भरला आहे. बिलावरील त्याच्या नावामुळे त्याने कचरा फेकल्याचे निष्पण्ण झाले होते.
बंदोदकर यांनी सांगितले की ‘आम्ही आमच्या गावातील कचऱ्याच्या समस्येमुळे त्रासिक आहोत. बाहेरुनही कचरा गावातच टाकला जातो. त्यामुळे आम्ही काही युवकांना कचऱ्याच्या बॅग एकत्र करुन दोषींची ओळख पटवण्यासाठी एखादा पुरावा शोधण्यासाठी नियुक्त केले आहे.’
सरपंचांनी पुढे माहिती दिली की ‘आम्हाला कचऱ्यांच्या बॅगांमध्ये अजय जडेजा यांच्या नावाचे बिल मिळाले. जेव्हा आम्ही त्यांना पुढे असा कचरा न फेकण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी सांगितले की ते दंड भरण्यास तयार आहेत. त्यांनी दंड भरला. आम्हाला नक्कीच याचा अभिमान आहे की आमच्या गावात अशी एक व्यक्ती राहाते, जी लोकप्रिय क्रिकेट खेळाडू आहे, पण लोकांनी कचरा टाकण्याच्या नियमांचे पालन करायला हवे.’
अशी होती जडेजाची कामगिरी
अजय जडेजाने भारताकडून १५ कसोटी आणि १९६ वनडे सामने खेळले आहे. सध्या जडेजा समालोचक म्हणून बऱ्याच वेळा समालोचन कक्षात दिसतो. जडेजाने १५ कसोटीत ५७६ धावा केल्या आहेत. तसेच १९६ वनडेत ५३५९ धावा केल्या असून २० विकेट्सही घेतल्या आहेत.
नव्वदच्या दशकात जेव्हा अजय जडेजा क्रिकेट खेळत होता, तेव्हा त्याचा मोठा चाहता वर्ग भारतात होता. पण २००० साली झालेल्या फिक्सिंगच्या प्रकरणात जडेजा अडकला. त्यानंतर काही वर्षांनी तो या प्रकरणातून सुटला, मात्र २००० सालानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तू यशास पात्र’! एकाच दिवसात ३ सुवर्णपदक जिंकणाऱ्या दीपिका कुमारीची मास्टर ब्लास्टरने थोपटली पाठ
काय सांगता! ‘त्या’ मीमवाल्या पाकिस्तानी चाहत्याला चक्क कोकाकोलाकडून आली होती जाहिरातीची ऑफर
संजू सॅमसनच्या हजरजबाबीपणाने झाली ‘या’ भारतीय गोलंदाजाची बोलती बंद