काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात काही खेळाडूंना संधी मिळाली तर काही खेळाडूंना संघात जागा मिळाली नाही. अष्टपैलू खेळाडू हनुमा विहारी याची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड झाली नव्हती. हनुमा विहारीला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळल्यामुळे माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने प्रश्न उपस्थित केला आहे. जडेजाने म्हटले आहे की हनुमा विहारीची काय चूक होती की त्याला भारतात होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात समाविष्ट केले गेले नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा हनुमा विहारीचे नाव त्यात नव्हते. यामुळे अनेक दिग्गजांना आश्चर्य वाटले. विहारीला संघातून वगळल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्याचबरोबर या कसोटी मालिकेसाठी हनुमा विहारीचा संघात समावेश करायला हवा होता, असेही अजय जडेजाने म्हटले आहे. एका वाहिनीशी संभाषणादरम्यान, जडेजाने विहारीला कसोटी संघातून वगळल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ‘हनुमा विहारीने चांगली कामगिरी केली होती आणि तो बराच काळ भारतीय संघासोबत होता. मात्र, असे असूनही त्याला संघात स्थान मिळाले नाही. शेवटी त्याने काय चूक केली? त्याने भारत अ संघाच्या दौऱ्यावर का जावे आणि तो भारतात कसोटी सामने का खेळू शकत नाही? एकतर तुम्ही त्याला इंडिया ‘अ’ दौऱ्यावरही पाठवू नका. दीर्घकाळ संघासोबत असलेल्या खेळाडूला तुम्ही अशा दौऱ्यावर पाठवत आहात आणि त्याच्या जागी नवीन खेळाडू संघात येत आहे. तुम्ही अशा पद्धतीने लोकांच्या मनाशी खेळत आहात.’
हनुमा विहारी भारतीय संघाकडून शेवटचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळला होता. तो अनिर्णित राहिलेल्या सिडनी कसोटी सामन्याचा भाग होता आणि त्यानंतर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही
एका वृत्तानुसार, विहारीला न्यूझीलंड कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. जेणेकरून तो भारत ‘अ’ संघासोबत दक्षिण आफ्रिकेत जाऊन तेथील परिस्थितीशी जुळवून घेऊ शकेल. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा असून, विहारी याने आधी तिथे जाऊन परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घ्यावे, अशी निवडकर्त्यांची इच्छा आहे. म्हणून त्यास न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत स्थान मिळाले नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला, तेव्हा हनुमा विहारीचे नाव नव्हते आणि श्रेयस अय्यरचा समावेश होता. यानंतर विविध माध्यमे आणि सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली, तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारत ‘अ’ संघात हनुमा विहारीचा समावेश करण्यात आला.