आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (३० मार्च) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) सामना रंगला. यामध्ये केकेआरकडून खेळणारा कॅमेरॉन ग्रीन गोलंदाजीपासून दूर राहिला, याबाबत कर्णधार अंजिक्य रहाणेला विचारले असता त्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेटला विचारा असे म्हटले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने त्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
अष्टपैलू ग्रीनला आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्याची परवानगी का नाही याचे स्पष्टीकरण ऑस्ट्रेलिया क्रिकेटला देण्यास रहाणेने भाग पाडले आहे. केकेआर संघाला दुखापतीने घेरले आहे. अशात गोलंदाज म्हणून ग्रीनच्या अनुपलब्धतेमुळे संघाचा समतोल बिघडत असल्याचे रहाणेने म्हटले आहे. त्याने सामन्यानंतर म्हटले, “मला वाटते ग्रीनने लवकरच गोलंदाजी करण्यास सुरूवात केली पाहिजे, तेव्हा संघाचे नियोजन थोडे वेगळे होईल.”
“सध्या संघातील संतुलन आणि कोण आमच्यासाठी चांगली गोलंदाजी करेल हे पाहावे लागेल. फलंदाजीच्या बाबतीत मी म्हटल्याप्रमाणे, आम्ही चांगली फलंदाजी केली, पण गोलंदाजीत संतुलन साधण्यात कमी पडलो. त्यामुळे आशा आहे की ग्रीन लवकरच गोलंदाजी करेल,” असेही रहाणेने पुढे म्हटले आहे.
सामन्यानंतर रहाणेला समालोचक रवी शास्त्री यांनी विचारले की ग्रीन गोलंदाजी का करत नाही, तेव्हा तो म्हणाला, हा प्रश्न क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारा. त्याचे हे उत्तर ऐकून शास्त्री आणि केविन पीटरसन चकीत झाले.
रहाणेच्या या वक्तव्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की ग्रीनच्या पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली आहे आणि याची पूर्वकल्पना केकेआरला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना म्हटले, “ग्रीनच्या पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली असून त्यावर उपचार सुरू आहेत, त्यामुळे त्याला काही काळ गोलंदाजीपासून दूर राहावे लागेल. सध्या तो भारतात असून त्याच्या गोलंदाजीचा सराव वाढवत आहे. तो १०-१२ दिवसांत गोलंदाजीसाठी तयार होईल, याबाबत आम्ही आधीच केकेआरला कळवले आहे.”
ग्रीन आयपीएल २०२६ साठी झालेल्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला केकेआरने २५.२० कोटी रुपयांना खरेदी केले. त्याने मुंबईविरुद्ध फलंदाजी करताना तिसऱ्या क्रमांकावर येत १० चेंडूत १८ धावा केल्या. यावेळी केकेआरने रहाणेच्या ६७ धावा, फिन ऍलनच्या ३७ धावा आणि अंगकृष रघुवंशीच्या ५१ धावांच्या जोरावर २२० धावासंख्या उभारली, मात्र गोलंदाजीमध्ये ते संघर्ष करताना दिसले.
मुंबईने लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी आक्रमक सुरूवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी केली आणि सामना आपल्या बाजूने केला.
यामध्ये केकेआरकडून वैभव अरोराने ४ षटकात १ विकेट घेत ५२ धावा खर्च केल्या. ब्लेसिंग मुझारबानीने ३ षटकात ३४ धावा दिल्या मात्र एकही विकेट घेतली नाही. अधिक निराशा तर वरुण चक्रवर्ती आणि सुनिल नरेन यांनी केली. वरुणने ४ षटकात एकही विकेट न घेता ४८ धावा दिल्या. नरनने ३ षटकात एक विकेट घेत ३० धावा दिल्या. तसेच बदली खेळाडू कार्तिक त्यागीने ४ षटकात ४३ धावा देत एक विकेट घेतली. त्यांच्या या प्रदर्शनामुळे रहाणे निराश दिसला. हा सामना मुंबईने ६ विकेट्सने जिंकला.






