भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला क्रीजवर वेगाने धाव पूर्ण करण्याचा बादशाह म्हणून ओळखले जात असायचे. कसोटी क्रिकेट इतिहासात आतापर्यंत केलेल्या २०० भागीदारींमध्ये रहाणे एकदाही धावबाद न होणारा पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. यादरम्यान त्याने आपल्या संघसहकाऱ्यालाही धावबाद केलेले नाही. पण रहाणेच्या या मोठ्या विक्रमाला २०२० या वर्षाचे ग्रहण लागले. रहाणेने यावर्षी स्वत:च्या चुकीमुळे एक नव्हे, तर दोन फलंदाजांना धावबाद केले आहे.
फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रहाणेमुळे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत धावबाद झाला होता. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा त्याचा नुकताच शिकार बनला आहे.
विराट कोहलीला केले धावबाद
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट आणि रहाणेच्या जोडीने मिळून ८१ धावांची भागीदारी केली होती. यात विराटच्या ७४ धावांच्या दमदार खेळीचा समावेश होता. पण ७६.६ षटकात रहाणेने एक धाव घेण्याचे संकेत देऊनही धाव पूर्ण केली नसल्यामुळे विराटने विनाकारण आपली विकेट गमावली.
डावाच्या ७७व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रहाणेने साधारण शॉट मारला. या चेंडूवर एक धाव घेण्याच्या उद्देशाने त्याने विराटला धावण्याचा इशारा केला. पण त्यानंतर रहाणे धावलाच नाही. मात्र, विराट धाव पूर्ण करण्यासाठी पळाला होता. तेवढ्यात ऑस्ट्रलियन खेळाडूंनी चेंडू पकडला व स्टंपच्या दिशेने फेकला आणि विराट धावबाद झाला.
विराटपूर्वी रिषभ पंतला केले होते धावबाद
विराटपूर्वी रिषभ पंतला रहाणेच्या चुकीमुळे आपली विकेट गमवावी लागली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ही घटना घडली होती. या सामन्याच्या पहिल्या डावातील ५८.२ षटकात स्ट्राईकवर असलेला रहाणे एक धाव घेण्यासाठी धावला. पण क्षेत्ररक्षकाने वेगाने तो चेंडू पकडला असल्याचे पाहून नॉन स्ट्राइकवर असलेला पंत धाव घेण्यासाठी विचार करत होता. पण रहाणे तोपर्यंत क्रीजच्या खूप पुढे आल्याचे पाहून पंतला धावेसाठी पळावे लागले आणि तो केवळ १९ धावांवर धावबाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला चौथा धक्का! अजिंक्य रहाणेच्या चुकीमुळे कर्णधार विराट कोहली रन आऊट?
सुपर रे रहाणे, विराटला बाद करुन खुश झालास ना! कोहली धावबाद झाल्यानंतर भन्नाट मिम्स व्हायरल