भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे हा कसोटी संघाचा प्रमुख सदस्य आहे. वेळोवेळी आपल्या फलंदाजी आणि नेतृत्त्व शैलीमुळे रहाणे भारतीय संघासाठी विघ्नहर्ता ठरला आहे. फलंदाजीबरोबरच तो क्षेत्ररक्षणातही चपळ आहे. चालू सामन्यात तो अधिकतर स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना अविश्वनीय झेल टिपताना किंवा षटकार-चौकार अडवताना दिसतो. परंतु त्याच्या गतीशील क्षेत्ररक्षणामागचे रहस्य काय आहे, याबाबत फार क्वचित जणांना माहिती असावे. एकदा स्वत: रहाणेने यासंदर्भात उलगडा केला होता.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार रहाणेने स्पोर्ट्स प्रेझेंटेटर आणि कॉमेडियन विक्रम साठेला दिलेल्या एका मुलाखतीत बरेचसे खुलासे केले होते. यावेळी त्याने आपल्या दमदार क्षेत्ररक्षणामागील रहस्यही सर्वांना सांगितले होते.
रहाणे म्हणाला होता की, “मी जेव्हा क्रिकेट क्षेत्रात नवा खेळाडू होतो. तेव्हा मी मुंबई लोकल रेल्वेने प्रवास करत असायचो. मला डोंबिवलीवरुन रेल्वे पकडावी लागत असे. त्यावेळी माझ्यासाठी एक मिनिट आणि एका सेंकदाचेही खूप महत्त्व असायचे. सकाळी माझ्या प्रवासाला सुरुवात होत असे. डोंबिवलीवरुन पहाटे ५.५० ते ५.५२ या वेळेत पहिली लोकल असायची. त्यामुळे माझ्यासाठी एक सेकंदही खूप महत्त्वाचा असायचा. तिथूनच मला मुंबईकरांप्रमाणे वक्तशीर राहण्याची शिस्त लागली. याच अनुशासनाचा परिणाम स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करतानाही माझ्यात दिसून येतो.”
“याखेरीज सरावाचेही माझ्या झेल टिपण्याच्या शैलीत मोठे योगदान राहिले आहे. जेव्हा मी एकदा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापती झालो होतो, तेव्हा झेल घेण्याच्या वेळेवर लक्ष देणे माझ्यासाठी आवश्यक होते. कारण एकदा दुखापत झाल्यानंतर त्याचजागी परत दुखापत होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे होते. इंग्लंडविरुद्ध जेव्हा मी जो रुटचा झेल घेतला होता तेव्हा मला ०.४५ इतका वेळ लागला होता. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध ०.४०, ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथविरुद्ध ०.३४ असा फरक जाणवत गेला,” असे त्याने शेवटी सांगितले होते.
रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत ८२ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ९९ झेल पकडले आहेत. तर वनडेत ९० सामन्यात ४८ झेल आणि २० टी२० सामन्यात १६ झेलची नोंद त्याच्या नावे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटसाठी भारत सोडून पाकिस्तानात वसलेले शिलेदार, नवव्या क्रमांकावर झुंजार शतकाची आहे नोंद
वनडेत ६ धावा देत ५ विकेट्स घेणारा खेडेगावातील सुपरस्टार ‘सुनिल जोशी’
एकेवेळी ३ बाऊंसर हेल्मेटला लागल्यामुळे रडणारा खेळाडू ते भारतीय संघाचा उपकर्णधार ‘अजिंक्य रहाणे’